दीपावलीत भेसळयुक्त पदार्थांची विक्री केल्यास गुन्हा नोंद होणार !

प्रशासनाची चेतावणी !

सांगली, २ नोव्हेंबर (वार्ता.) – दीपावलीत विकण्यात येणार्‍या फराळाच्या पदार्थांची पडताळणी करण्यात येणार असून भेसळयुक्त पदार्थ आढळल्यास गुन्हा नोंद करण्यात येणार आहे. नियमांचे पालन न करणार्‍यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. प्रत्येक विक्रेत्याकडे नोंदणी असणे आवश्यक आहे. हलक्या प्रतीचे पदार्थ जप्त करून नष्ट करण्यात येणार आहेत, अशी चेतावणी अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी दिली. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली अन्न आणि औषध प्रशासन, महापालिका आरोग्य अधिकारी, पोलीस विभाग यांच्या झालेल्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते. प्रशासनाच्या वतीने यासाठी ७ पथके सिद्ध करण्यात आली आहेत.

मिठाई आणि इतर खाद्यपदार्थ खरेदी करतांना काळजी घ्या ! – साहाय्यक आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन विभाग

‘दीपावलीच्या काळात दुग्ध आणि दुग्धजन्य खाद्यपदार्थ खरेदी करतांना आणि सेवन करतांना नागरिकांनी काळजी घ्यावी. हे पदार्थ देयकाविना खरेदी करू नयेत. उघड्यावरील मिठाई, खवा (मावा) खरेदी करू नये. गुणवत्तेविषयी गार्‍हाणे असल्यास अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार करावी’, असे आवाहन अन्न आणि औषध प्रशासन विभागातील साहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.


Multi Language |Offline reading | PDF