धुळे येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा स्तरीय प्रांतीय हिंदू अधिवेशनाची सांगता !

प.पू. सद्गुरु वाल्मिक दादाजी यांच्या हस्ते ‘सनातन पंचांग – २०१९’ चे विमोचन

सनातन पंचांग २०१९ चे विमोचन करतांना डावीकडून सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव, प.पू. सद्गुरु वाल्मिक दादाजी, कु. रागेश्री देशपांडे

धुळे, २९ ऑक्टोबर (वार्ता.) – ‘लाना होगा, लाना होगा, हिंदु राष्ट्र लाना होगा’, ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ च्या घोषणांच्या निनादात हिंदु जनजागृती समिती आयोजित  प्रांतीय हिंदू अधिवेशनाची सांगता झाली. २७ आणि २८ ऑक्टोबर असे २ दिवस येथील ‘श्रीकृष्ण लॉन्स’ येथे पार पडलेल्या या अधिवेशनाला उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, अधिवक्ता, कायकर्ते उपस्थित होते.

हिंदू संघटनासाठी स्वत:तील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे आवश्यक ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

हिंदू संघटनाचे कार्य करतांना हिंदुत्वनिष्ठांनी आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे. अपशब्दांचा वापर टाळणे, व्यसनापासून दूर रहाणे, वेळेचे अन् शिस्तीचे पालन करणे, प्रसिद्धीच्या झोतापासून दूर रहाणे अशा गोष्टींचे पालन हिंदुत्वनिष्ठांनी केल्यास हिंदू संघटन चांगल्या प्रकारे होऊ शकते. श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे पू. संभाजी भिडेगुरुजी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण युवापिढीत उतरवण्याच्या एकमेव उद्देशाने कार्य करत आहेत. त्यांची राहणी अत्यंत साधी असून ते कधीही प्रसिद्धीसाठी कार्य करत नाहीत. हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे धर्मप्रसाराचे कार्य जगभर पसरले असतांनाही ते प्रसिद्धीपासून दूर आहेत; मात्र काही हिंदुत्वनिष्ठ प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी प्रयत्नरत असतात. हे स्वभावदोष अन् अहंमुळे घडते. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:मधील स्वभावदोष अन् अहं यांचे निर्मूलन करणे आवश्यक आहे. त्यासाठी साधना करून अंतर्मनावरील जन्मोजन्मीचे संस्कार नष्ट करायला हवेत.

हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करण्यासाठी ईश्‍वरी अधिष्ठान आवश्यक ! – कु. रागेश्री देशपांडे, धुळे जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

लोकशाहीने आपल्याला काय दिले ? गोहत्याबंदी कायदा, धर्मांतरबंदी कायदा, समान नागरी कायदा देशभरात लागू होऊ शकला नाही. विस्थापित काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन होऊ शकलेले नाही. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करायचे आहे. त्यासाठी शारीरिक, मानसिक क्षमतेसमवेतच आवश्यकता आहे ती ईश्‍वरी अधिष्ठानाची !

स्वातंत्र्यापासून भारत ‘सेक्युलर’ आहे, असे म्हणणे हे थोतांड ! – प्रशांत जुवेकर, जळगाव जिल्हा समन्वयक,हिंदु जनजागृती समिती

भारताच्या स्वातंत्र्यानंतर २९ वर्षांनी म्हणजे वर्ष १९७६ मध्ये आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी साम्यवाद्यांच्या प्रभावाखाली ४२ व्या घटनादुरुस्तीद्वारे ‘सोशालिस्ट’ आणि ‘सेक्युलर’ हे शब्द संविधानाच्या उद्देशिकेत घुसडवले. म्हणजेच १९४७ ते १९७६ पर्यंत हा देश सेक्युलर नव्हता. असे असतांना स्वातंत्र्यापासून भारत ‘सेक्युलर’ आहे, असे म्हणणे हे थोतांड आहे. ‘शासकीय आस्थापनांमध्ये देवतांची छायाचित्रे नकोत’, अशा आशयाचा शासननिर्णय निघतो आणि दुसरीकडे हिंदूंची मंदिरे शासन कह्यात घेते. याला काय म्हणावे ? वर्तमान परिस्थितीत हिंदु राष्ट्राची मागणी करणे, हा घटनात्मक अधिकार आहे, हे लक्षात घेऊन या मागणीचा प्रसार करा.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उपक्रमांत सहभागी व्हा ! – कु. प्रियांका लोणे,  संभाजीनगर जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मजागृती सभा, शौर्य जागरण शिबिरे, हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा, फ्लेक्स प्रदर्शन यांसारख्या उपक्रमांद्वारे विहंगम मार्गाने प्रसार केला जातो. संतांच्या आशीर्वादाने वर्ष २०२३ मध्ये ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होणारच आहे. ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेचा काळ अतिशय समीप येऊन ठेपल्याने आपली साधना म्हणून धर्माभिमान्यांना संघटित करण्यासाठी हे उपक्रम समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवायला हवेत.

