हिंदुत्वासाठी धडाडीने कार्य करणार्‍या दिवंगत (श्रीमती) हिमानीताई सावरकर यांच्या हृद्य आठवणी !

११ ऑक्टोबर २०१८ या दिवशी हिमानीताई सावरकर यांची दिनांकानुसार पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…

हिमानीताई सावरकर

हिंदु महासभा आणि अभिनव भारत या संघटनांच्या नेत्या, श्री. नथुराम गोडसे यांच्या पुतणी, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नातसून आणि हिंदुत्वाची तळपती तलवार श्रीमती हिमानी सावरकर यांचे ११.१०.२०१५ या दिवशी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र श्री. सात्यकी सावरकर यांनी व्यक्त केलेले विचार श्रीमती हिमानीताई यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने प्रसिद्ध करत आहोत.

१. हिंदूंना आतंकवादी संबोधणार्‍यांना सडेतोड उत्तर

‘आईने आतापर्यंत हिंदूंना आतंकवादी संबोधणार्‍यांना सडेतोड उत्तर दिले आहे. ‘हिंदू आतंकवादी नाहीत’, ‘देशात हिंदूंकडून बॉम्बस्फोट होत असतील, तर ती इस्लामी आतंकवादाच्या विरोधातील प्रतिक्रियाच आहे’, ‘आपले गृहमंत्री आबा पाटील (महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री दिवंगत रा.रा. पाटील) म्हणतात की, ‘गोळीचे उत्तर गोळीनेच देऊ’, त्याच धर्तीवर ‘बॉम्बचे उत्तर बॉम्बने’ असे म्हटले, तर बिघडले कुठे ?’, असे आईचे एकावर एक वाग्बाण ऐकून दोन तपे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या पत्रकारास निरुत्तर होऊन घाम फुटलेला मी पाहिला आहे.

२. ‘भगवा आतंकवाद’ या शब्दाला सर्वप्रथम उघड आक्षेप घेणार्‍या हिमानीताई !

वर्ष २००८ मध्ये मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी ‘अभिनव भारत’च्या कार्यकर्त्यांची धरपकड झाल्यावर आईने रुद्रावतार धारण केला. ‘भगवा आतंकवाद ? तुम्ही म्हणता की, आतंकवादाला धर्म नसतो ! मग केवळ ‘भगवा आतंकवाद’ कसा ? या आधी भारतात जे बॉम्बस्फोट झाले, त्याला इस्लामी आतंकवाद म्हणणार का ? त्याला जर तुम्ही रंग देणार नसाल, तर ‘भगवा आतंकवाद’ मी मानतच नाही’, असे बोलून ‘भगवा आतंकवाद’ या शब्दाला आक्षेप घेणारी आणि सर्व आरोप खोडून काढणारी राष्ट्रीय स्तरावर तेजाळलेली एकमेव शलाका म्हणजे हिमानी सावरकर ! माहेरची असिलता गोडसे !

३. हिंदुत्वाचे धडाडीने कार्य करतांना कौटुंबिक दायित्वही पार पाडणे

गेली पंधरा वर्षे अविरतपणे सामाजिक कार्य करूनही सांसारिक उत्तरदायित्व तिने नाकारले नाही. याचे उदाहरण म्हणजे माझ्या वडिलांना अर्धांगवात झाला असल्याने शरीर पंगू झाले होते. आई प्रतिदिन त्यांना अंघोळ घालायची. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाची साप्ताहिक बैठक सकाळी असायची. आई सकाळी लवकर उठून, वडिलांचे आवरून ‘डेक्कन क्वीन’ने पुण्याहून दादरला जायची. तिथे बैठक आणि अन्य कामे उरकायची अन् संध्याकाळी परत यायची. यात तिने कधीही खंड पडू दिला नाही.

४. आजारपणातही उत्तम स्मरणशक्ती आणि आकलनक्षमता असणे

फेब्रुवारी २०१५ मध्ये कर्करोगावर उपचार करत असतांना अर्धे शरीर पंगू झाल्याने आणि औषधांचा दुष्परिणाम तिचे शरीर सहन करू शकले नाही. या काळातसुद्धा तिची स्मरणशक्ती आणि आकलन उत्तम होते. नभोवाणीवर ऐकलेल्या बातम्यांवर ती माझ्याशी चर्चा करायची. तिच्या निधनाआधी दोन दिवस तिला ‘गुलाम अली’ प्रकरणी बातम्या देत होतो. शिवसेनेने केलेला यशस्वी विरोध ऐकून डोळे आणि मान हलवूनच तिने पसंती दर्शविली होती !’

– श्री. सात्यकी सावरकर (श्रीमती हिमानीताई सावरकर यांचे पुत्र)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now