प.पू. देवबाबा यांच्या किन्नीगोळी (कर्नाटक) येथील ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’त महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने ठाणे येथील शास्त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस यांची गायनसेवा सादर !

संगीत सदर

ईश्‍वरप्राप्तीसाठी कला

श्री. प्रदीप चिटणीस यांचा शाल देऊन सत्कार करतांना प.पू. देवबाबा
तबल्यावर साथ देतांना श्री. गिरिजय प्रभुदेसाई आणि गायनकला सादर करतांना श्री. प्रदीप चिटणीस

संगीताने सर्वाधिक उपाय होण्याचे कारण

‘नेहमीची औषधे अधिक करून पृथ्वीतत्त्वाशी संबंधित असतात, तर संगीत पंचमहाभूतांतील सर्वांत सूक्ष्म असलेल्या आकाशतत्त्वाशी संबंधित असल्याने त्याची परिणामकारकता सर्वाधिक असते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

९.९.२०१८ या दिवशी प.पू. देवबाबा यांच्या किन्नीगोळी (कर्नाटक) येथील ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’त महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने ठाणे येथील संगीत अलंकार आणि शास्त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस यांनी शास्त्रीय गायनसेवा सादर केली. कायर्र्क्रमाचा आरंभ श्री. प्रदीप चिटणीस यांनी गायलेल्या ‘यमन’ या सदाबहार, चैतन्यदायी आणि सर्वकालीन अशा रागाने झाला. त्यांनी या रागातील मोठा ख्याल आणि छोटा ख्याल सादर केला. त्यांनी याच रागातील ‘श्रीरामचंद्र कृपालु भज मन…’ हे तुलसीदासांचे भजन भावपूर्णरित्या सादर केले.

(छोटा ख्याल : शास्त्रीय गायनातील रागाचे स्वरूप स्पष्ट करणारे बोलगीत. यालाच ‘बंदिश’ किंवा ‘चीज’ असेही म्हणतात. ही मध्य लयीत किंवा द्रुत लयीत गातात.

(मोठा ख्याल : शास्त्रीय गायनातील रागाचे स्वरूप स्पष्ट करणारे संथ लयीत गायले जाणारे बोलगीत.)

त्यानंतर ‘मालकंस’ या भक्तीमय आणि शांत अशा रागातील दोन दृत (जलद गती) गतीतील बंदिशी सादर करून या रागातील ‘मन तडपत हरि दरशन को आज’ हे भक्तीमय गीत सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी ‘अहिर भैरव’ रागातील ‘मोको कहां ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में’ हे संत कबीरदास रचित भजन म्हटले. त्यानंतर ‘तब मैं जानकीनाथ कहाऊं..’ या संत तुलसीदास रचित भैरवीतील भजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

या वेळी श्री. गिरिजय प्रभुदेसाई यांनी तबल्यावर साथ केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. तेजल पात्रीकर यांनी केले.

या कार्यक्रमाला ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’चे संस्थापक प.पू. देवबाबा यांची वंदनीय उपस्थिती लाभली. प.पू. देवबाबांचे थिरुवनंतपुरम् येथील काही भक्तही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी प.पू. देवबाबांनी गायनकला सादर केलेल्या श्री. प्रदीप चिटणीस यांचा, तसेच तबल्यावर साथ करणार्‍या श्री. गिरिजय प्रभुदेसाई यांचा शाल देऊन सत्कार केला. त्यांनी कु. तेजल पात्रीकर, सौ. अनघा जोशी, तसेच चित्रीकरणासाठी आलेले साधक श्री. चेतन एम्.एन्. आणि श्री. उदयकुमार यांचा प्रसादरूपी फळे देऊन सत्कार केला.

प.पू. देवबाबा यांच्या किन्नीगोळी (कर्नाटक) येथील ‘शक्तीदर्शनयोगाश्रमा’त शास्त्रीय गायनसेवा सादर करणारे श्री. प्रदीप चिटणीस आणि महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे साधक यांना शिकायला मिळालेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती !

१. श्री. प्रदीप चिटणीस

१ अ. ‘प.पू. देवबाबा यांच्या आश्रमात प्रवेश करताच मला चैतन्य जाणवू लागले.

