सीमेवरील कोणत्याही परिस्थितीला उत्तर देण्यास सैन्य सदैव सिद्ध ! – लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह

पाकला वठणीवर आणण्यास सैन्य सिद्ध आहे, हे खरे आहे; पण सैन्याला तसा आदेश देण्याची सरकारची इच्छाशक्ती नाही, हेही तितकेच खरे आहे !

नवी देहली – सीमेवरील कोणत्याही परिस्थितीला उत्तर देण्यास सैन्य सदैव सिद्ध आहे, असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी केले. पाकिस्तानने काही दिवसांपूर्वी भारताला डिवचतांना एका ‘सर्जिकल स्ट्राइक’च्या बदलल्यात १० ‘सर्जिकल स्ट्राइक्स’ करण्याची चेतावणी दिली होती. त्याला लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी उत्तर दिले. कोणी काहीही म्हणो, त्याचा सैन्यावर काहीही परिणाम होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सिंह पुढे म्हणाले, ‘‘घुसखोरांना रोखण्यासाठी सीमेवरील विविध भागांत  वीजवाहक तारांची कुंपणे अस्तित्वात आहेत. या वीजवाहक कुंपणाचा चांगला परिणाम होत असून त्यामुळे आतंकवादी कारवाया आणि घुसखोरी रोखण्यात मोठ्या प्रमाणात यश आले आहे. सैन्याला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, संपूर्ण आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून आतंकवाद्यांसाठी उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधांमध्ये अद्याप कुठलाही पालट झालेला नाही. आतंकवादी कारवायांसाठी त्यांना पाककडून अद्यापही रसद पुरवली जात आहे. त्यामुळेच पाकिस्तानातून आतंकवादाचे प्रशिक्षण घेऊन आलेल्या घुसखोरांना रोखण्यात अडचणी येत आहेत. याला सर्वस्वी पाकिस्तानच उत्तरदायी आहे.’’

(म्हणे) ‘सीमेपलीकडून गोळ्या आल्यास प्रतिवार करतांना गोळ्यांची संख्या मोजू नका !’ – गृहमंत्री

पाकने वार केल्यावर प्रतिवार करणारे नव्हे, तर तो वार करणारच नाही एवढी त्याच्यावर जरब बसवणारे शासनकर्ते हवेत ! असे शासनकर्ते स्वातंत्र्यानंतर ७१ वर्षांनीही भारताला लाभले नाहीत, हे लोकशाहीचे अपयश होय !

गुंटूर – भारतात आतंकवादी पाठवून पाक भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. मी भारतीय सैन्याला सांगितले आहे की, पाक आपला शेजारी आहे. त्यामुळे त्याच्यावर प्रथम गोळीबार करू नका; मात्र सीमेपलीकडून गोळीबार झाल्यास प्रतिवार करतांना गोळ्यांची संख्या मोजू नका, असे वक्तव्य भारताचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केले.

आंध्रप्रदेशातील गुंटूरमधील एका सार्वजनिक कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. ‘पाकने सीमेपलीकडून भारतात आतंकवादी पाठवणे थांबवलेले नाही. भारतही आतंकवादाच्या विरोधात कठोर भूमिका घेत आहे. काश्मीरमध्ये पोलीस, सैनिक आणि सुरक्षादले हे एकत्रितपणे प्रतिदिन आतंकवाद्यांचा बीमोड करत आहेत’, असे ते म्हणाले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now