रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे ८ साधक झाले जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

दिवाळीपूर्वी ईश्‍वराने साधकांना भावभेट दिली ।

साधकरूपी अष्टदिपांनी रामनाथीनगरी उजळली ॥

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ७ साधकांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी, तर एका साधिकेने ६३ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे केले घोषित !

डावीकडून मागे उभे असलेले सर्वश्री निषाद देशमुख, अमित हडकोणकर, राम होनप, कु. मधुरा भोसले, कु. सुमन सिंह, आसंदीवर बसलेले डावीकडून श्री. गणेश गावडे, पू. पद्माकर होनप, सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, पू. सदानंद (बाबा) नाईक आणि श्री. सीताराम (नाना) आग्रे

रामनाथी (गोवा), १ नोव्हेंबर (वार्ता.) – ईश्‍वराप्रतीचा भावच त्याला साधनेत टिकवून ठेवतो आणि त्याची प्रगतीही करवून घेतो. गुरुकृपायोगाचे निर्माते परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या व्यक्ती तितक्या प्रकृती आणि तितके साधनामार्ग या वचनाप्रमाणे येथील सनातनच्या आश्रमात विविध प्रकारच्या सेवा करणार्‍या ८ साधकांनी आश्‍विन कृष्ण पक्ष अष्टमी (१ नोव्हेंबर) या दिवशी ६१ टक्के आणि त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधक सेवा करतांना भावजागृतीसाठी प्रयत्न करत असल्याने त्यांची आध्यात्मिक उन्नती झाल्याची आनंदवार्ता आश्रमात पार पडलेल्या एका भावसत्संगाच्या वेळी साधकांना दिली. या वेळी सनातनचे संत पू. सदानंद (बाबा) नाईक आणि पू. पद्माकर होनप यांची वंदनीय उपस्थिती होती. याप्रसंगी आध्यात्मिक प्रगती केलेल्या साधकांचे कुटुंबीय, सहसाधक, तसेच आश्रमात सेवा करणारे अन्य साधकही उपस्थित होते. या वेळी वाराणसी येथील साधकांनाही संगणकीय प्रणालीद्वारे जोडण्यात आले होते.

ईश्‍वराच्या कोमल चरणांवरअर्पण झालेली ८ भावपुष्पे !

श्री. गणेश गावडे (वय ७३ वर्षे), श्री. नाना आग्रे (वय ६४ वर्षे), श्री. अमित हडकोणकर (वय ३९ वर्षे), वाराणसी येथील साधिका कु. सुमन सिंह (वय २० वर्षे), कु. मीरा (वय २० वर्षे) आणि सनातनचे ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. राम होनप (वय ३५ वर्षे), श्री. निषाद देशमुख (वय ३० वर्षे) आणि कु. मधुरा भोसले (वय ३५ वर्षे)

भावसोहळ्याचा काव्यमय वृत्तांत !

भाव-भक्तीमय वातावरणात भावसत्संगाला आरंभ झाला ।

भावार्चनेच्या माध्यमातून साधकांना भगवंत अनुभवता आला ॥

उतारवय अन् आजारपणात साधना होऊ शकत नाही असे कोण म्हणते ?

याही स्थितीत भाव अन् अनुसंधान यांमुळे देव बळ देत असे ॥

याची उदाहरणे आहेत आमचे गावडे आजोबा अन् नाना आग्रे ।

देवाशी अनुसंधान साधणारे गावडे आजोबा ॥

आणि प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवून पुन्हा प्रगती करणारे ।

साधकांचे आधार बनलेले साधकांचे नाना आग्रे ॥

हळू हळू उलगडत गेले भावसत्संगाचे कोडे ।

आता क्रमांक लागला बुद्धीची सेवा करणार्‍या साधकाचा ।

मितभाषी आणि सेवेशी एकरूप झालेल्या अमितदादाचा ॥

पुढच्या घोषणा ऐकण्यासाठी साधक होऊ लागले उत्सुक ।

तेवढ्यात बोलू लागली वाराणसीची सुमनताई आपसूक ॥

मागोमाग क्रमांक लागला गोपीभक्ती करणार्‍या मीराताईचा ।

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी बळ द्या आम्हा, हा भाव अनुभवला आर्ततेचा ॥

अंतिम वेळ झाली भावसत्संगाचे सूक्ष्म-परीक्षण अनुभवण्याची ।

मात्र देवाने दिली आनंदवार्ता निराळी ॥

सनातनचे तिन्ही ज्ञानप्राप्तकर्ते साधक झाले मुक्त जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतूनी ।

साधकांच्या प्रगतीच्या घोषणेने आश्रमदेवता कृतज्ञतेने आनंदली ॥

भाव, भक्ती, ज्ञान, शांती, प्रीती यांची उधळण करत

अष्टसुमने श्रीगुरुचरणी अर्पण झाली ।

दिपावलीचा आनंद देती श्रीगुरु साधकांना ।

कोटी कोटी कृतज्ञताही न्यून पडे व्यक्त करतांना ॥

कृतज्ञ ! कृतज्ञ ! कृतज्ञ !

