राष्ट्रीय भाववृद्धी सत्संगात सांगितल्याप्रमाणे ‘प्रत्येक दिवशी गुरुपौर्णिमा आहे’, असा भाव ठेवून कृती केल्यावर साधकांना स्वतःत जाणवलेले पालट आणि आलेल्या अनुभूती

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने झालेल्या राष्ट्रीय भाववृद्धी सत्संगात सर्व साधकांना गुरुपौर्णिमेच्या कालावधीत कार्यरत असलेले गुरुतत्त्व अधिकाधिक अनुभवण्यासाठी भावाच्या स्तरावर विविध प्रयत्न करायला सांगितले होते. गुरुपौर्णिमा ही केवळ एक दिवसाची नसून उत्तम शिष्याच्या आयुष्यात वर्षातील ३६५ दिवस गुरुपौर्णिमा असली पाहिजे. यासाठी सर्व साधकांनी उत्तम शिष्य बनणे आवश्यक आहे. श्री गुरूंनी केवळ याच जन्मात नाही, तर जन्मोजन्मी आपला सांभाळ केला आहे. अशा गुरूंप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. वर्षातून केवळ एकच दिवस, म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी कृतज्ञता व्यक्त करून गुरुऋणातून मुक्त होता येईल का ? ‘मोक्षप्राप्तीपर्यंत पदोपदी आणि क्षणोक्षणी गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करणे’, हे आपले आद्य कर्तव्यच आहे. शिष्याचे हे आद्यकर्तव्य पार पाडण्यासाठी ‘प्रत्येक क्षण म्हणजे गुरुपौर्णिमाच आहे’, असा भाव ठेवून प्रयत्न करण्यास भाववृद्धी सत्संगात सांगितले होते. ‘प्रत्येक कृती करत असतांना आपण गुरुपौर्णिमेचीच सेवा करत आहोत’, या भावाने प्रत्येक कृती करायला सांगितली होती. त्यानंतर साधकांनी या ध्येयासाठी आठवडाभरात केलेले प्रयत्न, हे प्रयत्न केल्याने त्यांना स्वतःत जाणवलेले पालट आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

(डावीकडून) कु. वैष्णवी वेसणेकर, सौ. कीर्ती जाधव आणि कु. योगिता पालन

१. श्री. धीरज बेंगरूट, पुणे

१ अ. ‘कोणतीही सेवा हे माझ्या गुरूंचेच कार्य आहे’, या भावाने ती सेवा स्वीकारण्यासाठी प्रयत्न केल्यावर देवाचे साहाय्य लाभून आनंद मिळणे : ‘२ आठवड्यांपूर्वी गुरुपौर्णिमा झाली. तेव्हापासून माझ्या मनात पुष्कळ कृतज्ञताभाव जाणवतो. सद्गुरु (कु.) स्वातीताईंनी (सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी) पुणे जिल्ह्यात आल्यावर एकदा सांगितले होते, ‘‘हा जिल्हा माझाच आहे अणि हे सर्व कार्यही माझेच आहे. माझ्यावरच माझ्या गुरूंचे सर्व कार्य अवलंबून आहे’, असा भाव ठेवून सेवेचे प्रयत्न करायला हवेत.’’ तेव्हापासून केंद्रातील अथवा समितीची कोणतीही सेवा आल्यावर ‘हे माझ्या गुरूंचेच कार्य आहे’, या भावाने ते स्वीकारण्याची माझ्या मनाची प्रक्रिया होते आणि त्यातून मला आनंदही मिळतो. भावाच्या स्तरावर प्रयत्न केल्यामुळे स्वतःत असा पालट झाल्याचे माझ्या लक्षात आले.

कोणतीही सेवा मिळाल्यावर ती लगेच स्वीकारली, तर ‘सेवा स्वीकारल्यानंतर दुसर्‍या क्षणाला अन्य साधकांच्या माध्यमातून साहाय्य मिळून ती सेवा लवकर पूर्ण होते’, अशी अनुभूती देव देतो.

