समलैंगिकता, विवाहबाह्य संबंध आणि ‘मी टू’ !

संपादकीय

सध्या देशात ‘मी टू’ (मीसुद्धा) अभियानाच्या माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टीतील महिला पुरुषांवर बलात्कार, विनयभंग, अश्‍लील व्यवहार यांविषयीचे जुन्या आणि नव्या घटनांना सामाजिक माध्यमांद्वारे समोर आणत आहेत. अशा घटना पूर्वीही सांगण्याचा प्रयत्न झाला होता. त्यातही ‘कास्टिंग काऊच’चे (साहाय्य करण्याचा मोबदला मागण्याचे) प्रकार समोर आले होते. एकूणच या सर्व प्रकरणांत महिलांचे लैंगिक शोषण हेच मुख्य सूत्र होते. सध्या तनुश्री दत्ता या अभिनेत्रीने ‘१० वर्षांपूर्वी अभिनेते नाना पाटेकर यांनी विनयभंग केला’ असा आरोप करत तक्रार केली आहे. तसेच तिने अन्य दोघांवरही अशा प्रकारचा आरोप केला आहे. अन्य एका महिला निर्मातीने अभिनेते आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. आरोप झालेल्यांपैकी काही अभिनेते आणि दिग्दर्शक यांनी क्षमायाचना केली आहे, तर काहींनी ते आरोप फेटाळून लावले आहेत. नाना पाटेकर यांनी तनुश्री यांना अब्रूहानीची नोटीसही बजावली आहे. याच वेळेस काही महिला पत्रकारांनी सध्याचे केंद्रीयमंत्री आणि पत्रकार एम्.जे. अकबर यांच्यावरही विनयभंगाचा आरोप केला आहे. यांतील अनेक घटना आणि प्रसंग काही वर्षे जुने आहेत. ‘अशा घटना काहींनी सांगितल्या असल्या, तरी अनेकांनी त्या अद्याप सांगितल्याही नसतील’, असेही म्हटले जात आहे. या सर्व गोष्टी नामांकित लोकांच्या संदर्भात आणि तेही बहुतेक चित्रपटसृष्टीच्या संदर्भात आहेत. त्यामुळे या विषयावर सामान्य जनतेमध्ये विशेष महत्त्व दिले जात नाही, असेही दिसून येत आहे; कारण भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीकडे लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन नैतिकतेच्या आधारावर आहे, असे ठामपणे सांगता येणार नाही. तनुश्री दत्ता यांनी जो आरोप केला आहे तो पहाता ‘या अभिनेत्रीने चित्रपटांमध्ये अनेक अश्‍लील दृश्ये दिली आहेत. त्यामुळे तिने केलेले आरोप किती गांभीर्याने घ्यायचे?’, असा प्रश्‍न लोकांमध्ये आहे. आलोक नाथ यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळतांना म्हटले, ‘त्या महिलेवर बलात्कार झाला असेल; मात्र मी तो केलेला नाही.’ आता या विधानाचा अर्थ जनतेने काय घ्यायचा ? ‘चित्रपटक्षेत्रात असे होतच असते; कारण तसे करू देणार्‍यांना काहीतरी लाभ मिळवायचा असतो, तसेच त्यांना प्रसिद्धीसाठी असे प्रकार करायचे असतात’, असे लोकांकडून म्हटले जात आहे. अभिनेते असरानी यांनीही अशा प्रकारचे विधान केले आहे. ते म्हणाले, ‘‘हे सर्व प्रकार केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी चाललेले आहेत. याला गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही.’’ भाजपचे खासदार उदीत राज यांनीही ‘असे आरोप करण्यासाठी महिला कुणाच्या सांगण्यावरून पैसे घेतात, सर्व महिला चांगल्या असतात का ?’ अशा प्रकारचे विधान केले आहे.

न्याय कसा मिळणार ?