सनातनचे सूक्ष्म-ज्ञान प्राप्तकर्ते साधक श्री. राम होनप, श्री. निषाद देशमुख आणि कु. मधुरा भोसले यांच्या आध्यात्मिक प्रगतीची अशी झाली घोषणा !

५ साधकांनी गुरुकृपा संपादन केल्याचे घोषित झाल्यावर सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांनी सनातनचे सूक्ष्म-ज्ञान प्राप्तकर्ते साधक श्री. राम होनप, श्री. निषाद देशमुख आणि कु. मधुरा भोसले यांना भावसोहळ्याचे त्यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण सांगण्यास सांगितले. तिन्ही साधकांनी आपापले सूक्ष्म-परीक्षण सांगितल्यावर सद्गुरु (सौ.) बिंदाताई म्हणाल्या, हे तीनही साधक सनातनसाठी दैवी वरदानच आहेत. त्यांचे परीक्षण ऐकतच रहावेसे वाटते. बलाढ्य शक्तींशी लढत आणि त्रास झेलत गुरुकृपेने तीनही ज्ञान प्राप्तकर्त्या साधकांनी जन्म-मृत्यूचा फेरा चुकवला आहे. तिघांनीही ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे. त्यासाठी गुरुचरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे !

(टीप : वरील सूक्ष्म-परीक्षणाचा सविस्तर परीक्षण लवकरच प्रसिद्ध करत आहोत.)

भावसोहळ्याचे सूक्ष्म-परीक्षण

१. श्री. राम होनप

भावसोहळ्याचे सूक्ष्म-परीक्षण करतांना अनेक बारकावे जाणवले. सद्गुरु बिंदाताई बोलू लागल्यावर चैतन्य कार्यरत झाले. त्याचा पाताळातील मोठ्या वाईट शक्तींना राग आला. साधक त्यांच्या अनुभूती सांगतांना प.पू. गुरुदेव आणि देवता उपस्थित असल्याचे जाणवले. साधक बोलू लागल्यावर भावलहरी कार्यरत झाल्या.

२. श्री. निषाद देशमुख

वैकुंठासारखा पवित्र चैतन्याचा झरा सोहळ्याच्या ठिकाणी कार्यरत झाल्याचे जाणवले. भावार्चना करतांना श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र कार्यरत झाले असून ते साधकांच्या साधनेतील सर्व अडथळे नष्ट करत आहे, असे जाणवले. सद्गुरु बिंदाताई आणि भावसत्संग घेणार्‍या साधिका बोलतांना साक्षात् गुरुवाणी बोलत आहे, असे जाणवले.

३. कु. मधुरा भोसले

अ. श्री. गणेश गावडेआजोबा यांच्यात भगवंताप्रती व्यक्त भाव असून ते भक्तीमार्गी आहेत.

आ. श्री. नाना आग्रे यांच्यात स्थिरता असून ते कर्ममार्गी आहेत.

इ. श्री. अमित हडकोणकर यांच्यात अव्यक्त भाव असून ते कर्ममार्गी आहेत.

ई. कु. सुमन सिंह यांच्यात चांगली ऊर्जा असून त्या भक्ती आणि ज्ञानमार्गी आहेत.

उ. कु. मीरा या भक्ती आणि कर्ममार्गी आहेत. आध्यात्मिक प्रगती केलेल्या सर्व साधकांमध्ये भाव असून कु. मीरा यांच्यामध्ये भगवंताप्रती भक्ती आहे. भक्तीचा वातावरणावर सर्वाधिक परिणाम झाला.