आधी मला सेवांचा ताण यायचा; पण आता स्वीकारण्याची वृत्ती वाढत असल्यामुळे आणि देव साहाय्य करत असल्यामुळे मला आनंद मिळतो.’

२. सौ. नीला देसाई, कराड, जि. सातारा.

२ अ. ‘प्रतिदिन गुरुपौर्णिमा आहे’, असा भाव ठेवल्याने मनात कृतज्ञतेचा भाव जागृत झाल्याचे जाणवणे : ‘वर्षभर म्हणजे ३६५ दिवस गुरुपौर्णिमाच आहे’, हे सतत मनावर बिंबवल्यामुळे ‘गुुरुपौर्णिमेच्या दुसर्‍या दिवसापासून प्रतिदिन आपण गुरुपौर्णिमा साजरी करत आहोत’, असे मला वाटत आहे. ‘दिवसभरात आणि रात्री कोणतीही सेवा करतांना किंवा घरातील कामे करतांनाही आपण गुरुपौर्णिमा महोत्सवाचीच सेवा करत आहोत’, असे मला जाणवत आहे. त्यामुळे माझ्या मनात कृतज्ञतेचा भाव जागृत झाल्याचे जाणवत आहे.’

३. श्री. नरेंद्र भटकळ, दादर, मुंबई.

३ अ. भावपूर्ण सेवा केल्याने ‘समिती समन्वय शिबीर’ चांगल्या प्रकारे पार पडणे आणि शिबिरातील मुलांचा उत्साह वाढून त्यांना गुरुपौर्णिमेसारखा आनंद मिळणे : ‘उत्तम शिष्यासाठी प्रत्येक क्षण हा गुरुपौर्णिमेचाच असतो’, असे भाववृद्धी सत्संगात ऐकल्यापासून मी गुरुपौर्णिमेच्या सर्व सेवा त्याच भावाने करण्याचा प्रयत्न चालू केला. ‘त्याप्रमाणे प्रयत्न झाल्यावर ‘समिती समन्वय शिबीर’ अतिशय अल्प वेळेत, भावपूर्णपणे अन् फार चांगल्या प्रकारे पार पडले’, असे माझ्या लक्षात आले. त्यात मंडळांची उपस्थिती आणि सहभागही चांगला होता. त्यामुळे धर्मप्रेमी मुलांमध्ये उत्साह वाढला आणि पुढे असलेल्या १५ ऑगस्ट आणि श्री गणेशचतुर्थी या मोहिमांविषयी त्यांना सांगितल्यावर सर्वांना गुरुपौर्णिमेसारखा आनंद मिळाला अन् त्या आनंदातच ते शिबीर पार पडले. शिबिरात झालेल्या चुकांविषयी सर्वांना खंत वाटून त्या चुका सुधारण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्नही चालू झाले. ‘प्रत्येक क्षण आणि प्रत्येक उपक्रम हा गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला, तर विष्णुस्वरूप गुरुमाऊलींचा प्रत्येक क्षणोक्षणी, पदोपदी आपल्याला लाभ होणार आहे’, असे मला त्यातून शिकायला मिळाले.’

४. एक साधिका, कराड, जि. सातारा.

४ अ. पूर्वी सेवा करतांना ताण येणे; पण भाववृद्धीचे प्रयत्न केल्यावर सेवा करतांना ताण न येता आनंद मिळणे आणि ‘प्रत्यक्ष भगवंतच सर्वकाही करवून घेत आहे’, याची अनुभूती येणे : ‘कोणतीही सेवा करायची म्हटले की, मला ताण येत असे. सेवेचे दायित्व मिळाल्यावर ‘माझ्याकडून ती सेवा होणार का ? मला कोण साहाय्य करणार ?’, असे बरेच प्रश्‍न माझ्या मनात असायचे; परंतु या वर्षी भाववृद्धी सत्संगात सांगितलेल्या प्रयत्नांमुळे गुरुपौर्णिमेची सेवा करतांना किंवा दायित्व घेतांना मला ताण आला नाही. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सेवा करतांना मला पुष्कळ आनंद मिळाला. त्या सेवेमध्ये ‘प्रत्यक्ष भगवंतच सर्वकाही करवून घेत आहे’, याची अनुभूती मला घेता आली.

