सौरयागाचे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व

सौ. प्राजक्ता जोशी

‘रविवार, आश्‍विन शुक्ल पक्ष द्वादशी (२१.१०.२०१८) या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात ‘सौरयाग’ झाला. ज्योतिषशास्त्रात सूर्याला जगत्पिता संबोधले जाते; कारण सूर्य सर्व ग्रहांचे आणि पृथ्वीचे पोषण करतो. सूर्य बीजोत्पादक, बीजपोषक आणि बीजसंवर्धक आहे. वेदशास्त्रात आत्म्याला ‘सूर्य’ म्हटले आहे. सर्व चराचर जगाचा आत्मा ‘सूर्य’ आहे.

१. तूळ राशीतील रवि भ्रमणकालात सौरयाग करण्याचे महत्त्व

भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार १७ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर या काळात रवि तूळ राशीत असतो. तुळ राशीतील रवि अशुभ मानला आहे. रवि एका राशीत एक मास असतो. यातील प्रथम पाच दिवस तो फल देतो. १७.१०.२०१८ या दिवशी सायंकाळी ६.४४ वाजता रवि ग्रहाने तुळ राशीत प्रवेश केला. ‘साधकांवर तुळ राशीतील रवि ग्रहाचा प्रतिकूल परिणाम होऊ नये’, यासाठी रवि ग्रहाच्या पुण्यकालात परात्पर गुरुदेवांनी १७.१०.२०१८ पासून जप आरंभ केला. जप ४० दिवस करायचा आहे. तूळ राशीतील रवि प्रवेशानंतर २१.१०.२०१८ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात ‘सौरयाग’ झाला.

२. सौरयागामुळे होणारे लाभ

रवि ग्रहाच्या प्रतिकूल काळात रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील सात्त्विक वातावरणात सद्गुरु आणि संत यांच्या उपस्थितीत, तसेच सात्त्विक पुरोहितांच्या हस्ते ‘सौरयाग’ केल्यामुळे साधकांना रवि ग्रहाच्या प्रतिकूलतेचा त्रास होणार नाही.

३. रवि ग्रहाची वैशिष्ट्ये

शरिराला नैसर्गिक शक्ती आणि प्रतिकार करण्याची शक्ती रवि ग्रहामुळे मिळते. शरिरातील अवयवांपैकी रवीचा अधिकार हृदयावर आहे. शरिरातील रक्ताभिसरण क्रिया, तसेच नेत्र, रक्त आणि शरिरातील शिरा यांवर रवि ग्रहाचा प्रभाव आहे. जगातील सर्वोत्तम नीती, अंतःस्फूर्ती, शुद्ध सात्त्विक उच्च विचार, शत्रूवर विजय, मनाचा खंबीरपणा, स्थिर स्वभाव, ध्यानधारणा, अंतर्ज्ञान यांचा कारक रवि ग्रह आहे. जन्मकुंडलीतील रवि ग्रहावरून पित्याचे सुख अभ्यासतात.’

– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, रामनाथी, गोवा. (२१.१०.२०१८)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now