मेंग यांना पाहिलेत का ?

इटरनॅशनल पोलीस ऑर्गनायझेशन’ अर्थात् ‘इंटरपोल’ या आंतरराष्ट्रीय सुरक्षासंस्थेचे प्रमुख मेंग होंगवेई हे चीनच्या दौर्‍यावर गेले असता अचानक बेपत्ता झाले. ही घटना २९ सप्टेंबरची. त्यानंतर त्यांची शोधाशोध चालू झाली. होंगवेई हे चिनी आहेत आणि ते चीनच्या दौर्‍यावर होते. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांच्या ‘गायब’ होण्यामागे चीनचाच हात असल्याचे उघडपणे सांगितले जात होते; मात्र चीन मूग गिळून गप्प ! काही दिवसांनी मात्र चीनने ‘होंगवेई आमच्या कह्यात आहेत’, असे घोषित केले. चीनमध्ये असतांना पदाचा दुरुपयोग करण्याच्या सूत्रावरून त्यांना कह्यात घेतल्याचे पुढे येत आहे. असे असले, तरी ‘होंगवेई यांची चीनमधील अन्य एका वरिष्ठ नेत्याशी असलेली जवळीक हे त्यांच्या कह्यात घेण्यामागील कारण असू शकते’, असे बोलले जात आहे. सदर नेते आणि चिनी राष्ट्राध्यक्ष शी झिनपिंग यांचे सलोख्याचे संबंध नाहीत. त्यामुळे अशा नेत्याशी जवळीक होंगवेई यांना भोवल्याचे तज्ञांचे मत आहे. ‘होंगवेई यांचे पुढे काय होईल’, हे शी झिनपिंगच जाणोत ! कारण चीनमध्ये ३ वर्षांत १० लाख अधिकारी आणि नेते यांच्यावर भ्रष्टाचाराच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. यांतील बरेच जण एक तर कारागृहात खडी फोडत आहेत किंवा लाखो रुपयांचा दंड भरून घरी बसले आहेत. महत्त्वाचे म्हणजे कारवाई टाळण्यासाठी विदेशात पळून गेलेल्या ४०० हून अधिक लोकांना पकडून त्यांना पुन्हा चीनमध्ये आणण्यात आले आहे. काही आठवड्यांपूर्वी चीनमधील विश्‍वविख्यात अभिनेत्री फॅन बिंगबिंग याही अशाच प्रकारे ‘गायब’ झाल्या होत्या. काही दिवसांनी त्यांनी ‘मी भ्रष्टाचार केला असून दंड भरण्यास सिद्ध आहे’, असे घोषित केले. हे सर्व वाचल्यावर ‘विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहूल चोक्सी यांच्यावर अशा प्रकारे कारवाई का होत नाही ?’, असा प्रश्‍न भारतियांच्या मनात येणे साहजिक आहे. असो. येथे मूळ प्रश्‍न ‘चीनचा वाढता उद्दामपणा आणि त्याला रोखायचे तरी कसे ?’, हा आहे.

इंटरपोलची नाचक्की !

होंगवेई हे जरी चिनी असले आणि त्यांनी चीनच्या सुरक्षायंत्रणांमध्ये ४० वर्षे काम केले असले, तरी ते इंटरपोलचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. इंटरपोलचा आजही जगात दरारा आहे. या संस्थेशी जगातील १९२ देशांची पोलीसदले जोडली आहेत. वर्ष २०१६ मध्ये चीनच्या होंगवेई यांची इंटरपोलच्या प्रमुखपदी निवड झाली. वास्तविक इंटरपोलच्या कार्यपद्धतीवर टीका करणार्‍या देशांपैकी चीन हा एक देश आहे. असे असतांनाही होंगवेई यांची या पदी निवड झाल्यावर अनेकांनी भुवया उंचावल्या. काहींनी तर त्याही पुढे जाऊन ‘होंगवेई यांच्या निवडीमुळे चीनबाहेर पळून गेलेल्या लोकांना शोधण्यासाठी चीन इंटरपोलचा वापर करील’, अशीही टीका केली होती. आज चीनने इंटरपोलच्या प्रमुखांनाच गायब केले आहे. वास्तविक ही इंटरपोलवर ओढवलेली नामुष्की आहे. जगातील एका शक्तीशाली संस्थेच्या प्रमुखाला चीन गायब करतो आणि इंटरपोल या पूर्ण प्रकरणात हात चोळत बसण्याच्या पलीकडे काहीही करू शकत नाही. जी संस्था जागतिक गुन्हेगारी, आतंकवाद, मानवी तस्करी रोखण्यासाठी निर्माण झाली आहे, त्या संस्थेला स्वतःच्या प्रमुखाच्या विरोधात चीनमध्ये अशा प्रकारे कट शिजत आहे, याचाही सुगावा लागत नसेल, तर याविषयी काय म्हणावे ? आताही इंटरपोलने नवीन प्रमुखाची नियुक्ती केली असून चीनला जाब विचारण्याच्या पलीकडे त्याने काहीही केलेले नाही. या प्रकरणानंतर इंटरपोलचे दुबळेपण जगासमोर आले. भारत अजूनही भारताबाहेर पळून गेलेले आतंकवादी आणि उद्योजक यांना पकडण्यासाठी इंटरपोलचे साहाय्य घेतोे. अशा या इंटरपोलवर किती प्रमाणात विसंबून रहायचे, हे भारत सरकारने आता ठरवायला हवे.

चीनचा प्रभाव धोकादायक !

संयुक्त राष्ट्रे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, वर्ल्ड बँक आणि युनेस्को यांसारख्या जगातील महत्त्वाच्या संस्थांच्या प्रमुखपदी अथवा महत्त्वाच्या पदी असणार्‍या व्यक्ती या चिनी आहेत. यावरून चीनचा जागतिक स्तरावर असलेला दरारा दिसून येतो. दुसरे महत्त्वाचे सूत्र म्हणजे चीनने होंगवेई यांना ज्या प्रकारे कह्यात घेतले, त्यावरून तो कोणालाही जुमानत नाही, हे सिद्ध होते. होंगवेई यांना कह्यात घेतांना चीनने इंटरपोलला विश्‍वासात घेणे आवश्यक होते किंवा त्याविषयी काही निकष पाळणे आवश्यक होते; मात्र तसे काही झाले नाही. आंतरराष्ट्रीय दबाव आदी कोणत्याही सूत्रांना भीक न घालता चीन स्वतःला हवे ते आणि हवे त्या वेळी कोणतीही कृती करू शकतो, हे त्याने दाखवून दिले. त्याच्या या कृत्याला जागतिक स्तरावरही म्हणावा तसा विरोध झालेला नाही. हे त्याहूनही गंभीर आहे.

‘आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात युद्ध छेडले आहे’, असे जरी चीन म्हणत असला, तरी त्याच्या कृती या हुकूमशाहीला धरून आहेत. ‘राष्ट्राध्यक्ष झिनपिंग हे विरोधकांना भ्रष्टाचाराच्या नावाखाली एक एक करून संपवत आहेत’, असा आरोप मानवाधिकार संघटनेने केला आहे. होंगवेई यांना कह्यात घेण्याच्या प्रकरणाचा भारतात गाजावाजा झाला नाही. वास्तविक येथे त्यावर सविस्तर चर्चा होणे आवश्यक होते. चीन आर्थिक आणि संरक्षण दृष्ट्या जितका सक्षम होत जात आहे, तितकी त्याची एकाधिकारशाही वाढून तो अधिकाधिक धोकादायक होत आहे. आंतरराष्ट्रीय समूदायही त्याला वेसण घालू शकत नाही, हेही आता स्पष्ट झाले आहे. असा हा चीन भारतावरही कुरघोडी करत आहे. ‘त्याला कसे रोखायचे ?’, हा भारतासमोर गहन प्रश्‍न आहे. बलाढ्य शत्रूला शक्ती, युक्ती आणि भक्ती यांच्या जोरावर नामोहरम करण्याचा इतिहास भारताला लाभला आहे. चीनविषयीही असेेच धोरण अवलंबल्यास भारताचा निभाव लागेल. सरकारच्या हे लक्षात येईल, तो सुदिन !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now