४ आ. सेवा करतांना परात्पर गुरुदेव समवेत असल्याचे जाणवणे : प्रसाराची सेवा करतांनाही मला पुष्कळ चैतन्य जाणवत होते. ‘कोणत्याही दुकानात गेल्यावर परात्पर गुरुदेव आपल्या समवेतच आहेत’, असे मला जाणवत असे.

४ इ. ‘सर्व साधक गुरूंच्या सान्निध्यात आहेत’, असे वाटल्याने कसलेच दडपण न जाणवणे : गुरुपौर्णिमेची सेवा करतांना ‘समितीचे सेवक आणि साधक गुरूंच्या सान्निध्यात असून आनंदाने सेवारत आहेत’, असे वाटल्यामुळे मला कसलेच दडपण जाणवले नाही. ‘आपण भगवंताच्या विश्‍वात आहोत आणि गुरूंच्या सान्निध्यात गुरुपौर्णिमा होत आहे’, असे मला जाणवले.

४ ई. सर्व साधकांमध्ये समष्टी भाव जाणवणे, त्यामुळे ‘सर्व जण आनंदात डुंबून सेवा करत आहेत’, असे वाटणे आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त होणे : सर्व साधकांनी या वर्षीच्या गुरुपौर्णिमेला एकमेकांना साहाय्य करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरुमाऊली यांनी सर्वांना आनंद दिला. माझ्या कुटुंबियांनाही भावपूर्ण सेवा करता आली. ‘संपूर्ण केंद्र आनंदात डुंबून सेवा करत आहे’, असे मला जाणवत होते. सर्वांमधे समष्टी भाव होता. भगवंताने या वर्षी मला पुष्कळ काही अनुभवायला दिले. त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायला मला शब्दही सापडले नाहीत.’

५. एक साधिका, अकोला

५ अ. कोणत्याही प्रसंगात इतरांविषयी प्रतिक्रिया येऊ न देता स्वतःच्या स्वभावदोषांकडे लक्ष देऊन ते दूर करण्यासाठी प्रयत्न करणे : ‘एखाद्या साधकाकडून एखादी सेवा झाली नाही, तर निराश न होता ‘त्याला त्या सेवेसाठी उद्युक्त कसे करता येईल ?’, असा विचार माझ्याकडून झाला. त्या साधकाविषयी मनात प्रतिक्रिया येऊ न देता स्वतःच्या स्वभावदोषांकडे लक्ष देऊन ते दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यास मी आरंभ केला.

५ आ. ‘प्रत्येक साधकाला सेवेतून आनंद मिळायला हवा’, यासाठी देव हळूहळू माझ्याकडून प्रयत्न करवून घेत आहेे’, असे मला जाणवते.

५ इ. ‘सेवेतील आनंद कायम टिकवण्यासाठी ईश्‍वरच साहाय्य करत आहे’, असेही मला जाणवते.

५ ई. गुरुपौर्णिमा झाल्यानंतरही मनातील भाव टिकून रहाणे आणि ‘यापुढेही तो टिकून रहावा’, यासाठी गुरुदेवांना अधिकाधिक आळवणे : गुरुपौर्णिमा झाल्यानंतर १५ दिवस होऊनही ‘प्रत्येक दिवस हा गुरुपौर्णिमेचा आहे’, असे समजून माझ्याकडून सेवा होत आहे. यापुढील प्रत्येक सेवाही त्याच भावाने करवून घेण्यासाठी मी गुरुदेवांना अधिकाधिक आळवू लागले आहे.’

