(म्हणे) ‘शबरीमला आंदोलन म्हणजे राममंदिराचा निर्णय धर्मांध हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात गेलाच, तर रस्त्यावर उतरण्याची रंगीत तालीम !’ – निखिल वागळे

आतंकवाद्यांच्या धर्मांधतेविषयी तोंडातून शब्द न काढणारे; मात्र श्रद्धेसाठी आंदोलन करणार्‍या हिंदूंना ‘धर्मांध’ ठरवणारे निखिल वागळे यांच्यामध्ये हिंदुद्वेष किती भिनला आहे, हेच यातून दिसून येते !

मुंबई, २१ ऑक्टोबर (वार्ता.) – शबरीमलाविषयी न्यायालयाचा आदेश धुडकावण्यात येत आहे. ही उद्याच्या राममंदिराच्या निर्णयाची सिद्धता आहे. हे आंदोलन म्हणजे राममंदिराचा निर्णय धर्मांध हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात गेलाच, तर रस्त्यावर उतरण्याची रंगीत तालीम आहे, अशी हिंदुद्वेषी टीका करून तथाकथित पत्रकार निखिल वागळे यांनी हिंदूंना धर्मांध ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. २० ऑक्टोबर या दिवशी दादर चैत्यभूमी येथे ‘संविधान सन्मान यात्रे’मध्ये ते बोलत होते. या वेळी तथाकथित समाजसेविका तिस्ता सेटलवाड, साम्यवादी नेते प्रकाश रेड्डी आदी उपस्थित होते.

निखिल वागळे यांची बौद्धिक दिवाळखोरी दर्शवणारी विधाने

१. शबरीमला मंदिराविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या विरोधात भाजप आणि भक्तगण रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना अन्य महिलांनी सांगितले पाहिजे की, घटनेने आम्हाला मशीद, चर्च, मंदिर येथे पुरुषांसमवेत जाण्याचा अधिकार दिला आहे. देशाची राज्यघटना धर्मग्रंथांपेक्षा मोठी आहे. कुराण, गीता, बायबल यांपेक्षा संविधान मोठे आहे. (देशात वर्ष १९५० पासून राज्यघटना लागू झाली आहे. त्यानंतर केवळ ६७ वर्षांत भ्रष्टाचार, बलात्कार, बेरोजगारी, गुन्हेगारी यांनी उच्चांक गाठला आहे. राज्यघटना लागू होण्यापूर्वी वर्षानुवर्षे केवळ धर्माच्या आधारावर राष्ट्र टिकून आहे. त्यामुळे ‘राज्यघटनेपेक्षा धर्म श्रेष्ठ आहे’, असे म्हणणे हा राज्यघटनेचा अपमान नसून वस्तूस्थिती आहे. यासाठीच राज्यघटना धर्माचरण नाकारत नाही ! – संपादक) त्यामुळे कुणी मुल्ला-मौलवी, पाद्री आम्हाला आदेश देऊ शकत नाही. (मुल्ला आणि पाद्री आदेशही देतात आणि त्यांचे लोक ते मानतातही, हे हिंदुद्वेषी वागळे काय मान्य करणार ? – संपादक) 

२. उद्या मशिदी, हाजी अली दर्गा, चर्च येथे जाण्यासही रोखतील. उद्या बाई शिकू शकणार नाही, केशवपन होईल. (पराचा कावळा करणारे निखिल वागळे हिंदुद्वेषच प्रगट करत आहेत ! – संपादक) यासाठीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेली राज्यघटना समता आणि बंधूता सांगते. (असे आहे तर समान नागरी कायद्यासाठी वागळे आवाज का उठवत नाहीत ? मुसलमानांच्या शरियत कायद्याला वागळे का विरोध करत नाहीत ? – संपादक)

३. मुसलमान मारले जातात, तेव्हा अन्य लोक पुढे येत नाहीत. अखलाक, जावेद मारले गेले, तेव्हा सर्व गप्प होते. (हिंदू मारले जातात, तेव्हा वागळे गप्प का बसतात ? एकीकडे घटनेचे दाखले द्यायचे आणि दुसरीकडे केवळ मुसलमानांची तळी उचलून धरून हिंदूंवरील अन्यायाच्या विरोधात काही बोलायचे नाही, हीच वागळे यांच्यासारख्यांची धर्मनिरपेक्षता आहे ! – संपादक)

४. मोदी यांचा पक्ष फेकू असेल, तर काँग्रेस पक्षही घटनेचा सन्मान करणारा पक्ष नाही. देशातील मोठमोठे नेते काँग्रेसचे भागीदार आहेत. एक साप आहे, तर दुसरा एक नाग आहे. (हेच लोकशाहीचे अपयश आहे. यावर हिंदु राष्ट्राची स्थापना, हाच एकमेव उपाय होय ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF