पितृऋणातून मुक्त होण्याऐवजी धर्मशिक्षणाअभावी आपल्याच पायावर धोंडा मारून घेणारे जन्महिंदू !

पितृपक्षातील श्राद्ध !

पितृपक्षाच्या निमित्ताने …

हिंदु धर्माने सांगितलेल्या ईश्‍वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषिऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी ‘श्राद्ध’ आवश्यक असते. अन्य संस्कारांइतकाच ‘श्राद्ध’ हा संस्कारही अत्यावश्यक आहे. २५ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत पितृपक्ष आहे. त्यानिमित्ताने श्राद्धविषयक लिखाण येथे देत आहोत.

‘महालय पक्षात हिंदू आपल्या पितरांच्या सद्गतीसाठी श्राद्ध करतात; मात्र काही जण या धार्मिक विधीची आणि कावळ्याने अन्नाला स्पर्श करण्याच्या पद्धतीविषयी आक्षेप घेतात. ‘मेलेली गाय जसे दूध देऊ शकत नाही, तसे पितर मनुष्याने दिलेले अन्न कसे ग्रहण करू शकतील’ असा आशय असलेली पोस्ट व्हॉट्सअ‍ॅप सारख्या सामाजिक माध्यमांतून एकमेकांना पाठवतात.

१. प्राणी आणि पक्षी यांच्याजवळ असलेल्या विशिष्ट शक्तीमुळे त्यांना काही गोष्टी आपोआप कळणे

प्राणी आणि पक्षी यांच्याजवळ विशिष्ट शक्ती असते. गाढवाला विषबाधा समजते; म्हणून पूर्वी युद्धाच्या ठिकाणी जिथे सैन्याचा तळ असेल, तेथील पाणी गाढवाला पाजत. वटवाघळाला रात्रीचे दिसते. गिधाडाला तीव्र दृष्टी असते. मांजर रात्रीही चांगले पाहू शकते. चकोरपक्षी चंद्रकिरण पिऊन जिवंत रहातो. कासव (मादी) ही आपल्या पिलांना कधीच दूध पाजत नाही. तिने आपल्या पिल्लाच्या डोळ्यांत वात्सल्य भावनेतून पाहिले की पिल्लाचे पोट भरते. या ज्ञात आणि अज्ञात सृष्टीतील अनेक योनी आहेत. त्यांची अन्न ग्रहण करण्याची पद्धत आहे. तसेच पितर योनी आहे. पितरांचा स्थूल पिंड रहात नाही, तर वायूमय पिंड रहातो. श्राद्ध याचसाठी केले जाते की पितर मंत्र आणि श्रद्धापूर्वक दिलेल्या श्राद्धाच्या वस्तू भावनात्मक रूपाने घेतात आणि ते तृप्तही होतात.

२. धर्माचार्यांनाच हिंदूंच्या प्रथा-परंपरांविषयी बोलण्याचा अधिकार !

एका पिढीपूर्वी शालेय अभ्यासक्रमात महाराष्ट्रातील एका कर्मयोगी संतांचे अंधश्रद्धेविषयीचे विचार मांडतांना त्यात श्राद्ध ही अंधश्रद्धा असल्याचा परिच्छेद समाविष्ट करण्यात आला होता, जेणेकरून मुलांमध्ये हिंदु धर्मातील शास्त्राविषयी संदेह निर्माण होईल. अजूनही काही धर्मद्रोही त्या संतांचे कर्मयोगानुसार सेवा आणि त्यागाचे विचार कृतीत न आणता स्वत:च्या सोयीनुसार धार्मिक विधींविषयी अपसमज निर्माण करणारे विचार सामाजिक माध्यमांतून प्रसृत करतात. वैद्यक शास्त्रानुसार डोळे, कान, घसा, हाडे, पोट याच्याशी संबंधित वैद्यच त्याविषयी मत मांडू शकतो, तसेच धर्माचार्यांनाच धार्मिक विधींविषयी मत मांडण्याचा अधिकार आहे.

३. हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता श्राद्धादी विधी करायला हवेत !

हिंदु संस्कृतीत श्रीरामानेही वडिलांचे म्हणजे राजा दशरथाचे, तर युधिष्ठिराने श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून कर्णाचे श्राद्ध केले होते. पैठणाच्या ब्राह्मणांनी संत एकनाथांच्या श्राद्ध भोजनावर बहिष्कार घातला होता. तेव्हा योगसंपन्न एकनाथांनी ब्राह्मणांना आणि आपल्या पितृलोकवासी पितरांना बोलावून जेवू घातले. हे पाहून पैठणचे ब्राह्मण आश्‍चर्यचकित झाले होते. आपल्या धर्मात देव, ऋषि, पितर आणि समाज अशी ४ ऋणे मानली गेली आहेत. पितरांनी कुलपरंपरा जपली; म्हणून आपण दुर्लभ मनुष्यजन्माचा उपभोग घेत आहोत. मनुष्याने सर्व गोष्टींविषयी कृतज्ञ असायला हवे. याचे भान ठेवूनच हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता श्राद्धादी विधी करायला हवेत.’

– श्री. सुनील लोंढे, नवी मुंबई

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now