अकोला येथे दीड दिवसीय विदर्भस्तरीय प्रांतीय हिंदू अधिवेशनाचा समारोप !

अधिवेशनात सहभागी हिंदुत्वनिष्ठ

अकोला, २९ ऑक्टोबर (वार्ता.) – २७ आणि २८ ऑक्टोबर या दिवसांत अकोला येथे जानोरकर मंगल कार्यालयात विदर्भस्तरीय प्रांतीय हिंदू अधिवेशन पार पडले. या वेळी सनातनचे विदर्भ प्रसारसेवक पू. अशोक पात्रीकर, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, ह.भ.प. एकनाथ महाराज डीक्कर यांनी दीपप्रज्वलन केले. या वेळी उपस्थित वक्त्यांच्या हस्ते सनातनच्या पंचांगाचे प्रकाशन करण्यात आले.

या अधिवेशनामध्ये अखिल भारत क्षत्रिय महासभा, बजरंग दल, राष्ट्रीय बजरंग दल, योग वेदांत सेवा समिती, श्रीराम सेना, हिंदु क्रांती सेना, वारकरी संप्रदाय यांसह विविध संघटनांचे ६१ पदाधिकारी आणि धर्मप्रेमी उपस्थित होते.

अधिवेशनाचा प्रथम दिवस

‘धर्मकार्य करत असतांना येणारे अडथळे आणि त्यावरील कायदेशीर उपाय’ यावर हिंदु विधीज्ञ परिषदेेचे अधिवक्ता सुरेश कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी उत्स्फूर्तपणे कायदेविषयक शंकांचे निरसन करून घेतले. त्यानंतर काही संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी लव्ह जिहाद, गोरक्षण आणि इतर धर्मकार्य करतांना येणारे अनुभवकथन केले.

अधिवेशनाचा द्वितीय दिवस

१. दुसर्‍या दिवशीच्या सत्रामध्ये ‘जीवनातील साधनेचे महत्त्व’ याविषयी पू. अशोक पात्रीकर यांनी, ‘लोकशाहीची सद्यस्थिती आणि हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता’ याविषयी श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी, तर हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा याविषयी श्री. सुनील घनवट यांनी मार्गदर्शन केले.

२. ‘सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे  धर्मप्रसार कसा करावा ?, याविषयी श्री. नीलेश टवलारे यांनी माहिती दिली.

३. त्यानंतर स्वरक्षण प्रशिक्षणाचे प्रात्याक्षिक दाखवण्यात आले.

४. सायंकाळी घेण्यात आलेल्या गटचर्चेत हिंदुत्वनिष्ठांनी जिल्ह्यात करण्याच्या धर्मकार्याचे नियोजन केले. समारोपीय सत्रामध्ये ‘येणार्‍या आपत्काळाची भीषणता आणि त्यात सुरक्षित रहाण्यासाठी साधनेचे महत्त्व’ याविषयी पू. अशोक पात्रीकर यांनी मार्गदर्शन केले. त्या वेळी उपस्थित सर्वांनीच भावावस्था अनुभवली.

ईश्‍वरी पाठबळ असेल, तर धर्मकार्यातील अडथळे दूर होऊन निश्‍चितपणे हिंदु राष्ट्राची स्थापना होईल ! – पू. अशोक पात्रीकर, विदर्भ आणि छत्तीसगढ प्रसारसेवक, सनातन संस्था

आतंकवाद, भ्रष्टाचार, नक्षलवाद यांसारख्या संकटांनी भारताला घेरले असतांना त्यातून बाहेर पडण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अत्यावश्यक झाले आहे. आणि त्यासाठी प्रत्येकाने प्रतिदिन साधना करणे आवश्यक आहे. ईश्‍वरी पाठबळ असेल, तर धर्मकार्यातील अडथळे दूर होऊन निश्‍चितपणे हिंदु राष्ट्राची स्थापना होईल, याची निश्‍चिती बाळगा. काळ कितीही वाईट असला, तरी भगवंत भक्ताचे रक्षण करणारच आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून सर्वांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटित व्हा !- सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्राचे कार्य करण्यासाठी प्रत्येकाने धर्मशिक्षण घेणे आणि त्यानुसार कृती करणे आवश्यक आहे. धर्मशिक्षण देऊन हिंदूंची एकजूट करणे, हे आपले कर्तव्य आहे. हिंदूंचे सण आले की पुरोगामी आणि बुद्धीप्रामाण्यावादी त्यावर आक्षेप घेतात. अन्य धर्मिय संघटित असल्याने त्यांच्या धर्मावर कोणी घाला घालण्याचे प्रयत्न करत नाही.

