पिंडाकरिता सर्व अन्नांतील थोडा थोडा भाग घेण्यामागील शास्त्र काय ? (अन्नातील सर्व पदार्थांचा वाटा पिंडाद्वारे मिळाल्याने लिंगदेहाच्या आसक्तीविषयक भावना अल्प होण्यास साहाय्य होऊन लिंगदेह भूलोकात अडकण्याची शक्यता अल्प होणे)
हिंदु धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषिऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी ‘श्राद्ध’ आवश्यक असते. माता-पिता, तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी यांसाठीचा संस्कार म्हणजेच ‘श्राद्ध.’ श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. श्राद्धात पितरांना हविर्भाग दिला गेल्याने ते संतुष्ट होतात. याउलट श्राद्ध न केल्यास पितरांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे, तसेच असे वासनायुक्त पितर वाईट शक्तींच्या नियंत्रणात जाऊन त्यांचे दास (गुलाम) झाल्याने वाईट शक्तींनी पितरांचा उपयोग करून कुटुंबियांना त्रास देण्याची शक्यता अधिक असते. श्राद्धामुळे पितरांची या त्रासांतून मुक्तता होऊन आपले जीवनही सुसह्य होते.
अन्य संस्कारांइतकाच ‘श्राद्ध’ हा संस्कारही अत्यावश्यक आहे. २५ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत पितृपक्ष आहे. त्यानिमित्ताने श्राद्धविषयक लिखाण येथे देत आहोत.
‘पिंड हा लिंगदेहाचे प्रतिनिधित्व करतो. ज्या वेळी लिंगदेह हा प्रत्यक्ष देहापासून विलग होतो, त्या वेळी तो वायूमंडलात मनातील संस्कारांची अनेक आवरणे लपेटून बाहेर पडतो. आसक्तीदर्शक घटकांमध्ये अन्नाचा सहभाग सर्वांत अधिक प्रमाणात असतो. प्रत्येक जिवाची अन्नाविषयीची आवड-निवड वेगळी असते. या सर्व आवडींचे निदर्शक म्हणून गोड, तिखट अशा प्रत्येक चवीतील पदार्थांनी युक्त असलेल्या अन्नांतील थोडा थोडा भाग घेऊन त्याच्या साहाय्याने पिंड बनवून तो श्राद्धस्थळी ठेवला जातो. यामुळे श्राद्धातील मंत्रोच्चारातील संकल्पविधीच्या पिंडांवर केलेल्या संस्करणात्मक क्रियेमुळे त्या त्या अन्नपदार्थांतील सूक्ष्म-वायू कार्यरत होऊन बाह्य वायूमंडलात प्रक्षेपित होतात. श्राद्धातील संकल्पविधीमुळे श्राद्धस्थळी आलेल्या लिंगदेहांना तो तो अन्नाचा हविर्भाग सूक्ष्म-वायूंच्या माध्यमातून मिळणे शक्य झाल्याने लिंगदेह संतुष्ट होतात. त्या त्या पदार्थांचा वाटा मिळाल्यामुळे लिंगदेहाच्या आसक्तीविषयक भावना अल्प होण्यास साहाय्य झाल्याने लिंगदेह भूलोकात अडकण्याची शक्यता अल्प होते.’
– एक विद्वान (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ ‘एक विद्वान’, ‘गुरुतत्त्व’ या टोपणनावानेही लिखाण करतात) (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्राद्ध’)