हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या विरोधानंतरही ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर सामाजिक स्मृती पुरस्कारा’चे वितरण

हिंंदुत्वनिष्ठ संघटनांना केराची टोपली दाखवणारी सातारा नगरपालिका ! यावरूनच हिंदूसंघटनाची अपरिहार्यता लक्षात येते !

सातारा, १५ ऑक्टोबर (वार्ता.) – महाराष्ट्रभरातील अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि वारकरी संप्रदाय यांनी वैध मार्गाने केलेला विरोध डावलून सातारा नगरपालिकेच्या वतीने ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर सामाजिक स्मृती पुरस्कार’ ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांना वितरित करण्यात आला. या वेळी १०० हून अधिक पोलीस, गोपनीय विभागाचे कर्मचारी, २ जीप, मेटल डिटेक्टर यंत्रे, असा फौजफाटा तैनात करण्यात आल्यामुळे कार्यक्रमस्थळास छावणीचे स्वरूप आले होते. कार्यक्रमास जेमतेमच उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी श्रोत्यांपेक्षा पोलिसांची गर्दी अधिक होती. निम्मे सभागृह रिकामे असल्यामुळे सातारकरांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचेच चित्र पहायला मिळाले. संपूर्ण कार्यक्रम तणावपूर्ण वातावरणात पार पडल्याचे उपस्थित नागरिकांनी सांगितले. (सातारा नगरपालिकेने पुरोगाम्यांच्या दबावाला बळी न पडता, तसेच एका पुरस्कारासाठी इतका व्यय न करता पुढील वर्षीपासून पुरस्कार रहित करावा ! – संपादक) या वेळी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांसह आजी-माजी नगरसेवक, तसेच दाभोलकर कुटुंबीय उपस्थित होते.

वैज्ञानिक प्रगतीसमवेत गुन्हेगारी वाढू नये, यासाठी संयमही शिकला पाहिजे ! – डॉ. काकोडकर

पुरस्काराला उत्तर देतांना डॉ. काकोडकर म्हणाले, ‘‘डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी केलेले अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य म्हणजे एक लहानशी पायरी आहे. त्यातून पुढे जाऊन आता देशातील युवकांमध्ये संशोधन वृत्ती वाढली पाहिजे. नवनवीन शोध लागले पाहिजेत. वैज्ञानिक प्रगतीसमवेत गुन्हेगारी वाढू नये, यासाठी संयमही शिकला पाहिजे अन्यथा अशी प्रगती वाढत्या गुन्हेगारीला आळा घालू शकणार नाही.’’

हिंदु जनजागृती समितीच्या सौ. रूपा महाडिक यांना पोलिसांकडून कलम १४९ ची नोटीस !

वैध आणि न्याय्य मार्गाने कार्य करणार्‍या हिंदु जनजागृती समितीच्या महिला कार्यकर्त्यांना नोटीस बजावणे, हा पोलिसांचा हिंदुद्वेष नव्हे का ?

कार्यक्रमाच्या दिवशी म्हणजे १४ ऑक्टोबरला पोलिसांनी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. रूपा महाडिक यांना संपर्क करून नोटीस स्वीकारण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलावले आणि ‘या कार्यक्रमात कोणतीही बाधा निर्माण झाल्यास तुम्हाला वैयक्तिकरित्या उत्तरदायी धरून कायदेशीर कारवाई करण्यात येईल’, या आशयाची नोटीस दिली. एका पोलिसाने सौ. महाडिक यांची अनुमती न घेता त्यांचे छायाचित्रही काढले. (अशा पोलिसांवर कारवाई होण्यासाठी त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करावी आणि त्याची माहिती सनातन प्रभातलाही कळवावी. – संपादक) कार्यक्रम झाल्यानंतर १५ ऑक्टोबर या दिवशी सौ. महाडिक यांनी नोटिसीच्या उत्तराचे पत्र पोलिसांना दिले. त्यात म्हटले आहे की, गोपनीय शाखेच्या कर्मचार्‍याने नोटीस देतांना माझे छायाचित्र काढले आहे. कार्यक्रमाच्या कालावधीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला नाही. कार्यक्रमास मी अथवा संघटनेच्या वतीने कोणीही उपस्थित नव्हते.

हिंदुत्वनिष्ठ आणि सातारकर यांचा विरोध असतांनाही हा पुरस्कार देणे म्हणजे हिंदु वारकर्‍यांच्या धार्मिक भावना पायदळी तुडवण्याचा प्रकार ! – ह.भ.प. पू. निवृत्ती महाराज वक्ते

राष्ट्रीय वारकरी सेनेचे ह.भ.प. पू. निवृत्ती महाराज वक्ते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सातारा येथील साहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे पाठपुरावा करून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीमधील लक्षावधी रुपयांचे घोटाळे माहितीच्या अधिकारातून उघड झाले होते. त्यांच्यावर विशेष लेखा परीक्षक नेमण्यात यावा, असा अहवाल आयुक्तांनी दिला होता. या अहवालातून त्यांनी भ्रष्ट कारभार केल्याचे सिद्ध झाले होते. मृत्यूनंतर वैर विसरायचे, हा धर्माचा नियम आहे; परंतु भ्रष्ट कारभार कसा विसरायचा ? राष्ट्रीय वारकरी सेनेने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली होती. हिंदुत्वनिष्ठ आणि सातारकर यांचा विरोध असतांनाही सातारा नगरपालिकेने हा पुरस्कार देणे म्हणजे हिंदु वारकर्‍यांच्या धार्मिक भावना पायदळी तुडवण्याचा प्रकार आहे. याचा आम्ही निषेध करतो.


Multi Language |Offline reading | PDF