सूक्ष्मातून काय होते आणि त्यामागील शास्त्र काय ?, यांसंदर्भातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांची जिज्ञासा देवाने त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे देणार्‍या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांच्या माध्यमातून पूर्ण करणे

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना तीव्र आध्यात्मिक त्रास असूनही ज्ञानप्राप्तीची सेवा आतापर्यंत जमेल तेव्हा तळमळीने रात्रंदिवस करणे

देवाने वर्ष २००३ पासून सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. राम होनप आणि सौ. (आताच्या सद्गुरु) अंजली गाडगीळ, वर्ष २००४ पासून कु. मधुरा भोसले आणि वर्ष २००५ पासून श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून ज्ञान देण्यास आरंभ केला. श्री. राम होनप, कु. मधुरा भोसले आणि श्री. निषाद देशमुख या तिन्ही ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांचे वैशिष्ट्य म्हणजे तिघांनाही तीव्र आध्यात्मिक त्रास आहे, तरीही त्यांनी ज्ञानप्राप्तीची सेवा आतापर्यंत जमेल तेव्हा तळमळीने रात्रंदिवस केली आहे. त्यांना मिळालेल्या वैशिष्ट्यपूर्ण ज्ञानामुळेच सप्टेंबर २०१८ पर्यंत सनातन संस्थेच्या ३१० ग्रंथांच्या देश-विदेशांतील १७ भाषांत ७३ लाख ६७ सहस्र प्रती छापून झाल्या.

२. नाविन्यपूर्ण ज्ञानाचा अहंभाव नसणे आणि एकमेकांविषयी हेवा, मत्सरही न वाटणे

एखाद्या लेखकाने थोडे ग्रंथ लिहिले, तरी त्यांना त्याचा अहंभाव असतो. त्या ग्रंथाचा विषयही स्थुलातील आणि ठराविकच असतो. या तिघा ज्ञानप्राप्तकर्त्यांना प्रतिदिन सूक्ष्मातील आतापर्यंत पृथ्वीवर कुठेही उपलब्ध नसलेले मोठ्या आकाराची कितीतरी पाने नाविन्यपूर्ण ज्ञान मिळत आहे; पण त्यांना त्याचा जराही अहंभाव नाही, तसेच त्या तिघांना एकमेकांचा हेवा, मत्सरही वाटत नाही. हे कौतुकास्पद आहे. तिघांनी एकाच वेळी ६१ टक्के पातळी गाठली, हे अधिक कौतुकास्पद आहे.

३. धारिकांचे अंतीम संकलन करण्यास सांगितल्यावर त्यानुसार प्रयत्न केल्याने तसे करता येणे

आरंभी तिघेही त्यांना मिळणारे ज्ञान केवळ टंकलिखित करून संकलन विभागाला व्याकरणदृष्ट्या पडताळण्यास देत होते. एकदा त्यांना तुमच्या ज्ञानाच्या धारिका संकलनाला न देता तुम्हीच अंतीम संकलन करून पडताळण्यास द्या, असे सांगितले. त्यानंतर त्या तिघांनीही पडताळलेल्या धारिकांमधील दुरुस्त्यांचा अभ्यास करणे, चुकलेला प्रत्येक शब्द १० वेळा लिहून काढणे, धारिका ५ – ६ वेळा पुन्हा पुन्हा वाचणे इत्यादी प्रयत्न चालू केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आता ते तिघेही अंतीम संकलक झाल्याने त्यांच्या धारिका थेटे पडताळण्यासाठी येत आहेत.

४. ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचा लाभ

श्री. राम होनप, श्री. निषाद देशमुख आणि कु. मधुरा भोसले यांचे आतापर्यंतचे सूक्ष्म परीक्षण त्यांना त्रास होऊ नये; म्हणून देवाने तिसर्‍या पाताळापर्यंतच मर्यादित ठेवले होते. आता तिघांनीही ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्यामुळे त्यांना पुढच्या पुढच्या पाताळांतील सूक्ष्म परीक्षण त्रास न होता करणे शक्य होणार आहे. याचा लाभ आपल्याला सातव्या पातळापर्यंत विस्तार असल्याने तिसर्‍या महायुद्धाच्या काळात होणार आहे.

पहिल्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका सौ. अंजली गाडगीळ यांनाही आध्यात्मिक त्रासामुळे तीव्र शारीरिक कष्ट व्हायचे. असे असूनही त्या आता सद्गुरु झाल्या आहेत. त्याचप्रमाणे श्री. राम होनप, श्री. निषाद देशमुख आणि कु. मधुरा भोसले या तिघांची प्रगती व्हावी, अशी श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करतो.

