अमेरिकेच्या धमकीला भीक न घालता भारताचा रशियासमवेत ‘एस्-४००’ खरेदी करार

  • स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनीही सुरक्षाक्षेत्रात भारताला अन्य देशांवर अवलंबून रहावे लागते, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांसाठी लज्जास्पद !
  • अमेरिका असो कि रशिया भारताला दोन्ही देश त्यांच्या सोयीनुसार वागवत आहेत आणि भारताच्या समस्या सुटण्यासाठी कोणते ठोस सहकार्य करत आहेत, असे कधीच दिसून येत नाही, ही वस्तूस्थिती आहे !
  • रशियाने लालबहादूर शास्त्री आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या हत्या केल्याचा आरोप अनेक वर्षे होत आला आहे, हे विसरता येत नाही !

नवी देहली – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात देहलीतील हैद्राबाद हाऊसमध्ये ५ ऑक्टोबरला बैठक झाली. यात भारताने  अमेरिकेचा दबाव झुगारून रशियाकडून ४० सहस्र कोटी रुपये देऊन ५ ‘एस्-४०० एअर डिफेन्स मिसाइल सिस्टिम’ विकत घेण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. भारत आणि रशिया यांच्यामध्ये हा करार झाला, तर अमेरिकेकडून भारतावर निर्बंध घातले जाण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमध्ये २० पेक्षा अधिक करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या आहेत. दोन्ही देशांमध्ये अवकाशविषयक सहकार्य करारावरसुद्धा स्वाक्षर्‍या झाल्या आहेत. रशियात सायबेरीया जवळच्या नोवोसिबिर्स्क शहरात भारत त्याचे ‘मॉनिटरींग स्टेशन’ उभारणार आहे.

१. पुतिन ४ ऑक्टोबरला रात्री भारताच्या दौर्‍यावर आले आहेत. या वेळी मोदी यांनी त्यांचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन करून आलिंगन घेतले. (मोदी पुतिन यांची गळाभेट घेत असले, तरी रशिया पाकसमवेत सैन्य सराव करत आहे, याविषयी भारत गप्प का ? अशा गळाभेटींचा भारताला काही लाभ होतो का ?, हा एक संशोधनाचाच विषय ठरला आहे ! – संपादक)

२. या वर्षातील मोदी आणि पुतिन यांच्यातील ही तिसरी बैठक आहे. मे मासात रशियात सोची आणि त्यानंतर जुलै मासात दक्षिण आफ्रिकेत ब्रिक्स परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर दोन्ही नेत्यांची भेट झाली होती.

३. भारताला चीन आणि पाकिस्तान ही शत्रूराष्ट्रे शेजारी असल्यामुळे ‘एस्-४००’सारखी प्रणाली खूपच उपयोगी पडणार आहे. ‘एस्-४००’मुळे एकाच वेळी दोन्ही देशांची क्षेपणास्त्रे तसेच लढाऊ विमानांद्वारे केली जाणारी आक्रमणे विफल करता येतील. चीनने ही प्रणाली विकत घेण्यासाठी रशियासमवेत वर्ष २०१५ मध्ये करार केला. चीन रशियाकडून अशा ६ प्रणाली विकत घेणार आहे. जानेवारी २०१८ पासून रशियाने या प्रणालीचा पुरवठा चीनला चालू केला आहे.

एस्-४०० क्षेपणास्त्र प्रणालीचे वैशिष्ट्य

एस्-४०० ही जगातील अत्याधुनिक क्षेपणास्त्रविरोधी प्रणाली आहे. यात शत्रूच्या विमानांना अचूकपणे लक्ष्य करण्याचे सामर्थ्य आहे. ही लांब पल्ल्यांवरून भूमीवरून हवेत मारा करणारी अत्याधुनिक प्रणाली मानली जाते. क्रूझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आणि विमाने टिपण्यात ही सक्षम आहे. एकाच वेळी ३६ वार करण्याची क्षमता या प्रणालीमध्ये आहे.


Multi Language |Offline reading | PDF