सिंचन घोटाळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या सहभागाविषयी सरकारची भूमिका लवकरच न्यायालयाला कळवू ! – मुख्यमंत्री

सिंचन घोटाळ्यातील अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या संदर्भातील पुरावे गोळा करण्याच्या प्रक्रियेला एवढे दिवस का लागत आहेत ? यामागे पवार आणि तटकरे यांना ‘वाचवण्याचे राजकारण’ आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? 

मुंबई – सिंचन घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि सुनील तटकरे यांचा सहभाग आहे कि नाही, याविषयीची सरकारची भूमिका लवकरच न्यायालयात कळवणार आहोत. सरकार या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालत नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले.

फडणवीस पुढे म्हणाले की, या घोटाळ्याची व्याप्ती पहाता एक तर त्यात मंत्र्याचा सहभाग किंवा त्याचा पाठिंबा असला पाहिजे किंवा मंत्री तरी निष्क्रीय असला पाहिजे. सध्या या प्रकरणाचे अन्वेषण अंतिम टप्प्यात आणि निर्णायक वळणावर आहे. राज्यात गाजलेल्या सिंचन घोटाळ्याची व्याप्ती पुष्कळ मोठी आहे. त्यात सरकारने कठोर कारवाई केली आहे. या प्रकरणात ७ सहस्र कोटी रुपयांच्या ९४ दोषयुक्त निविदा रहित झाल्या असून घोटाळ्यांच्या ११३ प्रकरणांमध्ये संबंधित अधिकार्‍यांच्या विरोधात दोषारोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे, तर ६८ प्रकरणांत दोषी अधिकार्‍यांच्या विरोधात शिक्षा करण्याचा आदेश दिला आहे. (अधिकार्‍यांसह  भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घालणार्‍या राजकारण्यांवरही कारवाई झाली पाहिजे ! – संपादक)

भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र येणे, ही अपरिहार्यता आहे ! – फडणवीस

भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र येणे, ही अपरिहार्यता आहे, ही वस्तूस्थिती सर्वांनाच कळते. राजकीय वास्तवाची जाण ठेवूनच नेहमी राजकारण केले जाते. सध्याच्या परिस्थितीत दोन्ही काँग्रेस एकत्र लढत असतांना शिवसेना आणि भाजप वेगळे लढले, तर त्यात दोघांची हानी होऊन विरोधकांना लाभ होईल. जे स्वतःला हिंदुत्वनिष्ठ म्हणायलाही घाबरतात, त्यांना उद्धव ठाकरे कधीच पाठिंबा देणार नाहीत, असे मतही या वेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.


Multi Language |Offline reading | PDF