१ आ. प.पू. देवबाबा यांचे गोमातेवरील प्रेम लक्षात येणे : आश्रमातील गायींच्या गोठ्यातील स्वच्छता पाहून प.पू. देवबाबा यांचे गोमातेवरील प्रेम लक्षात आले. मी याआधी एवढा स्वच्छ गोठा कधीच पाहिला नव्हता. येथे ‘गोमातेची किती काळजी घेतली जाते’, हे लक्षात आले.

१ इ. प.पू. देवबाबांचा प्रसन्न तोंडवळा पाहून शांत वाटणे : प.पू. देवबाबा यांचा शांत आणि प्रसन्न तोंडवळा पाहून अन् त्यांच्याशी बोलून मनाला शांत वाटत होते. ‘प.पू. देवबाबा डोळे बंद करून बोलतात’, हे पाहूनही वेगळे जाणवले.

१ ई. प.पू. देवबाबा यांना आवडणारे राग गायनासाठी निवडणे : ‘प.पू. देवबाबा यांना ‘यमन’ आणि ‘मालकंस’ हे राग आवडतात’, असे मला समजले होते. त्यामुळे त्यांच्या चरणी गायनसेवा सादर करण्यासाठी मी हेच राग निवडले.

१ उ. शास्त्रीय गायन सादर करतांना आलेल्या अनुभूती

१ उ १. गातांना सभोवतीचे भान नसणे आणि ध्यान लागणे : कार्यक्रमात ‘राग यमन’ आणि ‘राग मालकंस’ गातांना

मला सभोवतालचे भान नव्हते. माझे ध्यान लागत होते. गातांना कधीकधी माझी तालाची मात्राही चुकत होती. त्या वेळी भानावर येऊन मी गाणे म्हणत होतो. अन्य ठिकाणी मी गातांना आणि तबल्याची साथ असतांना असा ताल चुकत नाही. अन्य ठिकाणी मला अशी ध्यानाची अनुभूतीही येत नाही. तबल्याची साथ असतांना माझे असे ध्यान लागत नाही; कारण त्या वेळी तालाकडे लक्ष द्यावे लागते. येथील अनुभव माझ्यासाठी निराळाच होता.

१ उ २. गुरु (स्व.) पंडीत राजाराम शुक्ला यांचे उद्गार आठवणे : मला माझे गुरु (स्व.) पंडीत राजाराम शुक्ला यांचे उद्गार आठवले. ते म्हणत, ‘‘बेटा, हम गायन करते समय संगत में तबला लेते हैं, वो केवल लोगों को, समाज को दिखाने के लिए लेते हैं । हमारे गायन का मतलब है ‘ध्यान लगाना’।  तबले के कारण हमारी एकाग्रता नहीं रहती । हमारी लय तो ‘अंतर्गत’ सूक्ष्म रूप में चलती रहती है । लेकिन रंगमंच पर जो लोगों को, समाज को दिखाने के लिए ये किया जाता है, वो हमारा असली गाना नहीं है ।’

१ ऊ. सायंकाळ नंतरच्या प्रहरात गायला जाणारा राग यमन सकाळी सादर केल्यावर प.पू. देवबाबा यांनी ‘राग यमन हा सर्वकालीन राग आहे’, असे सांगणे, त्यामुळे मनातील हुरहुर दूर होणे : मी कार्यक्रमात राग यमन म्हणणार होतो. ‘हा राग साधारण सायंकाळनंतर गातात; पण मी सकाळी सादर करत आहे’, असे मी गाण्यापूर्वी सांगितले. माझ्या मनात ‘आपण त्या वेळचा राग गात नाही’, असे होते. मी हा राग सादर केल्यावर प.पू. देवबाबा यांनी यमन रागाचे वैशिष्ट्य सांगितले. ते म्हणाले, ‘‘हा राग जरी सायंकाळनंतरच्या प्रहरात गायला जात असला, तरी तो केव्हाही गाऊ शकतो. हा एक सर्वकालीन राग आहे.’’ त्यांच्या बोलण्यामुळे माझ्या मनातील हुरहुर दूर झाली.

१ ए. संत कबीरदास यांचे भजन प.पू. देवबाबा यांना आवडणे : या कार्यक्रमात मी संत कबीरदास यांचे ‘मोको कहां ढुंढे रे बंदे…’ हे भजन गायले. प.पू. देवबाबा म्हणाले, ‘‘मला हे भजन आवडले. या प्रकारची भजने तुम्ही संगीत चिकित्सेत म्हणू शकता.’’

