लवकरच ‘अलाहाबाद’चे नाव पालटून ‘प्रयागराज’ असे नामकरण करणार ! – योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ यांचा आदर्श घेऊन केंद्र सरकार आणि भाजपच्या २० राज्यांमधील सरकारांनी शहरे, गावे किंवा पथमार्ग यांना विदेशी आक्रमकांनी ठेवलेली नावे पालटून प्राचीन हिंदु नावे द्यायला हवीत !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील ‘अलाहाबाद’ जिल्ह्याचे पुन्हा नामांतर करून त्याचे प्राचीन नाव ‘प्रयागराज’ हे ठेवण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही माहिती दिली. या नामांतरास राज्यपाल राम नाईक यांचीही संमती मिळाली आहे. प्रयागराज येथील विश्राम भवनात ते पत्रकारांशी बोलत होते.

योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘‘कुंभपर्वासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये आखाडा परिषद, अन्य संस्था अन् संघटना यांनी ‘अलाहाबाद’ जिल्ह्याचे नाव पालटण्याचा प्रस्ताव सादर केला होता.’’

उत्तरप्रदेशातील मुझफ्फरनगर, फैजाबाद, गाजियाबाद आदी जिल्ह्यांच्या नावांमध्येही पालट करा ! – हिंदुत्वनिष्ठांची पत्रकार परिषदेद्वारे मागणी

हिंदु जनजागृती समितीचा पत्रकार परिषदेत सहभाग

मुजफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील ‘अलाहाबाद’चे नाव पालटून प्राचीन ‘प्रयागराज’ नाव देण्याची घोषणा केली आहे. त्याचे आम्ही समर्थन आणि अभिनंदन करतो. भारतावर आक्रमण करणार्‍या मोगलांनी आणि ब्रिटिशांनी दिलेली देशातील विविध प्रदेशांची नावे पालटावी, अशी मागणी येथे हिंदुत्वनिष्ठांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत विषय मांडला. या वेळी त्यांच्यासमवेत विश्‍व हिंदु परिषदेचे विभागाध्यक्ष श्री. ललित माहेश्‍वरी, श्री. अरुण पंवार, अधिवक्ता विकास वर्मा, दयाचंद आचार्य, विकास अग्रवाल, पवन सिंघल, तसेच राष्ट्रीय हिंदू शक्ती संघटनेचे राष्ट्रीय संयोजक संजय अरोरा हे उपस्थित होते.

श्री. रमेश शिंदे म्हणाले, ‘‘भारताच्या स्वातंत्र्यानंतरच ही नावे पालटायला हवी होती; मात्र मतांच्या लाचारीसाठी तथाकथित निधर्मी सरकारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. जर्मनी आणि इस्रायल या देशांत तेथील गावे अथवा शहरे यांना अशा प्रकारे आक्रमणकर्त्यांची नावे दिली आहेत, असे कुठेही आढळत नाही. अशा वेळी योगी आदित्यनाथ यांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. आता त्यांनी पुढे जाऊन मुझफ्फरनगर, फैजाबाद, गाजियाबाद आदी नावेही पालटावीत.’’

राममंदिर विनाविलंब बांधावे !

श्री. रमेश शिंदे पुढे म्हणाले, ‘‘मागील मासामध्ये देहलीमध्ये उत्तर भारतातील हिंदु संघटनांचे अधिवेशन हिंदु जनजागृती समितीकडून आयोजित करण्यात आले होते. या वेळी या संघटनांनी त्यांच्या मागण्यांचे प्रस्ताव संमत करून ते केंद्र सरकारकडे पाठवले होते. यात राममंदिर उभारण्याचेही सूत्र होते. तसेच काश्मीरमध्ये हिंदूंचे पुनर्वसन आणि भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे आदी मागण्याही होत्या. सरकारने हिंदूंच्या मागण्यांकडे दुर्लक्ष न करता विनाविलंब राममंदिर बांधले पाहिजे.’’ ते पुढे असेही म्हणाले की, भारताच्या फाळणीनंतर मुसलमानांना स्वतंत्र राष्ट्र देण्यात आले, तेव्हा भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक होते. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात भारतीय राज्यघटनेत ‘सेक्युलर’ आणि ‘सोशालिस्ट’ हे शब्द घुसवले. हे शब्द काढले पाहिजेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now