मान्यवरांच्या शब्दात व्यक्त झालेला आदरार्थी गौरव !

वैयक्तिक हानीची तमा न बाळगता अन्यायाच्या विरोधात दंड थोपटणारा अधिवक्ता ! – अधिवक्ता सुधाकर चपळगावकर, निवृत्त जिल्हा न्यायाधीश, संस्थापक सदस्य हिंदू विधीज्ञ परिषद

भगवद्गीतेतील संदेश हा प्रत्येक धर्मप्रेमीच्या रक्तामध्ये भिनलेला आहे. धर्म आणि अधर्म यांच्या संघर्षात धर्माच्या बाजूने लढले पाहिजे, ही गीतेची शिकवण आहे. धर्म आणि अधर्म यांतील भेद समजण्यासाठी प्रत्येकाने स्वत:च्या अंत:करणात डोकावून पाहिल्यास सहज समजू शकेल. ‘सामान्यत: युद्धात उतरायचे कि नाही’, हे ठरवतांना त्यात होणार्‍या लाभ-हानी यांचा विचार केला जातो; मात्र गीतेची शिकवण आत्मसात केलेला खरा योद्धा अशा ऐहिक गोष्टींचा विचार करत नाही. ‘सनातनची बाजू घेतल्यास लोक आपल्याला प्रतिगामी समजतील’, या भीतीच्या सावटाखाली वावरणारे अनेक लोक मला ठाऊक आहेत. अशा फसव्या तथाकथित भुलाव्याच्या आहारी न जाता झुंडशाहीच्या विरोधात पीडितांच्या बाजूने उभे रहाण्यासाठी जे धैर्य लागते, ते अधिवक्ता पुनाळेकर यांच्या व्यक्तीमत्त्वात दिसते. शोषित कामगारांच्या हक्कासाठी कारखानदाराच्या विरुद्ध दंड थोपटून उभा रहाणारा कामगार नेता आणि सनातन संस्थेवर झुंडीने आक्रमण करणारे तथाकथित पुरोगामी, लेखक, विचारवंत आदींच्या विरुद्ध धैर्याने उभे रहाणारे पुनाळेकर यांच्यात साम्य आहे. वैयक्तिक हानीची तमा न बाळगता अन्यायाच्या विरुद्ध लढणे, हा त्यांच्यातील गुणाला ‘एकेकाळचा कामगार नेता’ कारणीभूत असू शकेल. अधिवक्ता पुनाळेकर यांचा सत्कार ही एक आनंद देणारी गोष्ट आहे. त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमामुळे मला भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली, याचाही मला आनंद आहे. अधिवक्ता पुनाळेकर यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा !

अधिवक्ता पुनाळेकर यांच्या प्रसन्न मुद्रेने कामाचा ताण जाऊन उत्साह मिळतो ! – अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर

अनेकदा कायदेविषयक सल्ला घेण्यासाठी मी नेहमीच अधिवक्ता पुनाळेकरसर यांच्याकडे सहजपणे जातो. एक ‘ज्युनिअर’ अधिवक्ता म्हणून त्यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी गेल्यावर कितीही व्यस्त असले, तरी कधीही त्यांनी ‘नाही’ म्हटले नाही. कामाचा व्याप असला, तरी त्यांनी नेहमीच माझ्या कायद्याविषयीच्या शंका दूर केल्या. अधिवक्ता म्हणून काम करत असतांना अनेक वेळा कामाचा ताण येत असतो; मात्र अधिवक्ता पुनाळेकरसर यांच्याशी बोलल्यावर आणि त्यांची प्रसन्न मुद्रा पाहून ताण निघून जातो. ज्याप्रमाणे गाडीत पेट्रोल भरल्यावर पुढील मार्गक्रमण करण्यासाठी गाडी सिद्ध होते, तसे सरांच्या भेटीने कायदेविषयक कामाचा असलेल्या मानसिक ताण निघून जातो आणि उत्साह मिळतो.

हिंदुत्वाचे कार्य करण्याची प्रचंड ऊर्जा आणि तळमळ असलेली व्यक्ती ! – अधिवक्ता विवेक भावे, कल्याण

हिंदुत्वासाठी झोकून देऊन कार्य करणारी व्यक्ती, अशी अधिवक्ता पुनाळेकर यांच्याविषयी माझ्या मनात प्रतिक्रिया होती. वर्ष २०१२ मध्ये गोवा येथे झालेल्या अखिल भारतीय हिंदु अधिवेशनामध्ये मी प्रथम त्यांना पाहिले. त्या वेळी मला ते अनुभवायलाही मिळाले. हिंदुत्वाचे कार्य करण्याची प्रचंड ऊर्जा आणि प्रचंड तळमळ या व्यक्तीमध्ये जाणवते. पुढून आलेल्या प्रश्‍नाला ते योग्य पद्धतीने हाताळतात. त्यामुळे प्रत्येक प्रश्‍नाला ते योग्य पद्धतीने तोंड देऊ शकतात. त्यांच्या या हातोटीमुळे मी प्रभावित झालो. ‘हीच ती व्यक्ती आहे की, त्यांच्या हिंदुत्वाच्या कार्यात मी सहभागी होऊ शकतो’, याची जाणीव मला त्यांच्या भेटीत झाली. ‘त्यांच्या या कार्यात मीही वेळ देऊ शकतो’, असे त्यांना सांगितल्यावर त्यांनी मलाही हिंदु विधीज्ञ परिषदेच्या राष्ट्र आणि धर्म कार्यात सहभागी करून घेतले. मीही हिंदु विधीज्ञ परिषदेच्या कार्यात सक्रीय सहभागी होणार आहे. त्यांचा सत्कार म्हणजे हिंदुत्वाचे कार्य करणार्‍यांसाठी मोठी पर्वणी आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभो. त्यांच्याकडून अखंडपणे हिंदुत्वाचे कार्य होत राहो. त्यांचा या कार्यात माझाही खारीचा वाटा राहील.

अधिवक्ता संजीव पुनाळेकर हे लढवय्ये धर्मयोद्धे ! – हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड, पुणे

अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचा प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि खासदार श्री. संजय राऊत यांच्या हस्ते सत्कार होत असल्याचे कळल्यावर मनस्वी आनंद झाला. राष्ट्रीय पत्रकार मंचाचा हा एक स्तुत्य उपक्रम आहे. अधिवक्ता संजीव पुनाळेकर हे हिंदूंचे आशास्थान आहेत. निधर्मी काँग्रेस सरकारने ‘हिंदु आतंकवादा’चा बागुलबुवा निर्माण करून हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि कार्यकर्ते यांची यथेच्छ अपकीर्ती केली. अधिवक्ता पुनाळेकर यांनी मालेगाव बॉम्बस्फोट, मडगाव स्फोट, तसेच अन्य अनेक न्यायालयीन लढाया लढून हिंदु आतंकवादाचा बुरखा फाडला. काँग्रेसचे षड्यंत्र हाणून पाडले. देव, देश, धर्म यांच्यासाठी बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे यांच्याप्रमाणे लढणारे ते धर्मयोद्धा आहेत. त्यांच्यामुळेच आम्हा हिंदूंना आधार वाटतो. खटले यशस्वीपणे लढतांना त्यांची साधनाही कामी येते. अशा अधिवक्त्यांमुळे हिंदु राष्ट्राची स्थापना दूर नाही. आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली असती.

अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना उदंड आयुरारोग्य लाभो आणि त्यांच्या हातून उत्तरोत्तर अधिकाधिक देशसेवा आणि धर्मसेवा घडो, अशी प्रार्थना !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now