असे ज्ञानप्राप्तकर्तेे साधक सनातनला दिल्याबद्दल ईश्‍वराच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त करतोे. -(परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांची जाणवलेली गुणवैशिष्ट्य

१. श्री. राम होनप

श्री. राम होनप यांचा ज्ञानमार्ग असला, तरी त्यांना मिळणार्‍या ज्ञानाची भाषा अतिशय सोपी असते. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीलाही ते ज्ञान सहजतेने आकलन होते. श्री. राम होनप यांना मिळणार्‍या ज्ञानाचे वैशिष्ट्य म्हणजे ते वाईट शक्तींचे पाताळातही जाऊन परीक्षण करतात. त्यामुळे मांत्रिकांचे खरे स्वरूप उघड होण्यास साहाय्य होते. त्यामुळे ते रामवर आक्रमणे करतात. त्यामुळे त्याला होणार्‍या त्रासात वाढ झाल्याने त्याला जवळजवळ वर्षभर प्रतिदिन ८ घंटे उपाय करण्यास सांगितले होते. २ मासांपूर्वी त्याचे वडील, म्हणजे पू. होनपकाका आजारी असल्यामुळे रामला त्यांच्या सगुण सेवेची संधी मिळाल्याने त्या सेवेच्या माध्यमातून त्याच्यावर उपाय झाल्याने आता त्याला होणारा आध्यात्मिक त्रास उणावला आहे.

२. श्री. निषाद देशमुख

श्री. निषाद देशमुख यांचा ज्ञानमार्ग आहे. पूर्वी त्याला मिळणारे ज्ञान अतिशय क्लिष्ट भाषेत असायचे. त्याला मिळणार्‍या ज्ञानात ५ ओळींचे एक वाक्य असायचे. त्या ज्ञानात काळी शक्तीही पुष्कळ प्रमाणात असायची. निषादला होणार्‍या आध्यात्मिक त्रासात वाढ झाल्यामुळे ज्ञान मिळवण्याची सेवा काही वर्षे थांबवण्यास सांगितली होती. वर्ष २०१६ पासून त्याचा आध्यात्मिक त्रास उणावल्याने त्याला पुन्हा ज्ञान मिळवण्यास सांगितले. श्री. निषादला मिळणार्‍या ज्ञानाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला एखादा प्रश्‍न विचारला की, त्यावर न्यूनतम ५० पानांचा एखादा ग्रंथ सिद्ध होईल, एवढ्या विपुल प्रमाणात त्याला ज्ञान मिळते. समाजाचा सूक्ष्मातील ज्ञानापेक्षा वैज्ञानिक भाषेवर अधिक विश्‍वास असतो. त्यामुळे निषाद त्याला मिळालेल्या ज्ञानाच्या धारिकेत आवश्यक त्या सूत्रांना संकेतस्थळावरून संदर्भ शोधून तो जोडतो. तसेच ज्ञानाच्या धारिका वाचतांना जो मजकूर मी ग्रंथासाठी निवडतो आणि जो मजकूर चुकीच्या ज्ञानासाठी वेगळा काढतो, तोही आता निषादला माहित झाल्यामुळे तो धारिका देतांनाच तसे वर्गीकरण करून देतो. त्यामुळे माझा तेवढा वेळ वाचतो. यातून त्याची परिपूर्ण सेवा करणे आणि समाजाला काय पटेल, याचा विचार करण्याची तळमळ दिसून येते. ज्ञानाच्या धारिकेत एखादे सूत्र न कळल्यास मी पुन्हा त्याला प्रश्‍न विचारतो. तेव्हा तो निष्काळजीपणामुळे झालेली चूक, असे लिहून प्रायश्‍चित्त घेणार, असे लिहून धारिका पुन्हा मला पडताळण्यासाठी ठेवतो. यातून त्याची ज्ञान मिळवतांना असणारी अंतर्मुखता दिसून येते.