६. अश्‍विनी कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

६ अ. ‘स्वतःला पालटण्यासाठी परात्पर गुरूंनी सांगितलेली स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया मनापासून राबवणे’, हीच खरी कृतज्ञता असल्याचे लक्षात येणे : ‘भावजागृती सत्संगानंतर पुढील सूत्रे माझ्या लक्षात आली, ‘स्वतःला पालटण्यासाठी परात्पर गुरूंनी सांगितलेली स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया मनापासून राबवणे’, हीच खरी कृतज्ञता आहे. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवल्यानेच गुरूंना अपेक्षित असे परिवर्तन आपल्यात घडू शकते. ‘ही प्रक्रिया राबवणे’ ही कृतीच्या स्तरावरील कृतज्ञताच आहे. आपण आपल्या मनाचा त्याग केला, तरच आपल्याला भगवंताचे साहाय्य घेता येते.

६ आ. प्रार्थना केल्यावर स्वतःच्या चुका सर्वांसमक्ष सांगणे जमू लागणे : प्रक्रियेचे जे प्रयत्न तळमळीने होत नव्हते, ते प्रयत्न करण्यासाठी माझ्याकडून सतत प्रार्थना व्हायला लागली. प्रक्रियेत असतांना सेवेच्या ठिकाणी (स्वयंपाकघरात) चुका सहजपणे सांगितल्या जायच्या; पण अन्य सेवेच्या ठिकाणी आल्यानंतर माझ्याकडून त्या चुका सांगितल्या जात नव्हत्या अथवा प्रांजळपणे त्या चुका स्वीकारल्या जात नव्हत्या. स्वतःची चूक सर्वांसमक्ष सांगायला देवानेच आरंभ करवून घेतला. आतापर्यंत मी माझ्याकडून झालेल्या चुका आठवतील, तशा संध्याकाळी लिहून काढायचे. त्यात सातत्यही नसायचे; पण आता ‘देवाप्रती कृतज्ञता अर्पण करायची आहे’, या विचारामुळे चूक झाल्याची जाणीव होताच तत्परतेने ती लिहून काढणे, फलकावर चूक लिहिणे, सहसाधकांना प्रांजळपणे चूक सांगणे, स्वभावदोष-निर्मूलनासाठी त्यांचे साहाय्य मागणे, असे प्रयत्न माझ्याकडून होत आहेत.

६ इ. प्रक्रियेमुळे अंतर्मुखता निर्माण होणे : आधी मला इतरांकडून ‘इतरांनी असे करायला हवे, हे करू नये, ते करू नये किंवा त्यांनी अशा चुका करू नये’, अशा अपेक्षा  असायच्या. माझ्यात पुष्कळ बहिर्मुखता असल्यामुळे मी इतरांच्या चुका बघत असे. त्यांच्या चुकांमुळे माझ्या मनात पुष्कळ प्रतिक्रिया येत असत. त्या साधकांविषयी माझ्या मनात पुष्कळ पूर्वग्रह निर्माण व्हायचा. त्यामुळे मला सहजपणे रहाता येत नव्हते किंवा सर्वांशी सहजपणे बोलता येत नव्हते. आता देवाच्या कृपेमुळे इतरांच्या चुकांपेक्षा माझ्या चुका आणि अहं यांची तीव्रता पुष्कळ अधिक असल्याचे देवाने मला दाखवून दिले. देवाच्याच कृपेने मला ते स्वीकारता येऊन माझ्यात सकारात्मकता निर्माण झाली आहे. ‘स्वतःला पालटण्यासाठी प्रयत्न करायला हवेत’, याची मला जाणीव झाली आणि ‘देवानेच प्रयत्नांना आरंभ करून घेतला’, यासाठी भगवंताच्या चरणी मी कोटी कोटी कृतज्ञ आहे.’