१ ऐ. संगीत-चिकित्सेसाठी प.पू. देवबाबांनी ‘मार्गदर्शन करतो’, असेे सांगितल्यावर ‘त्यांचा आशीर्वाद मिळाला’, असे वाटणे : कार्यक्रमानंतर मी प.पू. देवबाबा यांना संगीत चिकित्सेविषयी काही प्रश्‍न विचारले. त्या वेळी त्यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘या पुढेही मी तुम्हाला रोगावरील उपायात्मक राग सांगीन.’’ त्यांच्या या वाक्याने मी एकदम निश्‍चिंत झालो. ‘संतांचा आशीर्वाद मिळाल्यावर अजून काय हवे !’, असे वाटून मी धन्य झालो.

सनातन संस्थेमुळे मला प.पू. देवबाबांच्या आश्रमात गायन करण्याची संधी मिळाली, यासाठी मी सनातन संस्थेचा ऋणी आहे.’

२. श्री. प्रदीप चिटणीस यांचे शास्त्रीय गायन  ऐकतांना साधकांना आलेल्या अनुभूती

२ अ. सौ. अनघा जोशी

२ अ १. ध्यान लागणे, बंदिशी सादर करत असतांना मानस नृत्य करणे आणि भावावस्थेत असणे : ‘काकांनी राग यमन म्हटल्यावर काही वेळाने माझे ध्यान लागले. काका मालकंस रागातील ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ आणि ‘आई मैं द्वार तिहारे…’ या बंदिशी सादर करत असतांना मी मानस नृत्य करत होते. ‘काकांच्या गायनातील प्रत्येक स्वर माझ्या आत जात आहे’, असे मला जाणवत होते. काकांचे प्रत्येक गायन मला भावावस्थेत नेत होते.’

२ आ. कु. तेजल पात्रीकर

२ आ १. ध्यान लागणे : ‘काकांनी अनुमाने १ घंटा राग यमन सादर केला. या वेळी माझे ध्यान लागले.

२ आ २. भावजागृती होणे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आर्तभावाने आळवले जाऊन त्यांच्या चरणी क्षमायाचना होणे : काकांनी राग मालकंस गायला आरंभ केल्यापासूनच माझी भावजागृती होत होती. त्यांच्या गायनाचे स्वर अंतरात सहजतेने जात होते. ते ३५ मिनिटे हा राग गात होते आणि मला सतत भावाश्रू येऊन ते थांबवताच येत नव्हते. मी एका वेगळ्याच भावस्थितीत होते. मालकंसच्या आर्त स्वरांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आर्तभावाने आळवले जाऊन आतापर्यंत माझ्याकडून झालेल्या चुकांसाठी शरणागत भावाने त्यांच्या चरणी क्षमायाचना होत होती.’

२ इ. कु. प्रतीक्षा आचार्य

२ इ १. भावजागृती होऊन ध्यान लागणे : ‘काका ‘यमन’ आणि ‘मालकंस’ राग गात असतांना माझी भावजागृती होत होती. शेवटच्या भैरवीच्या वेळी माझी भावजागृती होऊन मला ध्यान लागले.’

२ इ. श्री. गिरिजय प्रभुदेसाई

१. ‘काका भावपूर्ण गायन करत असल्यामुळे ऐकणार्‍या आणि साथसंगत करणार्‍या व्यक्तींवर त्याचा चांगला परिणाम होत आहे’, असे मला जाणवले.

२. काकांना तबल्याची साथसंगत करत असतांना ‘मी ईश्‍वरासमोर तबला वाजवत आहे’, असे मला जाणवत होते.’

श्री. प्रदीप चिटणीस शास्त्रीय गायन सादर करतांना उपस्थित भक्तांनी दिलेले अभिप्राय

१. अभिप्राय

१ अ. ‘हे शास्त्रीय संगीत पुन्हा ऐकण्यास आम्ही उत्सुक आहोत.’ – प.पू. देवबाबांचे एक भक्त

१ आ. ‘आजच्या गायनातून भक्तीरस धारा वहात होती.’ – प.पू. देवबाबांचे एक भक्त

१ इ. ‘कु. तेजल पात्रीकर यांनी सूत्रसंचालन छान केले.’