३. कु. मधुरा भोसले

काही वर्षांपूर्वी मधुराचा आध्यात्मिक त्रास पुष्कळ प्रमाणात वाढल्याने ती रहात्या खोलीतच दिवसभर रहात होती. ५ वर्षे ती रहात्या खोलीतून बाहेर आली नव्हती. तिच्यातील ईश्‍वराप्रती असलेल्या भावामुळे त्या काळात तिला पुष्कळ अनुभूतीही आल्या. त्या काळात तिने विविध देवतांची भावमय अशी सुंदर चित्रे रेखाटली. त्यामुळे त्या माध्यमातून तिची साधना होऊन तिची प्रगती झाली. तिच्यातील भावामुळे खोलीतील चैतन्यात वाढ झाली आहे. वर्ष २०१६ पासून तिला ज्ञान मिळण्यास पुन्हा आरंभ झाला. मधुराचा भक्तीमार्ग आहे. त्यामुळे तिची ज्ञान लिखाणाची भाषा अतिशय सोपी आणि सर्वसामान्यांना कळेल अशी असते. तिने केलेल्या एखाद्या विधीचे सूक्ष्म परीक्षण वाचतांना जणू त्या विधीच्या वेळी सूक्ष्मातून घडणार्‍या घटना आपण प्रत्यक्ष अनुभवत आहोत, असे वाटते.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आश्रमात झालेल्या भावसत्संगाचे सूक्ष्म-परीक्षण प्रथमच झाले. सूक्ष्म-परीक्षण करण्याची सेवा ही दैवी सेवा आहे आणि ती सेवा करणारे साधकही दैवी आहेत. ज्ञान-प्राप्तकर्त्या साधकांच्या प्रगतीची वार्ता ही सनातनच्या सर्वच साधकांसाठी आनंददायी वार्ता आहे. त्यांच्या प्रगतीची अनेक साधक आतुरतेने वाट पहात होते.

– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ

या सोहळ्याचे वृत्त समजल्यावर सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ म्हणाल्या, एकाच वेळी ज्ञान-प्राप्तकर्ते साधक जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले, ही ऐतिहासिक घटना आहे.

सूक्ष्म-ज्ञान प्राप्तकर्त्या साधकांनी व्यक्त केलेले मनोगत

१. श्री. राम होनप – माझा विश्‍वासच बसत नाही !

माझा यावर विश्‍वासच बसत नाही. माझी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्यावर मी काय सांगेन, या संदर्भात मी आधीच लिहून ठेवले होते; परंतु आज मी ते विसरलो. मी नागेशी येथील शिवाच्या देवळात नामजपादी उपायांसाठी जात असे. तेव्हा तेथील देवतांनी मला सूक्ष्मातून सांगितले होते की, तू ६१ टक्के पातळी गाठल्यावर आम्ही त्या सोहळ्याला उपस्थित राहू. आज परीक्षण करतांना देवतांचे अस्तित्व जाणवले. या प्रसंगी श्री. राम यांनी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्याविषयी दूरचित्रवाहिनीवरील एका मालिकेतील गीत ऐकवले आणि ते प.पू. गुरुदेवांच्या चरणी समर्पित केले.

२. श्री. निषाद देशमुख – सर्व काही आपोआपच झाले !

आम्ही तिघेही ज्ञान प्राप्त करण्यासाठी चर्चा करत होतो. तेव्हा आपल्या तिघांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी एकत्रितच गाठूया. मी खूप काही प्रयत्न केले असे नाही. गेल्या काही मासांपासून श्रीगुरूंनीच मनाची प्रक्रिया करवून घेतली. भाव वाढवला. सर्व काही आपोआपच झाले.

३. कु. मधुरा भोसले – देवाने मला सूक्ष्मातूनच तुम्ही तिघे आज जीवनमुक्त व्हाल !, असे आधीच सांगितले होते !

तुम्ही तिघे (सूक्ष्म-ज्ञान प्राप्तकर्ते साधक) आज जीवनमुक्त व्हाल ! केवळ तुम्ही ते गुपित आताच सांगू नका. सद्गुरु बिंदाताई सांगतील, असे देवाने मला सूक्ष्मातून सत्संगाच्या आरंभीच सांगितले होते. एकदा प.पू. गुरुदेवांनी सांगितले होते की, मनुष्यजन्म मिळाला आहे, तर मनुष्याने किमान संतपद प्राप्त करण्याचा उद्देश ठेवायला हवा. आज आम्ही ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, म्हणजे त्या दिशेने केवळ आरंभ झाला आहे. अजून पुष्कळ शिकायचे आणि प्रयत्न करायचे आहेत.

ज्ञान प्राप्तकर्त्या साधकांची त्यांचे कुटुंबीय आणि सहसाधक यांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये !

१. श्री. राम होनप

१ अ. सनातनचे संत पू. पद्माकर होनप (वडील) : केवळ प.पू. गुरुदेवांमुळेच राम जिवंत आहे. हे सर्व गुरुकृपेमुळेच झाले. आमची काहीच क्षमता नाही.