७. सौ. सुनीता पंचाक्षरी, अंबेजोगाई

७ अ. पूर्वी मनात नकारात्मक आणि कर्तेपणाचे विचार असणे अन् या गुरुपौर्णिमेच्या वेळी ‘देवाच्या लीला बघतच रहाव्यात’, असे वाटणे : ‘या वर्षी पुष्कळ वर्षांनी अंबेजोगाई येथे गुरुपौर्णिमा झाली. पूर्वी माझ्याकडे केंद्रसेवक म्हणून सेवा दिली होती. तेव्हा माझ्यात पुष्कळ उतावीळपणा होता. माझ्या मनात नकारात्मक विचार किंवा ‘मलाच करावे लागते’, अशा प्रकारचे पुष्कळ विचार असायचे; मात्र या वर्षी ‘देवाने दिलेल्या या गुरुपौर्णिमेला त्याच्या लीला बघतच रहाव्यात’, असे मला वाटत होते.

७ आ. सर्व साधकांनी सकारात्मक आणि उत्साही रहाण्यासाठी प्रयत्न केल्याने समाजातील व्यक्तींकडून धर्मकार्यासाठी साहाय्य मिळणे : केंद्र स्तरावर सर्वांनी ‘आपण सर्वांनी सकारात्मक, उत्साही आणि समजुतीने रहायचे’, असे ध्येय ठरवले होते. ‘प्रत्येक अडचण ही गुरुदेवांनी दिलेली एक संधी आहे’, असा विचार आमच्याकडून होत होता. सेवा करतांना प्रार्थना केल्यावर मला एखाद्या व्यक्तीचे नाव सुचायचे. तेव्हा त्या व्यक्तीकडून आम्हाला लगेच साहाय्य मिळायचे.

७ इ. साधकसंख्या अल्प असल्यामुळे ‘आपली क्षमता नाही’, याची जाणीव होणे आणि धर्मप्रेमींनी केलेली सेवा पाहून ‘कोणतीच गोष्ट अडून राहिलेली नाही’, हे लक्षात येणे : अंबेजोगाई केंद्रातील साधकसंख्या अल्प असल्यामुळे आमच्या लक्षात आले, ‘आपली क्षमता नाही. आपले प्रयत्नही अल्प आहेत’; परंतु संस्थेशी जोडले गेलेले समाजातील नवीन जीव, धर्मप्रेमी इतके जीव ओतून सेवा करायचे की, ‘कोणतीच गोष्ट राहिली आहे. थांबली आहे’, असे होतच नव्हते. समाजाकडून शिकण्यासाठी ईश्‍वराच्या कृपेने फार मोठी संधी आम्हाला मिळाली. त्यामुळे साधकांची क्षमता वाढून वेगळाच उत्साह निर्माण झाल्यामुळे गुरुपौर्णिमा फार छान झाली.

७ ई. धर्मप्रेमींच्या माध्यमातून देवाने भरभरून साहाय्य करणे : परात्पर गुरुदेव आणि श्री योगेश्‍वरीमाता यांच्या कृपेने सर्व साधकांनी उत्साहाने अन् दायित्व घेऊन सेवा केली. काही धर्मप्रेमी सनातन संस्थेशी जोडले गेले. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम झाल्यावर शेवटपर्यंत (सर्व आवरून होईपर्यंत) धर्मप्रेमी आमच्या समवेत होतेे. सर्व सेवा सर्वांच्या साहाय्यामुळे भराभर होत होत्या. ‘आम्ही केवळ एक पाऊल उचलल्यानंतर देवाने धर्मप्रेमींच्या माध्यमातून केलेल्या साहाय्याच्या रूपाने त्याच्या लीला दाखवल्या’, हे आम्हाला या वेळी प्रकर्षाने अनुभवायला मिळाले.

७ उ. गुरुपौर्णिमेच्या सेवा करतांना ‘हे सर्व वैकुंठातच घडत आहे आणि आम्ही पहात आहोत’, असेच आम्हाला अनुभवायला मिळाले.

