निर्दोष सुटका झालेल्या १६ सैनिकांना देहली उच्च न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा

हाशीमपुरा हत्याकांड प्रकरण

देहली उच्च न्यायालयाकडून कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्दबातल !

एका न्यायालयाचा निर्णय दुसर्‍या न्यायालयात पालटला जातो, ही त्रुटी दूर करण्यासाठी सरकार काय कृती करणार आहे ?

नवी देहली – वर्ष १९८७ मध्ये झालेल्या हाशीमपुरा हत्याकांडाच्या प्रकरणी निर्दोष सुटका झालेल्या उत्तरप्रदेश पोलीस दलातील पीएसीच्या (Provincial Armed Constabulary) १६ सैनिकांना देहली उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. हाशीमपुरा हत्याकांड प्रकरणात २९ वर्षांनंतर निकाल देत देहलीच्या तीस हजारी न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी २१ मार्च २०१५ मध्ये १६ आरोपींची निर्दोष सुटका केली होती. यावर उत्तरप्रदेशमधील तत्कालीन सरकार, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि अन्य काही लोक यांनी तीस हजारी न्यायालयाच्या या निर्णयाला देहली उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने या याचिकांवर एकत्रित सुनावणी करून सप्टेंबर २०१८ मध्ये अंतिम निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर २१ ऑक्टोबर २०१८ला देहली उच्च न्यायालयाने तीस हजारी न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवत १६ सैनिकांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

काय आहे हाशीमपुरा हत्याकांड प्रकरण ?

१. फेब्रुवारी १९८६ मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने अयोध्येतील वादग्रस्त भूमीवरील वास्तूचे कुलूप उघडण्याचा आदेश दिल्यानंतर उत्तरप्रदेशमधील मेरठमधील वातावरण तणावपूर्ण बनले होते.

२. १४ एप्रिल १९८७ मध्ये मेरठमध्ये दंगल उसळली. अनेक लोकांच्या हत्या झाल्या, मोठ्या प्रमाणात सार्वजनिक मालमत्तेची हानी झाली. ही दंगल अटोक्यात आणण्यासाठी पीएसीच्या सैनिकांना पाचारण करण्यात आले होते. नंतर या तुकडीला हटवण्यातही आले होते.

३. १९ मे १९८७ या दिवशी मेरठमध्ये पुन्हा दंगल भडकली. यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे येथे संचारबंदी लागू करण्यात आली होती. याशिवाय पीएसीच्या सैनिकांना पाचारण करण्यात आले.

४. २२ मे १९८७ या दिवशी मुसलमानबहुल हाशीमपुरा येथे ‘प्लाटून कमांडर सुरेंद्रपाल सिंह यांच्या नेतृत्वाखाली १९ पीएसी सैनिकांची तुकडी बंदोबस्तासाठी पाठवण्यात आली होती.

५. या तुकडीवर आरोप होता की, तिने ४० ते ४५ जणांना एका ट्रकमध्ये भरून मुरादनगर येथे नेले अन् तेथे त्यांना गोळ्या घालून त्यांचे मृतदेह नदीत फेकले.

६. या घटनेतून वाचलेल्या काहींनी केलेल्या तक्रारीच्या आधारे प्रकरणाची चौकशी करण्यात आली.


Multi Language |Offline reading | PDF