१ आ. कु. दीपाली होनप (बहीण) : वर्ष २००३ पासून राम आध्यात्मिक त्रासाशी सतत लढत आहे. अनेक वेळा त्रासामुळे तो बेशुद्ध पडला आहे. तो म्हणतो, ज्ञान प्राप्त करण्याची सेवा म्हणजे सूक्ष्मातील युद्धच असते ! लढत-लढत एक-एक वाक्य लिहितो. राम तत्त्वनिष्ठ आहे. गेले काही मास बाबा आजारी असल्याने आम्ही दोघे पुण्यात होतो. एरव्ही रामला त्रास झाल्यावर त्याला स्वत:चे ही काही करता येत नाही; परंतु बाबांच्या सेवेच्या वेळी त्याला देवानेच शक्ती पुरवली. तो सर्व क्षमतेनिशी त्यांची सेवा करू शकला.

१ इ. श्री. सुरेंद्र होनप (भाऊ) : आजारपण सहन कसे करावे, ते रामकडून शिकावे. त्याला ७-८ वर्षांपूर्वी पुष्कळ ताप आला होता. जवळपास दीड वर्षे त्याला ताप येत-जात असे. त्या वेळीही त्याने हे सर्व सहन केले. त्याची कधीच चिडचिड झाली नाही. (श्री. सुरेंद्र यांची भावजागृती झाल्याने ते पुढे काही बोलू शकले नाहीत.)

२. श्री. निषाद देशमुख

२ अ. श्री. श्याम देशमुख (वडील) : प.पू. गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता ! निषाद केवळ त्यांच्या कृपेनेच सर्व आध्यात्मिक त्रास सहन करू शकला.

२ आ. सौ. क्षिप्रा देशमुख (आई) : सर्व करणारा ईश्‍वरच आहे.

२ इ. कु. निधी देशमुख (बहीण) : आध्यात्मिक त्रासामुळे निषादला वर्ष २००९ मध्ये श्‍वास घेता येत नव्हता. तेव्हा तो जगेल का ?, असे आम्हाला वाटले. प.पू. गुरुदेवांनीच त्याची काळजी घेतली. आम्हाला साधना समजली नसती, तर आम्ही सूक्ष्मातील वाईट शक्तींच्या आधीन झालो असतो.

३. कु. मधुरा भोसले

३ अ. डॉ. भिकाजी भोसले (वडील) : मधुरा आज जिवंत आहे, ती केवळ प.पू. गुरुदेवांची कृपाच आहे. आम्ही सनातनमध्ये वर्ष १९९८ मध्ये आलो. तेव्हापासून मधुराची अध्यात्माविषयी प्रचंड जिज्ञासा आहे. प.पू. गुरुदेवांनी तिला घडवूनच पुढे आणले.

३ आ. डॉ. (सौ.) कस्तुरी भोसले (आई) : कु. मधुरा आजारी असल्याने खोलीतच असते, तरीही आम्हाला प.पू. गुरुदेवांचे अस्तित्व खोलीत सतत जाणवते. गुरूंनी तिला मरणाच्या दाढेतून अनेक वेळा बाहेर काढले आहे. (या वेळी सौ. भोसले यांचा भाव जागृत झाल्याने त्या बोलू शकल्या नाहीत.)

३ इ. सौ. तृप्ती स्वप्निल भोसले (वहिनी) : मधुराताईंना होणारा आध्यात्मिक त्रास शब्दात सांगू शकत नाही. त्रासाचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना शोधण्याचा त्या प्रयत्न करतात. सासूबाई ताईंना त्रासाशी लढण्यामध्ये त्यांच्या स्तराला जाऊन साहाय्य करण्याचा पुष्कळ प्रयत्न करतात. मधुराताई तत्त्वनिष्ठ आहेत, तसेच त्यांची समष्टीप्रती पुष्कळ तळमळ आहे. त्रासातही त्या पुष्कळ प्रयत्न करतात. मी ताईंना काही विचारले, तर माझ्या सर्व समस्या सुटतात. ॐ

आध्यात्मिक उन्नती केलेल्या साधकांनी व्यक्त केलेले मनोगत

१. श्री. गणेश गावडेआजोबा यांना अर्धांगवायू झाल्याने ते झोपून असतात. त्यांना बोलताही येत नाही; मात्र त्यांची पातळी घोषित झाल्यावर त्यांनी हात जोडले. त्यांच्या डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागले आणि तोंडवळ्यावर कृतज्ञताभाव दिसू लागला. साधक त्यांची वैशिष्ट्ये सांगत असतांना ते हुंकार देत होते. काकांनी शब्दातीत कृतज्ञता व्यक्त केली, असे या वेळी सद्गुरु बिंदाताई यांनी सांगितले.

