सामाजिक प्रसारमाध्यमातून देवतांचे विडंबन करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी कल्याण येथे एकाला अटक

श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे धारकरी गोवेकर यांनी केली पोलिसात तक्रार !

असे कृतीशील हिंदुत्वनिष्ठ हेच हिंदु धर्माची शक्ती आहेत. धर्माविषयी असेच जागरूक राहिल्यास हिंदुद्वेष्ट्यांच्या कृत्यांना पायबंद बसेल !

कल्याण, ३१ ऑक्टोबर (वार्ता.) – येथील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामाजिक प्रसारमाध्यमातून देवतांचा अवमान करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान, कल्याणचे धारकरी श्री. गणेश गोवेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुद्धराज अर्जुनराव गवळी यांना २८ ऑक्टोबरला अटक करण्यात आली आहे.

१. कल्याण (पूर्व) परिसरात रहाणारे श्री. गणेश गोवेकर यांना २८ ऑक्टोबरच्या दुपारी ‘राजे प्रतिष्ठान’ या ‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या समूहावर हिंदूंच्या देवता आणि ब्राह्मण समाज यांच्याविषयी अत्यंत अश्‍लील भाषेत टीकात्मक संदेश पाहिला.

२. त्या संदेशातील लिखाणामुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या. हा संदेश त्या समूहातील बुद्धराज गवळी यांनी पाठवल्याची त्यांनी खात्री केली. तेव्हा त्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात त्वरित तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी बुद्धराज गवळी यांच्यावर ‘भा.दं.वि. २९५ अ’अन्वये गुन्हा प्रविष्ट करून त्यांना अटक केली आहे.

३. बुद्धराज गवळी हे विद्रोही कवी असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच त्यांनी अश्‍लील संदेश त्यांच्या फेसबूक खात्यावरूनही प्रसारित केल्याचे दिसून आले आहे. बुद्धराज गवळी हे आंबेडकरी साहित्य तत्त्वज्ञान विचारमंच, नागपूर या संघटनेचे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई विभागाचे जिल्हा अध्यक्ष असल्याचे नियुक्ती पत्र ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीकडे उपलब्ध झाले आहे.

४. तसेच अधिवक्ता सुधा जोशी यांनी ‘पोलिसांनी केवळ ‘भा.दं.वि. २९५ अ’अन्वये गुन्हा नोंदवून सोपस्कार पूर्ण केले असल्याविषयी’ अप्रसन्नता व्यक्त केली.

पोलिसांची अरेरावीची भूमिका !

‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराने श्री. गणेश गोवेकर यांच्याशी संपर्क साधला असता, गोवेकर यांनी सांगितले की, पोलिसांनी ही तक्रार प्रविष्ट करून घेण्यासाठी अनुमाने ६ घंटे आम्हाला ताटकळत पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. बुद्धराज गवळी यांच्या फेसबूक खात्यावर हिंदूंच्या देवतांचा अनादर करणारे अनेक संदेश कवितांच्या रूपाने मी पाहिले आहेत. अशा प्रकारचे संदेश गवळी यांनी सामाजिक माध्यमातून अनेक वेळा प्रसारित केले आहेत; परंतु सर्वांत प्रथम कल्याण येथे त्यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे. ‘गवळी यांच्यावर माहिती कायद्याच्या अंतर्गतही गुन्हा नोंदवा’, अशी विनंती पोलिसांना केली होती. पोलिसांनी मात्र ‘तुम्हाला आमच्यापेक्षा अधिक कळते, तर मग येथे का आलात’, असा प्रश्‍न करीत गप्प बसण्यास सांगितले. (अशी अरेरावी पोलिसांनी अन्य धर्मियांवरही केली असती का ? हिंदूंच्या तक्रारीची नोंद न घेणार्‍या पोलिसांची तक्रार त्यांच्या वरिष्ठांकडे करा आणि त्याची माहिती सनातन प्रभातलाही कळवा ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF