पुन्हा हनीट्रॅप !

संपादकीय

भारतीय आंतरिक्ष संशोधन आणि विकास संस्थेचे (‘डीआर्डीओ’चे) युवा वैज्ञानिक निशांत अग्रवाल यांना उत्तरप्रदेशच्या आतंकवाद विरोधी पथकाने कह्यात घेतले आहे. ब्राह्मोस क्षेपणास्त्रासंदर्भातील तांत्रिक माहिती चोरून ती अमेरिका आणि पाक यांना दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’च्या एका महिलेच्या जाळ्यात निशांत अग्रवाल अडकले असल्याचा संशय आहे. महिलांनी प्रेमाचा आव आणून वरिष्ठ अधिकार्‍यांना स्वतःच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून इप्सित साध्य करून घेणे, याला ‘हनीट्रॅप’ असे म्हटले जाते. अन्वेषणानंतर या प्रकरणाचे सत्य समोर येईलच; मात्र तोपर्यंत अशा ‘हनीट्रॅप’मध्ये अजून किती अधिकारी आणि कर्मचारी अडकणार आहेत, हे मात्र शोचनीय आहे. हे यासंदर्भातील पहिलेच प्रकरण नसून आतापर्यंत अनेक वैज्ञानिक, दूतावासातील अधिकारी, सेनादलांतील अधिकारी विदेशींच्या जाळ्यात अडकले आहेत.

वास्तविक संरक्षण साहित्याची निर्मिती करणे, संरक्षणासंदर्भातील धोरणे ठरवणे, वैज्ञानिक संशोधन करणे, यांसह राष्ट्रीय पातळीवरील अनेक निर्णय अनेक जण मिळून घेत असतात. अशा वेळी कुणी एक जरी गद्दार निघाला, तरी त्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागतात. त्यातही संरक्षणासंदर्भातील निर्णय, तांत्रिक माहिती जर शत्रूराष्ट्राला पुरवली गेली, तर देशाच्या सुरक्षेला सुरुंग लावल्यासारखे होते. त्यामुळेच सेनादले, डीआर्डीओ, इस्रो, यांसारख्या अत्यंत संवेदनशील ठिकाणी नोकरी देतांना कठोर निकष लावणे आवश्यक असते. ज्याप्रमाणे सेनादलांमध्ये नियुक्ती करतांना क्षेत्रातील शारीरिक, मानसिक, तर संशोधनक्षेत्रात नियुक्ती करतांना बौद्धिक क्षमतांची अत्यंत कठोर चाचणी घेतली जाते, त्याप्रमाणेच या क्षेत्रांत प्रवेश मिळवण्यासाठी इच्छुकांच्या राष्ट्रनिष्ठेचीही चाचपणी करणे अत्यावश्यक आहे. एरव्ही प्रत्येकात अल्प-अधिक प्रमाणात देशप्रेम असते. या क्षेत्रांत मात्र केवळ देशप्रेम असून चालत नाही, तर कोणत्याही परिस्थितीत न ढळणारी प्रखर राष्ट्रनिष्ठा आवश्यक असते. ज्याप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतीकारकांनी प्रसंगी मृत्यूदंड झाला, तरी सहकार्‍यांची नावे कळू दिली नाहीत अथवा ब्रिटीशविरोधी कटांची माहिती गोपनीय ठेवली, त्याप्रमाणेच कितीही मोठे आमीष दाखवले, तरी त्याला बळी न पडता उलट ते राष्ट्रविरोधी कारस्थान उलथवून लावण्याची विजिगिषू वृत्ती या संवेदनशील क्षेत्रांत कार्य करणार्‍यांमध्ये असणे अनिवार्य आहे. ती नसेल, तर नियुक्ती करण्यापूर्वीच तशी प्रखर राष्ट्रनिष्ठा निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अन्यथा अशा प्रकरणांची मालिका थांबणार नाही !


Multi Language |Offline reading | PDF