२. प्रयत्नांत सातत्य ठेवले ! – श्री. नाना आग्रे

गेल्या काही दिवसांपासून आजारपणामुळे सेवा करता येत नव्हती. तेव्हा काय सेवा करू शकतो, याचे चिंतन केले. एके दिवशी सकाळी एक संत आश्रमात चालण्याचा व्यायाम करत होते. ते मला म्हणाले, थोडे बरे वाटत आहे. त्यामुळे पायर्‍या चढण्या-उतरण्याचा व्यायाम करत आहे.
त्या वेळी संत एवढे करू शकतात, तर मीही करायला हवे, याची जाणीव झाली आणि मी व्यायामाला आरंभ केला. काही चुका झाल्यामुळे माझी पातळी घसरली, तेव्हा पुष्कळ खंत वाटली होती; पण मी सातत्याने प्रयत्न करत राहिलो. सेवेत ऐकणे, विचारणे, शिकणे आणि कृती करणे, असे प्रयत्न केले. शरणागत भाव वाढवण्याचा प्रयत्न केला. भावसत्संगाला जाऊ लागल्यापासून सतत भावात कसे राहायचे, ते शिकायला मिळाले.

३. असे काही होईल, असे वाटले नव्हते ! – श्री. अमित हडकोणकर

असे काही होईल, असे वाटले नव्हते. मी असे काही ध्येयही ठेवले नव्हते. माझ्याकडून काही प्रयत्नही झाले नाहीत. गुरूंच्या कृपेमुळेच हे सर्व झाले. साधनेच्या प्रयत्नांविषयी सांगताना श्री. अमित हडकोणकर म्हणाले, माझ्या सेवेशी अन्य साधकांचा फारसा संबंध येत नसल्याने सेवा मीच करतो आणि त्यातील चुकाही मलाच शोधाव्या लागतात. एखादी सेवा झाल्यावर त्या सेवेत कुठे त्रुटी राहिली असेल, तर सेवेत काहीतरी राहिले आहे, असे मला वाटते. तेव्हा केलेली सेवा पुन्हा पडताळल्यावर त्यात राहिलेली त्रुटी लक्षात येते. सेवेत त्रुटी राहिली, हे देवच सांगतो, असे अनेकदा अनुभवले. पूर्वी मला इतरांनी काही सांगितल्यावर स्वीकारता येत नसे. त्यावर हळूहळू प्रयत्न करायला आरंभ केला. साधकांना त्यांच्या सेवेत साहाय्य करण्याचे प्रयत्न चालू केले. आता कोणी काही सांगितले की करायचे, अशी सवयच लागली आहे.

४. वाराणसी येथून आश्रमात येतांना तेथील साधकांनी आश्रमात जाऊन प्रगती करण्याचे ध्येय दिले होते. आता त्यांची आठवण आली ! – कु. सुमन सिंह

मी वाराणसीहून रामनाथी आश्रमात येतांना तेथील साधकांनी मला आश्रमात जाऊन प्रगती कर, असे म्हटले होते. तेव्हा त्यांनी सांगितले; म्हणून मी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठण्याचे ध्येय ठेवले. सद्गुरु बिंदा माँ यांनी पातळी घोषित केल्यावर वाराणसीच्या साधकांची आठवण आली. (कु. सुमन सद्गुरु बिंदाताई यांना सद्गुरु बिंदा माँ, असे संबोधते.)

५. मला गुरुसेवाच करायची आहे, आध्यात्मिक पातळी इत्यादी काही नको ! – कु. मीरा

मला सदैव गुरुचरणीच रहायचे आहे. गुरुसेवाच करायची आहे, आध्यात्मिक पातळी इत्यादी काही नको. मी सेवेत पुष्कळ अल्प पडते. देवाला अपेक्षित असे मला करता येत नाही. मला देवाची मीरा बनायचे आहे.

प्रगती केलेल्या साधकांची सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी भावसोहळ्यात उलगडलेली गुणवैशिष्ट्ये !

