आखाती देशांत महिलांना नोकरीचे आमीष दाखवून वेश्याव्यवसायाची बळजोरी करणार्‍या तिघांना अटक

अधूनमधून उघडकीस येणार्‍या या गुन्ह्याविषयी शासनकर्ते काही उपाययोजना करणार का ?

मुंबई – आखाती देशांत उपाहारगृहामध्ये नोकरीचे आमिष दाखवून गरजू आणि गरीब महिलांना वेश्याव्यवसाय करण्याची बळजोरी केली जात होती. यासाठी सक्रीय असणार्‍या  टिंकू दिनेश राज उपाख्य टिपू, मोहम्मद कमाल अन्वर शेख, फरीद उल हक शहा या दलालांना ‘मुंबई खंडणीविरोधी पथका’ने अटक केली. त्यांना न्यायालयाने २ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या कचाट्यात ५० ते ६० महिला अडकल्या आहेत, तसेच चौकशीच्या वेळी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा सूत्रधार आणि बहरीनमध्ये हॉटेल व्यवसाय करणार्‍या मुख्य आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

नोकरीच्या आमिषाला बळी पडलेल्या बहुतांश महिला पूर्वाश्रमीच्या बारबाला आहेत, तसेच यांत बांगलादेश, राज्यस्थान आणि नेपाळ येथील महिलाही आहेत. आखाती देशात गेल्यावर फसवणूक झाल्याचे लक्षात आलेल्या राजस्थान येथील महिलेच्या कुटुंबियांनी तिच्या सुटकेसाठी मुंबईत दलालांना २ लाख रुपये दिले होते. ती भारतात परतल्यावर तेथे अडकलेल्या भारतीय महिलांच्या व्यथा समजल्या आहेत. मुंबई खंडणी विरोधी पथक आखाती देशातील भारतीय दूतावासाशी संपर्कात आहे. या दलालांच्या विळख्यात अडकलेल्या महिलांच्या सुटकेसाठी प्रयत्नशील असल्याचे माहिती पोलिसांनी सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF