केंद्र सरकारकडून ६४ आयुर्वेद महाविद्यालयांतील प्रवेशप्रक्रियांवर बंदी

  • संधी देऊनही प्रवेशप्रक्रियेतील त्रुटी न सुधारल्याने कारवाई !

  • महाराष्ट्रातील ९ खाजगी आयुर्वेद महाविद्यालयांचा समावेश !

नवी देहली – ‘भारतीय केंद्रीय चिकित्सा परिषदे’ने (‘सीसीआयएम्’ने) केलेल्या शिफारसींवरून मोदी सरकारच्या ‘आयुष’ मंत्रालयाने देशभरातील ६४ आयुर्वेद महाविद्यालयांतील चालू वर्षीची प्रवेशप्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतला. (प्रवेशप्रक्रियेतील त्रुटी आतापर्यंतच्या शासनकर्त्यांच्या लक्षात कशा आल्या नाहीत ? – संपादक) या वर्षी ३१ ऑक्टोबरपर्यंत आयुर्वेद महाविद्यालयांतील प्रवेशप्रक्रिया चालणार होती. यात अनेक शासकीय अनुदानित महाविद्यालयांचाही समावेश असून ती सर्व खासगी महाविद्यालये आहेत.

यांमध्ये महाराष्ट्रातील ९ महाविद्यालयांचा समावेश आहे. सध्या देशभरात ३६० आयुर्वेद महाविद्यालये कार्यरत आहेत. ‘भारतीय केंद्रीय चिकित्सा परिषदे’ने पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवणार्‍या अनेक महाविद्यालयांची पडताळणी करून त्यांच्या प्रवेशप्रक्रियेतील विविध त्रुटींवर बोट ठेवले होते. त्यांना त्या त्रुटी दुरुस्त करण्याची संधीही देण्यात आली होती; मात्र महाविद्यालयांनी सुधारणा न केल्याने ‘आयुष’ मंत्रालयाने ही कारवाई केली. ‘आयुर्वेद शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अशी कठोर पावले उचलणे आवश्यक असून शासनाच्या या निर्णयाचे स्वागतच करायला हवे’, अशा प्रतिक्रिया आयुर्वेद क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केल्या आहेत.


Multi Language |Offline reading | PDF