तुम्हाला राममंदिर बांधायला जमत नसेल, तर ते आम्ही बांधू ! – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना

शिवतीर्थावर शिवसेनेचा ५२ वा दसरा मेळावा उत्साहात साजरा !

मुंबई, १९ ऑक्टोबर (वार्ता.) – हिंदू नेभळट नाहीत. तुम्ही दिलेली आश्‍वासने हिंदू विसरलेले नाहीत. ‘अच्छे दिन’ येणे हा जुमला होता, जनतेच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणे हा एक ‘जुमला’ होता. तसेच राम मंदिराचे आहे का ? एकतर राम मंदिर बांधा, नाहीतर हा ‘जुमला’ म्हणून घोषित करा, राममंदिर तुम्हाला बांधणे जमत नसेल, तर आम्ही बांधू असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री. उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर दसरा मेळाव्यात केले. १८ ऑक्टोबर या दिवशी सहस्रावधी शिवसैनिकांच्या उपस्थितीत शिवसेनेचा ५२ वा दसरा मेळाव्यात बोलत होते.

या वेळी उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की,

१. रावण वध होऊन कित्येक शतके गेली; तरीही प्रतिवर्षी रावण उभा रहातच आहे; मात्र आपले राममंदिर उभे रहात नाही.

२. खोटे बोलल्यावर सत्ता येत असेल; मात्र खोटे बोलून तुम्ही देश ज्वालामुखीच्या तोंडावर नेऊन ठेवला आहे. राममंदिराची घोषणा करायची आणि कधी बांधणार ते सांगायचे नाही. ‘एन्.डी.ए.’ (लोकशाही आघाडी सरकार) राममंदिर बांधण्याचे आश्‍वासन दिले होते, जर हे आश्‍वासन पाळले जात नसेल, तर याच्या ‘डी.एन्.ए.’मध्ये गडबड झाली आहे.

३. बाबरी पाडल्यानंतर जे शेपट्या आत घालून पळाले होते. ते आज छाती काढून पुढे आले आहेत. त्या वेळी मात्र हे बिळात लपले होते. बाबरी पाडण्यासाठी अनेक कारसेवक मारले गेले आहेत. त्यांच्या गळात दगड बांधून त्यांना शरयू नदीत बुडवले गेले. त्यांच्या बलीदानाचे मूल्य ठेवा.

४. साडेचार वर्षे होत आली; मात्र देशाचे पंतप्रधान अयोध्येला गेले नाहीत.

५. हिंदुत्वाचे दायित्व आल्यावर आम्ही हे दायत्वही समर्थपणे पेलले. हिंदुत्वाचे दायित्व शिवसेनेने घेतले आहे. ही हिंदुत्वाची वज्रमूठ आहे. हे दायित्व आम्ही नम्रपणाने पुढे घेऊन जात आहोत.

६. भाजपला सत्तास्थानी नेण्यामध्ये संघाचा हात होता. आता जर भाजपचे कार्य पटत नाही, तर त्यांना सत्तेतून बाहेर का काढत नाही ?

७. वल्लभभाई पटेल असते, तर काश्मीरचा प्रश्‍न शिल्लक राहिला नसता, असे तुम्ही म्हणता. स्वातंत्र्यवीर सावरकर असते, तर पाकिस्तान राहिला नसता. आता वल्लभभाईही नाहीत आणि सावरकरही नाहीत; मात्र त्यांच्याकडून स्फूर्ती घेणार्‍यांच्या हातात सत्ता आहे, तर तुम्ही काय करत आहात ?

८. रमजान असला की केवळ युद्धबंदी होते आणि नवरात्री-गणेशोत्सवात हिंदूंचीच मुस्कटदाबी होते. कुणाचे तरी चोचले पुरवण्यासाठी युद्धबंदी आणत असाल, तर मग हिंदूंच्या सणांनाही आडकाठी आणू नका.

९. आमच्या पंतप्रधानांच्या शपथविधाला पाकिस्तानाच पंतप्रधान येतात आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या वाढदिवसाला आपले पंतप्रधान जातात. पाकिस्तानची आक्रमणे जोपर्यंत थांबत नाहीत, तोपर्यंत राजनैतिकच नव्हे, तर कोणतेही संबंध न ठेवण्याच्या घोषणा तुम्हीच करत होतात. आता आपण त्यांच्याशी क्रिकेट खेळत आहोत. देशाच्या राष्ट्रविषयक आणि परराष्ट्र धोरणाला काही शेंडा-बुडखा आहे कि नाही ?

११. ‘मिटू मिटू’ न करता त्याच्या कानशिलात द्या. शिवसेना तुमच्या पाठीशी आहे.

…तर तमाम हिंदूंना घेऊन आम्ही राममंदिर बांधू !

२५ नोव्हेंबरला हातात भगवा घेऊन मी अयोध्येत जाणार आहे. प्रारंभी मी केवळ आठवण करून देणार आहे. तुम्ही राममंदिर बांधणार कि आम्ही बांधू. तुमच्याकडून बांधकामाला प्रारंभ झाला नाही, तर सर्व हिंदूंना घेऊन आम्ही राममंदिर बांधू.

विशेष : श्री. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाच्या वेळी मैदानात जोरात वारे वहायला लागले; तेव्हा ते म्हणाले, ‘‘हा चांगला संकेत आहे’’; मात्र त्यांचे भाषण झाल्यावर राष्ट्रगीत आणि रावणदहन झाल्यावर पाऊस पडायला लागला. यापूर्वीच श्री. उद्धव ठाकरे यांनी केवळ पूर्वज आणि देवतांचे आशीर्वाद यांच्यामुळेच दसरा निर्विघ्नपणे होत असल्याचे म्हटले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now