नवरात्रीचे व्रत करतांना करावयाच्या काही धार्मिक कृती !

सध्या चालू असलेल्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने…

शारदीय नवरात्र : अध्यात्मशास्त्र, वैज्ञानिक संशोधन आणि देवीदर्शन

१० ते १८ ऑक्टोबर या कालावधीत शारदीय नवरात्रोत्सव साजरा होत आहे. या निमित्त ‘शारदीय नवरात्र : अध्यात्मशास्त्र, वैज्ञानिक संशोधन आणि देवीदर्शन’ हे वैशिष्ट्यपूर्ण सदर आरंभ करत आहोत. नवरात्रीच्या काळात भारतातील विविध प्रसिद्ध अन् प्राचीन देवी मंदिरांचा इतिहास, त्यांचे महत्त्व, छायाचित्रे, तसेच नवरात्रोत्सवामागील अध्यात्मशास्त्र इत्यादी माहिती या सदरातून आपण जाणून घेणार आहोत. देवीशी संबंधित विविध धार्मिक कृतींसंदर्भात वैज्ञानिक संशोधनही या वैशिष्ट्यपूर्ण सदरातून प्रसिद्ध करणार आहोत. या माध्यमातून वाचकांची देवीप्रती भक्ती वाढावी, अशी जगज्जननी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना !

‘महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे नवरात्र ! नवरात्र हे देवीचे व्रत असून महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी हे व्रत कुलाचार म्हणूनसुद्धा पाळले जाते. या व्रतात नऊ दिवस व्रतस्थ राहून देवीची मनोभावे आराधना केली जाते. आज अनेक राज्यांत याला उत्सवाचे स्वरूपही आले आहे. नवरात्र व्रतामागील इतिहास, या व्रताचे महत्त्व आणि ते व्रत करण्याची पद्धत यांसंदर्भातील माहिती प्रस्तुत लेखातून जाणून घेऊया.

१. नवरात्रीचा इतिहास

अ. रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा, या उद्देशाने नारदाने रामाला नवरात्रीचे व्रत करायला सांगितले. नंतर हे व्रत पूर्ण केल्यावर रामाने लंकेवर स्वारी करून शेवटी रावणाला ठार मारले.

आ. महिषासुर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस युद्ध करून देवीने नवमीला रात्री महिषासुराला ठार मारले. तेव्हापासून तिला ‘महिषासुरमर्दिनी’ म्हणू लागले.

२. नवरात्रीचे महत्त्व

अ. जगात जेव्हा जेव्हा तामसी, असुरी आणि क्रूर लोक प्रबळ होऊन सात्त्विक अन् धर्मनिष्ठ सज्जनांना छळतात, तेव्हा देवी धर्मसंस्थापनेकरता पुनःपुन्हा अवतार घेते. त्या देवतेचे हे व्रत आहे.

आ. नवरात्रीत देवीतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटींनी कार्यरत असते. देवीतत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी नवरात्रीच्या काळात ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ हा नामजप अधिकाधिक करावा.

३. व्रत करण्याची पद्धत

नवरात्र व्रताला पुष्कळ घराण्यांत कुलाचाराचे स्वरूप असते. आश्‍विन शुक्ल पक्ष प्रतिपदेस या व्रताचा प्रारंभ होतो.

अ. घरात पवित्र स्थानी एक वेदी सिद्ध करून त्यावर सिंहारूढ अष्टभुजादेवीची आणि नवार्णयंत्राची स्थापना करावी. यंत्राशेजारी घट स्थापून त्याची आणि देवीची यथाविधी पूजा करावी.

आ. नवरात्र महोत्सवात कुलाचाराप्रमाणे घटस्थापना आणि मालाबंधन करावे. (घटस्थापनेसंदर्भात अधिक माहिती १० ऑक्टोबर २०१८ या दिवशीच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. – संपादक)

इ. सप्तधान्ये आणि कलश (वरुण) स्थापनेचे वैदिक मंत्र येत नसल्यास पुराणोक्त मंत्र म्हणावेत. तेही येत नसल्यास त्या त्या वस्तूचे नाम घेऊन ‘समर्पयामि’ म्हणून नाममंत्रांचा विनियोग करावा. कलशामध्ये माळ पोहोचेल अशी बांधावी.

ई. ९ दिवस प्रतिदिन कुमारिकेची पूजा करून तिला भोजन घालावे. सुवासिनी म्हणजे प्रकट शक्ती, तर कुमारिका म्हणजे अप्रकट शक्ती. प्रकट शक्तीचा थोडा अपव्यय होत असल्याने सुवासिनीपेक्षा कुमारिकेत एकूण शक्ती अधिक असते.

उ. अखंड दीपप्रज्वलन, त्या देवतेचे माहात्म्यपठन (चंडीपाठ), सप्तशतीपाठ, देवीभागवत, ब्रह्मांडपुराणातील ललितोपाख्यानाचे श्रवण, ललिता-पूजन, सरस्वतीपूजन, उपवास, जागरण इत्यादी कार्यक्रम करून क्षमता आणि सामर्थ्य यांनुसार नवरात्रमहोत्सव साजरा करावा.

ऊ. पूजकाला उपवास असला, तरी देवतेला नेहमीप्रमाणे अन्नाचा नैवेद्य दाखवावा.

ए. या काळात उत्कृष्ट आचाराचे एक अंग म्हणून श्मश्रू न करणे (दाढीमिशीचे केस आणि डोक्यावरील केस न कापणे), कडक ब्रह्मचर्यपालन, पलंगावर अन् गादीवर न झोपणे, सीमा न उल्लंघणे, पादत्राणे न वापरणे अशा विविध गोष्टींचे पालन केले जाते.

ऐ. नवरात्राच्या संख्येवर भर देऊन काही जण शेवटच्या दिवशीही नवरात्र ठेवतात; पण शास्त्राप्रमाणे शेवटच्या दिवशी नवरात्र उठणे आवश्यक आहे. त्या दिवशी समाराधना (भोजनप्रसाद) झाल्यावर वेळ उरल्यास त्याच दिवशी सर्व देव काढून अभिषेक आणि षोडशोपचार पूजा करावी. हे शक्य नसल्यास दुसर्‍या दिवशी सर्व देवांवर पूजाभिषेक करावा.

ओ. देवीच्या मूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी पेरलेल्या धान्याची झालेली रोपे देवीला वाहतात. त्या रोपांना ‘शाकंभरीदेवी’ म्हणून स्त्रिया डोक्यावर धारण करून विसर्जनाला घेऊन जातात.

औ. नवरात्र बसवतांना आणि उठवतांना देवांचे ‘उद्वार्जन’ अवश्य करावे. उद्वार्जनासाठी नेहमीप्रमाणे लिंबू, भस्म इत्यादी वस्तू वापराव्यात. रांगोळी किंवा भांडी घासायचे चूर्ण वापरू नये.

अं. शेवटी स्थापित घट आणि देवी यांचे मनोभावे उत्थापन (विसर्जन) करावे.

संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

‘शक्तीचे प्रास्ताविक विवेचन’, ‘शक्ति (भाग २)’, ‘देवीपूजनाशी संबंधित कृतींचे शास्त्र’, ‘करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवी’, ‘श्री सरस्वतीदेवी’, आणि ‘आरतीसंग्रह (आरत्यांच्या अर्थासह)’ हे देवीपूजनाशी संबंधित सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ ऑनलाइन खरेदीसाठी भेट द्या : SanatanShop.com/shop/en/११७-marathi

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now