गेल्या काही दिवसांत सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी संबंधांना मान्यता दिली. पूर्वी हा गुन्हा समजला जात होता. त्यातच विवाहबाह्य संबंधही गुन्हा नसल्याचा निर्णय न्यायालयाने दिला. ‘हे दोन्ही निर्णय समाजाच्या नैतिकतेच्या दृष्टीने अत्यंत अयोग्य आहेत’, असे लोकांचे म्हणणे आहे. या दोन्ही विषयांवर सध्या जे बलात्काराचे आणि विनयभंगाचे आरोप करत आहेत त्यांनी कधीही याचा विरोध केला नाही किंवा ‘यामुळे समाजातील अनैतिकतेला प्रोत्साहन मिळेल’, असेही म्हटलेले नाही. चित्रपटसृष्टीतील अनेकांनी याचे समर्थनच केले आहे. अनेकांनी तर यापूर्वीच ‘कास्टिंग काऊच’विना चित्रपटक्षेत्रात काम मिळत नाही किंवा साहाय्य केले जात नाही’, असे म्हटलेच आहे. तनुश्री दत्ता यांचे प्रकरण १० वर्षांपूर्वीचे होते. त्याविषयी त्यांनी कधीही पोलिसांत तक्रार केली नव्हती. याची जाणीव गृहराज्यमंत्र्यांनी करून दिल्यावर आता त्यांनी तक्रार प्रविष्ट केली. ‘कास्टिंग काऊच’च्याही तक्रारी कधी पोलिसांत प्रविष्ट झालेल्या दिसत नाहीत. काही वर्षांपूर्वी ‘पेज थ्री’ नावाचा हिंदी चित्रपट आला होता आणि त्याला राष्ट्रीय पारितोषिक मिळाले होते. त्यात चित्रपटसृष्टीतील अनैतिकतेचे दर्शन घडवण्यात आले होते. या चित्रपटाच्या निर्मात्यावरही नंतर लैंगिक शोषणाचा आरोप होऊन गुन्हा नोंद झाला होता; मात्र न्यायालयाने त्याला निर्दोष ठरवले. सध्या जे आरोप होत आहेत, त्यावर पुढे काय होणार, हा प्रश्‍नच आहे; कारण अनेकांनी केवळ आरोप केले आहेत. पोलिसांत तक्रार केलेली नाही. ‘पीडितां’ना न्याय मिळावा, यासाठी कोणती संघटना, पक्ष किंवा समाज मागणी करत आहे किंवा आंदोलन करत आहे, असेही दिसून आलेले नाही. महिलांनी केलेले आरोप खरे असतील, तर संबंधितांना शिक्षा झालीच पाहिजे. याविषयी कोणाचेही दुमत असणार नाही; मात्र तसे या सर्व प्रकरणांत दिसूत येत नाही, ही वस्तूस्थितीही नाकारता येत नाही.

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र हेच उत्तर !

भारतातील वाढती अनैतिकता रोखणे अशक्य झाले आहे; कारण नैतिकता आज कोणालाही नको आहे. ज्यांना हवी आहे, त्यांना कायद्यांद्वारे दाबले जात आहेे, ही वस्तूस्थिती आहे. चित्रपटांमधून जी काही अश्‍लीलता दाखवली जात आहे, त्याचा परिणाम काय होतो, हे तेच लोक सांगत आहेत, हा मोठा विनोद आहे. चित्रपटांतील अश्‍लीलता, संकेतस्थळे, साहित्य, वर्तमानपत्रे यांद्वारे पसरवली जाणारी अश्‍लीलता रोखली पाहिजे. त्यासाठी समाजाला नैतिकतेचे शिक्षण दिले पाहिजे आणि अनैतिकता पसरवणार्‍यांवर कठोर शिक्षा झाली पाहिजे. हे सध्याच्या लोकशाहीत अशक्य आहे. अधर्मी व्यवस्थेत धर्म सांगणे अशक्य आहे. त्यासाठी अधर्म नष्ट करून धर्मसंस्थापना करणे आवश्यक आहे. ती केवळ हिंदु राष्ट्रात शक्य आहे. ज्यांना नैतिकता हवी आहे, त्यांनी हिंदु राष्ट्रासाठी कटीबद्ध व्हावे.


Multi Language |Offline reading | PDF