‘नेटफ्लिक्स’ या अ‍ॅपच्या आहारी गेलेल्या युवकाच्या प्रेयसीचा निराशेतून आत्महत्येचा प्रयत्न

विज्ञानाने केलेली अधोगती ! स्मार्टफोनच्या अतीउपयोगाचा प्राणघातकी दुष्परिणाम !

मुंबई – वाहिन्यांवरील मालिका आणि चित्रपट स्मार्टफोनवर पहाण्यासाठी उपयोग करत असलेल्या ‘नेटफ्लिक्स’ या अ‍ॅपच्या आहारी गेलेल्या युवकाच्या प्रेयसीने तिच्याकडे युवकाचे दुर्लक्ष होत असल्याने निराश होऊन आईच्या झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. महाविद्यालयात वाणिज्य शाखेत पदवीचे शिक्षण घेणार्‍या पश्‍चिम उपनगरातील या २४ वर्षीय तरुणीवर परळ येथील केईएम् रुग्णालयाच्या मानसोपचार विभागात ३ आठवड्यांपासून उपचार चालू आहेत.

व्यसनाधीन असलेल्या त्या तरुणावरही उपचार केले जाणार आहेत. ‘नेटफ्लिक्स’च्या व्यसनाला बळी गेलेला पहिला रुग्ण ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बंगळुरू (कर्नाटक) येथे आढळला आहे, त्याच्यावरही उपचार चालू आहेत. भविष्यात स्मार्टफोनवरील अशा अ‍ॅपच्या व्यसनाचा धोका अधिक संभावण्याची चिन्हे आहेत, अशी चिंता वैद्यकीय तज्ञ व्यक्त करत आहेत.

दिनक्रमातील गोष्टी थांबवून, त्यांचा क्रम मोडून अशा काही अ‍ॅप्सच्या आहारी जात असाल, तर हे व्यसन आहे, हे वेळीच ओळखा. कुटुंब-मित्रपरिवाराला वेळ न देणे, अभ्यास, कामे, जेवण सोडून अ‍ॅपला वेळ देणे, जागरण करून अ‍ॅप पहाणे या सर्व सवयी व्यसन होण्याची लक्षणे आहेत. या अवस्थेत व्यसन ओळखले नाही, तर पुढे ती व्यक्ती थेट ‘रोबोटिक’ अवस्थेत जाऊन व्यसनाधीन होते, अशी माहिती केईएम् रुग्णालयाच्या मानसोपचार विभाग प्रमुख डॉ. शुभांगी पारकर यांनी दिली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now