७ ऊ. साधकांमध्ये उत्साह निर्माण झाल्यामुळे त्यांचे प्रयत्नही चांगले झाले आणि त्यांना पुष्कळ आनंद मिळाला.’

८. सौ. शोभना नारखेडे, संभाजीनगर

८ अ. स्वतःतील स्वभावदोषांमुळे कृतज्ञता व्यक्त होत नसल्याचे जाणवणे : ‘गुरुचरणी सतत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी ‘प्रतिदिनच गुरुपौर्णिमा आहे’, असा भाव ठेवण्याचा प्रयत्न केला. ‘कुठे कुठे कृतज्ञता व्यक्त करू शकतो ?’, याविषयीचे चिंतन मी लिहून काढले. कृतज्ञता वाढल्यावर माझ्या लक्षात आले, ‘स्वभावदोषांमुळे आपण सेवेतील आनंद ग्रहण करायला न्यून पडत आहोत.’ मी माझे निरीक्षण केल्यावर ‘माझ्यातील काही गंभीर स्वभावदोषांमुळे मी कृतज्ञता व्यक्त करायलाच न्यून पडत आहे’, असे माझ्या लक्षात आले.

८ आ. भावजागृतीचे प्रयत्न केल्याने दायित्व असलेल्या साधकांनी सांगितलेली सूत्रे स्वीकारता येणे, सेवेतील आनंद ग्रहण करता येणे आणि मनातील संघर्षाचा कालावधी न्यून होत असल्याचे जाणवणे : ‘अपेक्षा करणे, ऐनवेळी आलेली सूत्रे स्वीकारण्यास संघर्ष होणे’, हे स्वभावदोष दूर करण्यासाठी मी भावाच्या स्तरावर प्रयत्न केले. ‘दायित्व असलेल्या साधकांच्या माध्यमातून परात्पर गुरुदेव किंवा गुरुतत्त्व मला ती सूत्रे सांगत आहे. तेच त्यांच्या माध्यमातून मला सुचवत आहेत’, असा भाव ठेवून मी त्यांनी सांगितलेली सूत्रे स्वीकारायचा प्रयत्न केला. या भावामुळे मला सेवेतील आनंद ग्रहण करता आला. माझ्या मनातील संघर्षाचा कालावधी आता बर्‍याच प्रमाणात न्यून होत असल्याचे मला जाणवले.

८ इ. ‘प्रत्येक साधक हा गुरुबंधू आहे’, असा भाव ठेवल्याने साधकांविषयी मनातील पूर्वग्रह किंवा प्रतिक्रिया यांचे प्रमाण न्यून होऊन त्या साधकांविषयी प्रेम वाटू लागणे : सेवाकेंद्रात अन्य साधिकांच्या समवेत रहात असतांना बर्‍याचदा मनात पूर्वग्रह किंवा प्रतिक्रिया येत असल्यामुळे बराच संघर्ष होत असे. आता एखाद्या साधकाविषयी पूर्वग्रहाचा विचार मनात आला, तर ‘हा साधकही गुरुदेवांनीच निवडलेला आहे. गुरुमाऊलीच्या सेवेसाठीच तो आलेला आहे, म्हणजे तो माझा गुरुबंधू आहे. सर्व सोडून तोही येथे आला आहे’, या विचारानेच माझ्या मनातील कृतज्ञताभाव वाढायला लागतो आणि माझ्या मनात विचार येतो, ‘देवाने माझ्या साधनेसाठी अपेक्षित असे वातावरण निर्माण केलेले आहे.’ त्यामुळे त्या साधकाप्रती प्रेमही वाटायला लागले आहे.

