सरकारने राममंदिरासाठी अध्यादेश न काढल्यास वर्ष १९९२ सारखे आंदोलन करू !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भय्याजी जोशी यांची चेतावणी

राममंदिराच्या सूत्रावरून सत्तेत आलेल्या भाजपला हिंदूंच्या भावनांचा विसर पडला असेल, तर संघ भाजपला खडसावत का नाही ? संघाने राममंदिरासाठी यापूर्वीच कठोर भूमिका घेऊन कृती केलीअसती, तर एव्हाना राममंदिर स्थापन झाले असते. त्यामुळे संघ अजून किती वाट पहाणार आहे ?

ठाणे – अयोध्येत राममंदिर व्हावे, ही देशातील कोट्यवधी जनतेची इच्छा आहे. त्यामुळे न्यायालयानेही जनतेच्या भावनांचा आदर करावा. केंद्र सरकारने राममंदिरासाठी लवकरात लवकर अध्यादेश काढावा अन्यथा आवश्यकता भासल्यास राममंदिरासाठी वर्ष १९९२ सारखे आंदोलन करू, अशी चेतावणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह श्री. भय्याजी जोशी यांनी २ नोव्हेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. मागील ३ दिवसांपासून भाईंदर, जिल्हा ठाणे येथे चालू असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिराची सांगता झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राममंदिराविषयी वरील भूमिका मांडली. (सत्तेत आल्यावर राममंदिराचे सूत्र बाजूला सारून भाजपने हिंदूंचा विश्‍वासघात केला आहे, असे हिंदूंना वाटायला लागले आहे. संघाने आता जर-तरची भाषा करण्यापेक्षा भाजपकडून राममंदिरासाठी ठोस प्रयत्न करवून घेणे अपेक्षित ! – संपादक)

श्री. भय्याजी जोशी पुढे म्हणाले की,

१. राममंदिर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालय योग्य न्याय करीलच. आम्ही न्यायव्यवस्थेचा आदर करतो. राममंदिरासाठी वेळ लागतोय, हे वेदनादायी आहे. मागील ३० वर्षांपासून आम्ही राममंदिराचे आंदोलन करत आहोत. लोकांच्या इच्छेनुसारच राममंदिर व्हायला हवे. त्यात कायदेशीर अडचणी आहेत; मात्र सर्वोच्च न्यायालय लोकभावनेचा विचार करून निर्णय देईल, याची आशा आहे.

२. वर्ष २०१० च्या अलाहाबाद न्यायालयाच्या निर्णयानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. दिवाळीच्या आधी आनंदाची बातमी मिळेल, अशी आमची इच्छा होती; पण आता सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली. तो त्यांचा अधिकारच आहे. या प्रकरणावर ‘तुम्ही कधी निर्णय द्याल ?’, असे आम्ही न्यायालयाला विचारले, तेव्हा ‘आमचे प्राधान्य वेगळच आहे’, असे उत्तर मिळाले. सर्वोच्च न्यायालयाच्या या उत्तरामुळे हिंदु समाजाला अपमानित झाल्यासारखे वाटत आहे. यासाठीच न्यायालयाने या प्रकरणी लवकरात लवकर निर्णय घ्यावा.

राममंदिरासाठी संघाला आंदोलन करावे लागत असेल, तर संघ सरकारला खाली का खेचत नाही ? – उद्धव ठाकरे

असे शिवसेनेला विचारावे का लागते, याचा संघाने विचार करणे अपेक्षित !

मुंबई – मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर राममंदिराचे सूत्र बाजूला पडले. आता शिवसेनेने हे हाती घेतल्यानंतर आता संघाला पुन्हा एकदा राममंदिरासाठी आंदोलनाची आवश्यकता वाटू लागली आहे. स्वत:चे भक्कम संख्याबळ असलेले सरकार सत्तेत असतांना राममंदिरासाठी आंदोलनाची आवश्यकता वाटत आहे ?, हे सरकार तुम्ही खाली का खेचत नाही ?’, असे प्रश्‍न शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विचारले. ते शिवसेना भवनात पत्रकारांशी बोलत होते.

(म्हणे) न्यायालय हिंदूंच्या भावनेच्या आधारावर निर्णय देऊ शकत नाही ! – ओवैसी

नवी देहली – सर्वोच्च न्यायालय हिंदूंच्या भावनेच्या आधारावर निर्णय देऊ शकत नाही, असे हिंदुद्वेषी विधान एम्आयएम्चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केले. (निधर्मी व्यवस्थेमुळेच धर्मांध हे अल्पसंख्य असूनही बहुसंख्य हिंदूंना डिवचू शकतात ! असे चित्र कुठल्या इस्लामी राष्ट्रात पहायला मिळते का ? ही परिस्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक) ‘सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराविषयी हिंदूंच्या भावनेचा आदर करून निर्णय द्यावा’, या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेवर ओवैसी यांनी हे विधान केले. ‘घटनेत श्रद्धा आणि भावना यांना स्थान नाही. येथे केवळ न्याय मिळतो’, असेही ते म्हणाले.


Multi Language |Offline reading | PDF