पाकिस्तानच्या घुसखोरीला सडेतोड प्रत्युत्तर देण्याची भारताची सिद्धता आहे ! – सैन्यप्रमुख

भारतीय सैनिकांची लढण्याची सिद्धता आहे; मात्र शासनकर्त्यांकडे लढण्याची इच्छाशक्ती नाही !

कोल्हापूर, १ नोव्हेंबर (वार्ता.) – नक्षलवाद्यांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे. त्यामुळे ते सामान्य नागरिकांना लक्ष्य करत आहेत; मात्र त्यांच्या विरोधात निमलष्करी दलाची कारवाई चांगल्या पद्धतीने चालू असून यावर शंका घेण्याचे कारण नाही. गुप्तचर यंत्रणेच्या अहवालानुसार आगामी काळात पाकिस्तानातून काश्मीरसह इतर ठिकाणी घुसखोरी वाढू शकते. त्याला सडेतोड उत्तर देण्याची भारताची सिद्धता आहे. त्यासाठी भारतीय सैन्याकडे सर्व अत्याधुनिक यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती सैन्यप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी ३१ ऑक्टोबरला येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. मराठा लाइट इन्फंट्रीच्या येथील माजी सैनिकांचा मेळावा टेंबलाई परिसरात आयोजित केला होता. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

जनरल बिपीन रावत पुढे म्हणाले की,

१. सैन्य प्रसंगानुरूप शत्रूंवरील चढाईचे आडाखे पालटत असते. त्यामुळे स्नायपरच्या (लांबच्या लक्ष्याचा अचूक वेध घेणारे) साहाय्याने आतंकवादी भारतीय सैन्याचे डावपेच टिपतात, असे म्हणणे चुकीचे आहे. सैन्याचे नियोजन अत्यंत गोपनीय असते.

२. इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान झाल्यानंतर भारतीय सैन्य अत्यंत सतर्क झाले आहे. पाकिस्तानात चालू असलेल्या हालचालीनुसार धोरणात आवश्यक ते पालट केले जात आहेत. भारतीय सैन्याची कोणत्याही क्षणी ‘जशास तसे’ उत्तर देण्याची सिद्धता आहे. अत्याधुनिक हत्यारांसमवेतच सैन्यात तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर भर देण्यात येत आहे.

‘मराठा लाइट इन्फंट्री’ छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवलेल्या मार्गदर्शनानुसार कार्य करते !

‘मराठा लाइट इन्फंट्री’च्या पराक्रमाचा गौरव करून रावत म्हणाले की, इन्फंट्रीला या वर्षी २५० वर्षे पूर्ण झाली. इतक्या वर्षांत इन्फंट्रीच्या सैनिकांनी रणभूमीत प्रचंड मोठी कामगिरी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा आदर्श घेत सैनिक युद्धभूमीत उतरतात. शत्रूला भिडून त्यांनी अनेकदा विजयश्री खेचून आणली आहे, यासाठीच मराठा सैनिकांच्या विरोधात लढतांना शत्रूही थरथर कापतो. पराक्रमाचा हा आलेख यापुढील काळातही असाच उंचावत जाईल. ‘मराठा लाइट इन्फंट्री’ छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवलेल्या मार्गदर्शनानुसार कार्य करते.


Multi Language |Offline reading | PDF