दुष्प्रवृत्तींचा नाश आणि उत्तम प्रवृत्ती निर्माण करून हिंदु राष्ट्राची निर्मिती करणे काळाची आवश्यकता ! – श्रीकांत पिसोळकर, विदर्भ समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

प्रभु श्रीरामचंद्रांपासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत राजेशाही आदर्श होती. त्यांची न्यायव्यवस्था आदर्श होती. आज देशामध्ये भ्रष्टाचार, हत्या, बलात्कार, यांत वाढ होत आहे. लोकशाही स्वीकारली असतांनाही आपली ही स्थिती आहे, तर निश्‍चितच लोकशाहीत काहीतरी त्रुटी असल्याचे लक्षात येते. त्यासाठीच समाजातील दुष्प्रवृत्तींचा नाश आणि उत्तम प्रवृत्ती निर्माण करून हिंदु राष्ट्राची निर्मिती करणे काळाची आवश्यकता आहे.

हिंदू संघटनाचे कार्य करा आणि आपल्या घरापासून त्याचा आरंभ करा ! – ह.भ.प. एकनाथ महाराज डीक्कर

भारत हा देश मूळ हिंदूंचाच आहे. घरात राहून हे घर माझे आहे हे म्हणणे जसे चुकीचे आहे, त्याचप्रमाणे या देशात हिंदु राष्ट्राच्या निर्मितीची मागणी करणे आपले दुर्भाग्यच आहे ! भारतात जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती हिंदुच आहे. १५० वर्षे राज्य करून इंग्रज निघून गेले तरीही त्यांचे पाश्‍चिमात्य संस्कृतीचे विचार मात्र आपण सोडले नाहीत. त्यामुळे हिंदूंचे तेज आज नष्ट झाले आहे. आज हिंदूंवर अन्याय होण्याचे एकमेव कारण म्हणजे हिंदु समाज आज हिंदु म्हणून एकत्र नाही. त्यामुळे हिंदू संघटनाचे कार्य करा आणि आपल्या घरापासून त्याचा आरंभ करा.

अन्य हिंदुत्वनिष्ठांचे मार्गदर्शन

१. श्री. राजेंद्रसिंह राजपूत, राष्ट्रीय वरिष्ठ महासचिव, अखिल भारत क्षत्रीय महासभा : हिंदूंनी जातींमध्ये विभागण्यापेक्षा केवळ हिंदू म्हणून एकत्र आल्यास भारत देशात निश्‍चितपणे हिंदूंच्या सगळ्या समस्या संपून हिंदु राष्ट्राची निर्मिती होईल. हिंदु राष्ट्राचे संस्कार होण्यासाठी लहानपणापासूनच मुलांना आपले आदर्श छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांसारख्या वीरांची माहिती द्या, त्यांना आपला खरा इतिहास शिकवा. मी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला जुळलो त्याविषयी मला पुष्कळ आनंद वाटतो.

२. ह.भ.प. बाळकृष्ण कराळे महाराज : हिंदु धर्मावर आलेली काजळी काढण्याकरिता ईश्‍वराला हिंदु राष्ट्र लवकरात लवकर येण्यासाठी प्रतिदिन प्रार्थना करा. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदु राष्ट्राची प्रेरणा आपल्या सर्वांना दिली. त्यांच्या प्रेरणेने मिळालेले हे कार्य आपण संघटित होऊन पुढे नेऊया. त्यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी साधना करा.

३. श्री. पप्पू मोरवाल, अकोला जिल्हा प्रमुख, श्रीराम सेना : भारताचा इतिहास आहे की, जेव्हा जेव्हा राष्ट्रावर संकट आले, लढण्याची वेळ आली तेव्हा तेव्हा युवा पिढीने पुढाकार घेतला आहे. आताही युवकांनी धर्मावर आलेल्या संकटांविरुद्ध लढण्यासाठी आपल्यातील आत्मशक्ती जागृत करायला हवी. आजची युवापिढी पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या नावाखाली राष्ट्रापासून दूर जात आहे, हे आपले दुर्दैव आहे. युवा वर्गाने संघर्ष करण्यासाठी तयार व्हायला हवे. त्यासाठी धर्मशिक्षण घ्या. हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून का होईना, माझ्यासारखा सामान्य युवक तुमच्यासमोर हिंदु राष्ट्राची ज्योत घेऊन आला आहे. गुरूंचा आशीर्वाद असलेला कुठलाही व्यक्तीच्या हातातील हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची मशाल कधीही खाली पडणार नाही.

