ठाणे रेल्वे पोलिसांच्या हद्दीत सर्वाधिक १५४ प्रवाशांचा अपघाती मृत्यू

नियमांचे पालन करण्यात हलगर्जीपणा करणारी निरर्थक लोकशाही काय कामाची

मुंबई – मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या ठाणे स्थानकात रेल्वेरूळ ओलांडतांना सर्वाधिक अपघाती मृत्यू झाले आहेत. मुंबई रेल्वेमध्ये ठाणे रेल्वे पोलिसांच्या हद्दीत सर्वाधिक १५४ प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

यंदा मध्य रेल्वेवर एकूण ७७७ अपघाती मृत्यू, पश्‍चिम रेल्वेवर ४३५ अपघाती मृत्यू झाले आहेत. मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावर मार्च १९ अखेर ३६ किलोमीटर लांबीची सुरक्षा भिंत उभारण्यात येणार आहे. रेल्वेरूळ ओलांडू नये, यासाठी वारंवार स्थानकात उद्घोषणा करण्यात येतात. रेल्वे सुरक्षा बलाकडून विशेष मोहिमाही राबवण्यात येतात. जनजागृती अभियान, आर्पीएफ्ची कामगिरी यामुळे गेल्या दोन वर्षांच्या काळात अपघातांच्या संख्येत घट होत आहे.

प्रत्येक प्रवाशाने स्वत:च्या जीवनाचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. जीवन मौल्यवान असून प्रवाशांनी याविषयी जागरूक राहून रेल्वेरूळ ओलांडू नये, अशी प्रतिक्रिया मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा यांनी व्यक्त केली.

मध्य रेल्वेने नुकतीच सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हणून ठाणे स्थानकाची घोषणा केली होती. रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार या वर्षात ठाणे स्थानकात रेल्वेरूळ ओलांडतांना १५४ अपघात झाले आहेत. यात १२९ पुरुषांचा, तर २५ महिलांचा समावेश आहे.  २०१६ आणि २०१७ मध्ये अनुक्रमे २४४ आणि २२३ अपघात झाले. कल्याण स्थानकात यंदा १५१ जणांचा रेल्वेरूळ ओलांडताना मृत्यू झाला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now