आतंकवाद्यांकडून जम्मूतील भाजपच्या नेत्याची हत्या

  • भाजप सरकारने काश्मीरमध्ये आतंकवादाचा वेळीच निःपात केला असता, तर तेथील स्वपक्षातील नेत्यांना गमावण्याची वेळ भाजपवर आली नसती !
  • हाती सत्ता असतांना स्वतःच्या नेत्यांच्या एका मागोमाग एक होणार्‍या हत्या रोखू न शकणारे भाजप सरकार हिंदूंचे रक्षण कधी करू शकेल का ? काँग्रेसच्या राजवटीतही हिंदूंची अशीच स्थिती होती. यास्तव हिंदूंचा भाजपवरील विश्‍वास उडाला आहे ! हे भाजपला अत्यंत लज्जास्पद !

जम्मू – आतंकवाद्यांनी जम्मूच्या किश्तवाड परिसरातील भाजपचे प्रदेश सचिव अनिल परिहार (वय ५२ वर्षे) आणि त्यांचे भाऊ अजित परिहार (वय ५५ वर्षे) यांची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनिल परिहार यांना राज्य सरकारकडून सुरक्षा प्रदान करण्यात आली होती, तरीही आतंकवाद्यांनी हे आक्रमण केले. (यावरून पुरवलेली सुरक्षा किती कूचकामी होती, हे स्पष्ट होते ! याचा अर्थ आतंकवादी हे सुरक्षारक्षकांपेक्षा अधिक प्रशिक्षित आहेत, असे समजायचे का ? – संपादक) अनिल आणि अजित परिहार हे दोघे जण किश्तवाडमधील त्यांच्या दुकानातून येथील तपन गल्ली या भागात असलेल्या त्यांच्या घरी जात होते. त्या वेळी दबा धरून बसलेल्या आतंकवाद्यांनी त्यांच्यावर आक्रमण केले.

यात दोघे जण गंभीररित्या घायाळ झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर लोकांनी रुग्णालयाच्या बाहेर जोरदार निदर्शने अन् घोषणाबाजी केली. परिस्थितीचा अंदाज घेत जिल्हाधिकारी राणा यांनी सैन्याला पाचारण केले. किश्तवाड जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या घटनेसह पोलीस या आक्रमणाच्या वेळी परिहार यांचे सुरक्षारक्षक कुठे होते, याचेही अन्वेषण करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी या हत्येविषयी दुःख व्यक्त केले.


Multi Language |Offline reading | PDF