१. श्री. गणेश गावडेआजोबा

भावार्चना करत असतांना आजोबांच्या तोंडवळ्यावरचे भाव पहातच रहावे, असे वाटत होते. आजारी असले, तरी आजोबा देवाच्या अनुसंधानात राहून शब्दांच्या पलीकडील ईश्‍वरी आनंद अनुभवतात. आजोबांनी मुलगा श्री. घनश्याम याचा राष्ट्र-धर्मासाठी त्याग केला आहे. श्री. घनश्यामदादांकडून त्यांच्या अपेक्षा नसतात. काका सतत भावस्थितीत असतात. आवश्यक त्या वेळी ईश्‍वर त्यांना शारीरिक हालचाली करण्यासाठी बळही देतो. त्यांच्या तोंडवळ्यावर निरागसता दिसते. त्यांच्या केसांवरही पिवळसर छटा दिसते, हे त्यांची आंतरिक साधना चांगली चालू असल्याचे निदर्शक आहे. काकांच्या सेवेमुळे घनश्यामदादा आणि राधाताई (सून) यांच्या सेवेत कोणताही अडथळा आलेला नाही.

२. श्री. नाना आग्रे

आपली सेवा अशी हवी की, ज्यामुळे सहसाधक आणि उत्तरदायी साधक यांना आधार वाटला पाहिजे. यांना सेवा दिली की, ती परिपूर्ण होणारच, असा साधकांना विश्‍वास वाटला पाहिजे, याचे उदाहरण म्हणजे श्री. नाना ! आजारपणातही काय सेवा करू शकतो, याचे चिंतन करून नानांनी कृती केली. आजारपणामुळे दु:खी न होता त्यांनी परिपूर्ण सेवेची तळमळ जागृत ठेवली. पातळी न्यून झाली म्हणून न डगमगता, निराश न होता प्रयत्न केल्यास गुरु प्रयत्नांना बळ देतात, हे नानांच्या उदाहरणातून शिकायला मिळते. समष्टी सेवेच्या तळमळीसह नानांमध्ये व्यष्टी साधना आणि व्यायाम यांचेही गांभीर्य आहे. त्यांनी भावसत्संगाचाही लाभ करून घेतला.

३. श्री. अमित हडकोणकर

श्री. अमितदादा पुष्कळ पूर्वीपासून लेखाशी संबंधित सेवा करत आहेत. भगवंताने त्यांची सेवेसाठी केलेली निवड योग्य आहे, हे त्यांनी दाखवून दिले. श्री. अमितदादा प्रतिदिन पणजी जवळील पाळे-शिरदोन येथून आश्रमात सेवेसाठी येतात. सेवेतील वेळ वाया घालवत नाहीत. आश्रमातील भांडी घासण्याच्या आणि अन्य सेवांमध्येही सहभागी होतात. कोणतीही सेवा ते आनंदाने स्वीकारून ती परिपूर्ण करतात. त्यांच्यामुळे सेवेत कोणती अडचण आली आहे, असे आतापर्यंत कधीच झालेले नाही. त्यांनी कधीही सेवेचा कंटाळा केला नाही.

४. कु. सुमन सिंह

सुमनच्या बोलण्यामध्ये पुष्कळ सहजता असते. गेले २ मास ती आश्रमात राहून व्यष्टी साधना कशी करायची, ते शिकत आहे. तिचे बोलणेही ऐकत रहावेसे वाटते. वाराणसीहून नव्या ठिकाणी गेल्यावर तेथील साधकांशी कसे बोलू, असा विचार करण्याऐवजी ती त्यांच्याशी सहजतेने बोलते. तिच्यामध्ये प्रतिमेचा विचार नसल्याने ती सर्वांशी मनमोकळेपणाने बोलू शकते.

५. कु. मीरा

कु. मीरा ही सदैव अंतर्मुख आणि भगवंताच्या अनुसंधानात असते. साधकांशी बोलत असतांनाही तिचे भगवंताशी अनुसंधान आहे, असे जाणवते. तिचा परात्पर गुरूंविषयी अपार भाव आहे. तिला व्यष्टीच्या प्रयत्नांसंदर्भात जे काही कळते, ते सर्व ती कृतीत आणते. साधनेच्या प्रयत्नांसंदर्भात ती सवलत घेत नाही. सतत गुरूंना अपेक्षित असे करण्याच्या तीव्र तळमळीपोटी तिने ६३ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे.

(टीप : ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या अन्य साधकांची त्यांचे कुटुंबीय आणि सहसाधक यांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात.


Multi Language |Offline reading | PDF