२. अनुभूती

२ अ. भजन ऐकतांना प्रभु श्रीरामचंद्रांचे दर्शन होणे : ‘श्री. प्रदीप चिटणीस ‘श्रीरामचंद्र कृपालु भज मन..’ हे भजन गात असतांना मला प्रभु श्रीरामचंद्रांचे दर्शन झाले. मला प.पू. देवबाबा यांच्या ठिकाणी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाले.’

– श्री.आचार्य

ठाणे येथील गायक श्री. प्रदीप चिटणीस यांनी संगीताच्या प्रयोगांच्या सूक्ष्म परीक्षणाविषयी कळवलेला अभिप्राय

श्री. राम होनप

‘जुलै २०१८ मध्ये महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने रामनाथी आश्रमात गायक श्री. प्रदीप चिटणीस यांनी रुग्ण-साधकांवर शास्त्रीय गायनाचे प्रयोग केले. या प्रयोगांचे देवाने माझ्याकडून सूक्ष्म परीक्षण करवून घेतले. हे सूक्ष्म परीक्षण वाचून श्री. चिटणीस यांनी त्यांचा पुढील अभिप्राय लघुसंदेशाद्वारे कु. तेजल पात्रीकर यांना कळवला, ‘रामदादांनी माझ्या गायनाचे खूपच सूक्ष्म आणि छान विश्‍लेषण केले आहे. त्यांना माझ्याकडून खूप खूप धन्यवाद सांगा.’

श्री. प्रदीप चिटणीस यांचा संगीताच्या आध्यात्मिक संशोधनाच्या संदर्भातील व्यापक दृष्टीकोन

श्री. चिटणीस यांनी वरील आध्यात्मिक संशोधनाचा विषय स्वतःपुरता मर्यादित न ठेवता फेसबूक पोस्टच्या माध्यमातून प्रसारित केला. त्यात त्यांनी प्रारंभी ‘शास्त्रीय गायनाचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर होणार्‍या परिणामांविषयीचे संशोधन रामनाथी आश्रमात करण्यात आले’, असा मथळा देऊन त्या खाली दैनिक सनातन प्रभातमध्ये १२.७.२०१८ या दिवशी ‘श्री. चिटणीस यांच्या गायनाचे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण’, या लेखाचे छायाचित्र ठेवले.

त्यामुळे संगीताच्या आध्यात्मिक संशोधनाच्या संदर्भातील माहिती अनेकांपर्यंत पोहोचली. या गटाशी जोडलेल्या व्यक्तींनी (फेसबूक फ्रेन्डस यांनी) त्यावर श्री. चिटणीस यांचे अभिनंदन करणारे, लेख आवडल्याचे, तसेच हा लेख कोणत्या दैनिकात प्रसिद्ध झाला आहे ?’ या विषयाची विचारणा केली. या वेळी  ‘अशी आदर्श कृती अन्य संगीत-प्रेमींनी केल्यास शास्त्रीय संगीत आणि त्याच्या आध्यात्मिक संशोधनाचे महत्त्व जगभर होण्यास वेळ लागणार नाही’, असा विचार माझ्या मनात आला.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

प.पू. देवबाबांनी कार्यक्रमाची केलेली प्रशंसा !

१. प.पू. देवबाबांनी श्री. प्रदीप चिटणीस यांच्या गायनाविषयी काढलेले कौतुकोद्गार !

श्री. प्रदीप चिटणीस यांचे शास्त्रीय गायन ऐकून प.पू. देवबाबा त्यांना म्हणाले, ‘‘आपके गाने के लिए (प्रशंसा करने के लिए) मेरे पास शब्द ही नहीं । कार्यक्रम बहुत सुंदर हुआ । आपका राग यमन बहुत ही अच्छा हुआ । ’’

२. उत्कृष्ट ध्वनीक्षेपण यंत्रणा

प.पू. देवबाबा म्हणाले, ‘‘आजच्या कार्यक्रमातील ध्वनीक्षेपण यंत्रणा उत्कृष्ट होती. त्यामुळे तबला आणि गायन यांच्या आवाजाच्या मिश्रणाचा भाग एकदम चांगला झाला होता.’’

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now