सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने साधकांनी अनुभवले अनमोल भावक्षण !

‘प्रेम देण्यासाठी आई निर्मिली,

बिंदाई हे गुरूंचे रूप !!

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

सर्वपित्री अमावास्या जवळ येऊ लागली की, सर्व साधकजनांचा आनंद गगनात मावेनासा होतो. का बरं ? चिखलातून कमळ उमलावे, तसे या अमावास्येच्या दिवशी कमलासनस्थित श्री महालक्ष्मीस्वरूप सद्गुरु बिंदामातेचा वाढदिवस असतो ! ९.१०.२०१८ या दिवशी असलेल्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रामनाथी आश्रमातील त्यांच्या समवेत सेवा करणार्‍या साधकांनी एका अनौपचारिक भावसोहळ्याद्वारे सद्गुरु ताईंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. त्याचा हा भावमय वृत्तांत…

१. अशी केली भावपूर्ण सिद्धता !

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या वाढदिवसानिमित्त साधकांनी शुभेच्छापत्रे, फुले इत्यादींनी सजवलेले पटल

सद्गुरु बिंदाताईंच्या वाढदिवसानिमित्त साधकांनी बनवलेली शुभेच्छापत्रे, कविता, विविध फुले आणि मोरपिस यांनी त्यांच्या कक्षातील पटल सजवले होते. त्या पटलाच्या दोन्ही कडांना सनातनच्या प्रत्येक साधकाची माऊली बनलेल्या सद्गुरु बिंदाईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली होती. ‘कृतज्ञता… रामनाथी गोकुळाकडून !’, ‘कृतज्ञता… प्रसारातील सर्व साधकांकडून !’ तसेच ‘कृतज्ञता… विदेशातील सर्व जिवांकडून !’ असे तेथे लिहिले होते. सद्गुरु ताई घरून आश्रमात येण्यापूर्वीच त्यांची सर्व लेकरे (सद्गुरु ताईंसमवेत सेवा करणारे साधक) त्या वात्सल्यमूर्तीच्या आगमनाची आणि दर्शनाची वाट पहात होती.

२. सद्गुरु माऊलीचा नमस्कार अन् साधकांची शब्दातीत कृतज्ञता !

ज्या वेळी सद्गुरु माऊली आली, तेव्हा तिनेच प्रथम सर्वांना नमस्कार केला. ‘तुम्हा सर्वांमुळे मी सेवा करू शकते, त्यामुळे तुम्हाला आधी नमस्कार !’ असे सद्गुरु माऊलीचे कृतज्ञतामय उद्गार ऐकून सर्वांची भावजागृती झाली.

सद्गुरुमाऊलीच्या केवळ दर्शनाने सर्व लेकरांना कृतकृत्य वाटू लागले. त्यामुळे वाढदिवसानिमित्त त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोणाकडेच शब्द उरले नव्हते. सर्व लेकरे केवळ हात जोडून अंतरात सद्गुरु माऊलीप्रती कृतज्ञता अनुभवत होती. कधी राधा बनून कृष्णभक्ती करायला शिकवणार्‍या, तर कधी माता बनून गुरूंना अपेक्षित असे घडण्याचा पाठ शिकवणार्‍या सद्गुरु ताईंच्या सहवासातील त्या अमूल्य क्षणांना आपल्या हृदयमंदिरात साठवून घेण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा सद्गुरु ताई म्हणाल्या, ‘‘आता शब्दांच्या पलीकडला आनंद अनुभवत आहोत. शुभेच्छापत्रे तर सर्वांनी सुंदरच केली आहेत; परंतु त्यामागील तुम्हा सर्वांचा भाव, आनंद आणि प्रेम हे सर्व शब्दांच्या पलीकडले आहे.’’

पुन्हा एकदा केवळ व्यवस्थापनाशी निगडित सेवा करणारे साधकच नव्हे, रामनाथी आश्रमातीलही नव्हे, भारतभरातीलही नव्हे, विदेशातीलही नव्हे, तर विश्‍वभरातील सर्वच जिवांची माऊली असलेल्या या सद्गुरुमाऊलीच्या चरणी भावपूर्ण; पण शब्दातीत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

सर्व लेकरांप्रती अपार वात्सल्य असलेल्या सद्गुरु ताईंनी या अर्ध्या घंट्याच्या कालावधीत दोन-तीन वेळा सर्व साधकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली, त्या वेळी सर्वांचाच भाव जागृत होत होता.

३. सोहळ्याची प्रत्यक्ष अनुभूती देणारी कु. वैष्णवी वेसणेकर हिने बनवलेली वार्ता ही ‘भाववार्ता’ !

पत्रकारितेशी निगडित कोणतेही लौकिक शिक्षण घेतलेले नसतांनाही ६३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली सनातनची साधिका कु. वैष्णवी वेसणेकर (वय १८ वर्षे) हिने बनवलेले हे वृत्त वाचतांना ‘सोहळ्यातील क्षण आपण स्वतः अनुभवत आहोत’, अशी अनुभूती येते. हे अन्य बातम्यांप्रमाणे केवळ शाब्दिक वार्तांकन नसून शब्दांच्या पलीकडे असलेला त्या सोहळ्यात साधकांनी अनुभवलेला सद्गुरु बिंदाताई यांच्याप्रतीचा भावही या वृत्तात अनुभवता येतो. त्यामुळे ही केवळ वार्ता नसून ‘भाववार्ता’ बनली आहे. एरव्ही एकदा वाचलेले लिखाण पुन्हा वाचतांना नकोसे वाटते; मात्र ‘ही वार्ता पुन्हा पुन्हा वाचून सोहळ्यातील भाव अनुभवावा’, असे वाटते. आध्यात्मिक पत्रकारितेच्या क्षेत्रात या वार्तेने एक वेगळा मानदंड प्रस्थापित केला आहे.

सर्व साधकांसाठी शुभाशीर्वादस्वरूप संदेश !

ध्येय ठरवून घेऊन जलद आध्यात्मिक उन्नती करून घ्या ! – सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

‘‘सर्वांनी आता ध्येय ठरवून घेऊन जलद आध्यात्मिक उन्नती करायची आहे. सर्व जण प्रयत्न करतच आहेत; पण आता सर्वांनी झोकून देऊन परात्पर गुरूंना अपेक्षित असे घडण्यासाठी विहंगम गतीने प्रयत्न करायचे आहेत’’, असे सांगून सद्गुरु ताईंनी सर्वांच्या प्रगतीसाठी जणू संकल्पच केला. सर्व साधकांसाठी साक्षात गुरुस्वरूप असलेल्या सद्गुरु ताईंच्या दर्शनामुळे ‘आज गुरुपौर्णिमाच आहे’, असे वाटून उपस्थित सर्वांनी गुरुपौर्णिमेसारखेच कृतज्ञतामय क्षण अनुभवले. त्याविषयी सद्गुरु ताई म्हणाल्या, ‘‘गुरु आपल्या जीवनात आल्यामुळे आपल्यासाठी अमावास्या आणि पौर्णिमा या दिवशीही आनंदच आहे. अखंड भरभरून आनंदच आहे.’

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now