८ ई. धर्मप्रेमींनी केलेले कार्य पाहून त्यांच्याविषयी कृतज्ञता वाटू लागणे, ‘कर्तेपणाचे रूपांतर कृतज्ञतेत होणे अपेक्षित आहे’, असे वाटणे आणि त्याप्रमाणे प्रयत्न केल्यावर आनंद मिळणे : समष्टी कार्य करत असतांना एका उपक्रमाच्या वेळी धर्मप्रेमी, तसेच काही साधक यांनी अल्प दिवसांत चांगला धर्मप्रसार केला. आधी बर्‍याचदा मला वाटायचे, ‘आपल्याला बरेच करायला लागते.’ ते कर्तेपणाचे विचार असायचे. त्या वेळी देवाने दाखवून दिले, ‘एकेक धर्मप्रेमी एका दिवसात १५ ते १८ मंडळांना भेटत होते.’ तेव्हा मला त्यांच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटायला लागली. ‘गुरुमाऊली त्यांचे कार्य योग्य प्रकारे करवून घेणारच आहे; पण मला मनातून खरी कृतज्ञता वाटायला पाहिजे; म्हणून कर्तेपणा घेण्यापेक्षा त्याचे रूपांतर कृतज्ञतेतच करणे अपेक्षित आहे’, असे मला वाटू लागले. या दृष्टीने प्रयत्न करायला लागल्यामुळे आता मला पुष्कळ आनंद मिळत आहे.

८ उ. ‘व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांच्या माध्यमातून गुरुदेव आपल्याला चैतन्य देत आहेत’, असा भाव ठेवल्यावर तसे प्रयत्न होऊ लागणे : पूर्वी माझे व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष व्हायचे. आता ‘या प्रयत्नांच्या माध्यमातून गुरुदेव आपल्याला चैतन्य देत आहेत किंवा त्यातून ते आपले रक्षण करत आहेत’, असे मला वाटते. त्यामुळे त्याविषयीही मला कृतज्ञता वाटायला लागली आहे आणि माझ्याकडून व्यष्टी साधनेचे प्रयत्न व्हायला लागले आहेत.’

– कु. वैष्णवी वेसणेकर, सौ. कीर्ती जाधव आणि कु. योगिता पालन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (३.९.२०१८)

प्रत्येक कृती ‘गुरुपौर्णिमेची सेवा आहे’, या भावाने करायला लागल्यापासून साधकांच्या वैयक्तिक जीवनात, व्यष्टी साधनेमध्ये आणि गुरूंच्या समष्टी कार्यातही अल्प कालावधीत आमूलाग्र परिवर्तन होत आहे !

‘प्रत्येक क्षणीच गुरुपौर्णिमा आहे’, या भावाने प्रयत्न केल्यावर ‘भगवंताने प्रत्येक साधकालाच व्यष्टी आणि समष्टी प्रयत्नांमध्ये साहाय्य केले’, हे या सत्संगातील अनेक साधकांच्या उदाहरणातून लक्षात आले. ‘मला हे कार्य करायचे आहे’, या विचाराने आपण कृती करतो. त्या वेळी कर्तेपणा येऊन आपल्याला कार्यासाठी भगवंताचे साहाय्य मिळत नाही; पण साधकांनी ‘गुरुपौर्णिमेची सेवा आहे’, या भावाने सेवा करायला आरंभ केल्यावर ‘हे गुरूंचे कार्य आहे’, हा भाव नकळतपणे त्यांच्या मनात निर्माण झाला. त्यामुळे प्रत्येकात व्यापकत्व निर्माण झाले. हे व्यापकत्व केवळ साधकांमध्येच नव्हे, तर प्रत्येक धर्मप्रेमीमध्येही गुरूंनी निर्माण केले. प्रत्येक कृती करतांना ती ‘गुरुपौर्णिमेची सेवा आहे’, या भावाने करायला लागल्यापासून साधकांच्या वैयक्तिक जीवनात, व्यष्टी साधनेमध्ये आणि गुरूंच्या समष्टी कार्यातही अल्प कालावधीत आमूलाग्र परिवर्तन होत आहे. भगवंताने दिलेले हे ध्येय सर्व साधकांच्या साधनेसाठी पुष्कळच परिणामकारक झाल्याचे लक्षात आले.’


Multi Language |Offline reading | PDF