महिलांनो, समाजकंटकांचा प्रतिकार करण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन आत्मबळ वाढवा ! – श्रेयस पिसोळकर, हिंदु जनजागृती समिती

गुंड, बलात्कारी आणि धर्मांध यांसारख्या मूठभर दुष्प्रवृत्ती आज संपूर्ण समाजावर ठसा गाजवत आहेत. अनेक महिला लज्जा अन् भीडस्तपणा यांमुळे अत्याचार सहन करतात. महिलांनी समाजकंटकांना त्याच क्षणी जाब विचारून, प्रतिकार करून चारचौघांना जाणीव करून द्यायला हवी. त्यासाठी आवश्यकता आहे ती स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन आत्मबळ वाढवण्याची ! अधिवेशनात नंदुरबार येथील हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र पाटील यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

स्वरक्षण प्रात्यक्षिकांचे सादरीकरण !

धुळे येथे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या सभेनंतर विविध भागात स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्यात आले. त्यातील प्रशिक्षणार्थींनी अधिवेशनात ‘स्वरक्षण प्रात्यक्षिके’ सादर केली. यात सर्वश्री पियुष खंडेलवाल, गणेश माळी, गौरव जाधव, ललीत माळी यांनी सहभाग घेतला.

शाळेत गायत्री मंत्र म्हणण्यास विरोध करणार्‍या धर्मांधांना मुख्याध्यापकांचे चोख प्रत्युत्तर !

धुळे जिल्ह्यातील एका शाळेतील शिक्षिका नियमित धर्मशिक्षण वर्गात येतात. त्यांनी अधिवेशनातील गटचर्चेत एक अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या की, त्या त्यांच्या शाळेतील मुलांवर संस्कार होण्यासाठी नियमित विद्यार्थ्यांकडून ‘गायत्री मंत्र पठण’ करून घेतात. मात्र या शाळेत काही धर्मांध विद्यार्थी आहेत. त्यांच्या पालकांनी एकदा मुख्याध्यापकांकडे तक्रार केली की, आमच्या धर्मात असे म्हणण्यास मनाई आहे. त्यावर मुख्याध्यापकांनी त्या शिक्षिकेची बाजू घेतली आणि धर्मांधांना ‘ही हिंदूंची शाळा आहे, तुम्हाला गायत्री मंत्र पठण नको असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना उर्दू शाळेत पाठवा’, असे ठणकावून सांगितले. (धर्मांधांना चोख प्रत्युत्तर देणार्‍या धर्माभिमानी मुख्याध्यापकांचे अभिनंदन ! – संपादक)

सहकार्य

‘कृष्णा रिसॉर्ट’चे मालक संतोष अग्रवाल आणि श्री. कल्पेश अग्रवाल यांनी अधिवेशनासाठी सभागृह, निवास व्यवस्था, तर श्री. अजय अग्रवाल यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था विनामूल्य उपलब्ध करून दिली.

गावा-गावांत ‘हिंदु राष्ट्र’ संकल्पनेचा प्रसार करण्याचा उपस्थितांनी केला निर्धार !

गटचर्चेत सहभागी हिंदुत्वनिष्ठ

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यास संतांचे आशीर्वाद !

तरुणांचा सहभाग पाहून आनंद द्विगुणीत झाला ! – प.पू. सद्गुरु वाल्मिक दादाजी

उपस्थित धर्माभिमान्यांना मार्गदर्शन करतांना प.पू. सद्गुरु वाल्मिक दादाजी म्हणाले, ‘‘अधिवेशनास उपस्थित असलेल्या तरुणांचा सहभाग पाहून आनंद द्विगुणीत झाला. हिंदु जनजागृती समितीची उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो !’’

गटचर्चा : प्रथम दिवसाच्या शेवटच्या सत्रात ‘हिंदु राष्ट्रजागृती नियोजन आणि उपक्रम’ या विषयावर उपस्थित धर्माभिमान्यांची गटचर्चा घेण्यात आली. या गटचर्चेत ८ गावांमध्ये ग्रामबैठका घेण्याचे तसेच मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथे काश्मिरी हिंदूंविषयीचे फॅक्ट प्रदर्शन, तर काही ठिकाणी फ्लेक्स प्रदर्शन लावण्याचे निश्‍चित करण्यात आले.


Multi Language |Offline reading | PDF