राफेल खरेदी करारातील निर्णयप्रक्रियेचा तपशील सादर करा ! – सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला आदेश

नवी देहली – भारताने फ्रान्ससमवेत केलेल्या राफेल लढाऊ विमाने खरेदीच्या करारातील निर्णयप्रक्रियेचा तपशील सादर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला आहे. ‘आम्ही केंद्र सरकारला या संदर्भात नोटीस बजावणार नाही. सरकारनेही करारातील तांत्रिक गोष्टींचा तपशील सादर न करता केवळ निर्णयप्रक्रियेचा तपशील बंद लिफाफ्यात सादर करावा’, असे न्यायालयाने म्हटले आहे. या कराराला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे. या कराराचा तपशीलही सादर करावा, असेही याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. त्यावर झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने वरील आदेश दिला.

सुनावणीच्या वेळी अ‍ॅटर्नी जनरल के.के. वेणूगोपाल म्हणाले, ‘‘संसदेत राफेल करारावरून प्रश्‍न उपस्थित करता यावे, या राजकीय स्वार्थापोटी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवरच या याचिका केल्या जात आहेत.’ यावर सरन्यायाधीश रंजन गोगोई म्हणाले, ‘‘केवळ न्यायाधिशांसमोरच निर्णयप्रक्रियेचा तपशील घोषित करायला सांगितल्यास तुम्ही काय कराल ?’’ यावर वेणूगोपाल म्हणाले, ‘‘राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण विभागाशी संबंधित प्रश्‍न असल्याने आम्ही याचा तपशील कोणासमोरही सादर करू शकत नाही.’’ त्यानंतर न्यायालयाने नोटीस न बजावता तपशील सादर करण्याचा आदेश दिला.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now