४. श्री. महेश लढके, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान, अमरावती : लव्ह जिहादच्या माध्यमातून समाजाची दिशाभूल केली जात आहे. पत्रके आणि फतवे यांच्या माध्यमातून हिंदु मुलींच्या किमती ठरवल्या जात आहेत. रामराज्यात मध्यरात्री हिंदु महिला सुरक्षित जाऊ शकत होती. आज दिवसासुद्धा आपल्या महिला सुरक्षित नाहीत. त्यासाठी त्यांना स्वरक्षण प्रशिक्षण देणे काळाची आवश्यकता आहे. हिंदु धर्म श्रेष्ठ आहे, हा आपला इतिहास आहे. हिंदु सुरक्षेसाठी कठोर कायदा करायला हवा.

सहकार्य : श्री. गुणवंत जानोरकर यांनी सभागृह तसेच श्री. नितीन रेडकर, सिसोदीया कॅटरर्स, महावीर कॅटरर्स यांनी जेवणाची व्यवस्था विनामूल्य उपलब्ध करून दिली.

धर्मप्रेमींनी व्यक्त केलेले मनोगत

१. अधिवक्ता मुकुल जालनेकर, अकोला : नियोजनाप्रमाणे ठरवलेले विषय पूर्णत्वास नेणे आणि त्यानंतर त्याप्रमाणे कार्य करण्याचा आढावा घेण्याचे व्यवस्थापन मला हिंदु जनजागृती समितीकडून शिकायला मिळाले. शिस्तबद्ध रचना आणि ते कार्य करणारे कार्यकर्ते यांचा सेवाभाव पाहून पुष्कळ आनंद होतो.

२. श्री. मुकुल कापसे, अध्यक्ष, राष्ट्रीय बजरंग दल, अमरावती : लहानपणापासून मी दैनिक सनातन प्रभातचे वाचन करतो. माझ्यामध्ये जी धर्मजागृती झाली, ती सनातन प्रभातमुळे झाली. लव्ह जिहाद विषयी त्यातूनच कळले. समाजात लव्ह जिहादच्या विरोधात कार्य करतांना मला पुष्कळ समस्यांना तोंड द्यावे लागले. त्याचे निराकरण कसे करायचे, ते आज अधिवेशनात कळले. मला सातत्याने मार्गदर्शन केल्याविषयी सर्वांचा ऋणी राहीन. यापुढे समितीच्या प्रत्येक उपक्रमात सक्रियपणे सहभागी होणार आहे.

३. श्री. जितेंद्र मोरे, नांदुरा : कार्य करतांना कुठली काळजी घ्यायची, कार्य नेमके कोणत्या मार्गाने करायचे यासाठीचे मार्गदर्शन मला मिळाले. प्रत्येक शब्द मोलाचा होता. साधना आणि नामजप यांमुळे होणारा लाभ, हा विषय मला अधिवेशनातून शिकायला मिळाला. सर्वांनी प्रतिदिन किमान एक घंटा नामजप करावा, अशी विनंती. गेल्या एक वर्षापासून मनात असलेल्या प्रश्‍नांची उत्तरे मला आज अधिवेशनात मिळाली. कुटुंबभावना अनुभवायला मिळाली.

४. अधिवक्ता सागर जोशी, अकोला : या अधिवेशनात ईश्‍वरी राज्याची प्रचीती आली. अधिवक्ता म्हणून कार्य करण्यास मी आजपासूनच आरंभ केला आहे.

५. श्री. योगेश जोशी, अमरावती : धर्मकार्य करतांना चुका होऊ न देता नियोजनपूर्ण कार्य कसे करावे ?, हे शिकायला मिळाले. अधिवक्त्यांचे साहाय्य घेणे धर्मकार्यासाठी अत्यावश्यक आहे, हे शिकायला मिळाले. हिंदु राष्ट्र होणे किती आवश्यक आहे, हे यातून कळले. यापुढे अमरावती मध्ये मी सक्रियपणे समितीच्या कार्यात सहभाग घेणार.


Multi Language |Offline reading | PDF