भारताने ७ रोहिंग्या मुसलमान घुसखोरांना परत पाठवले

भारतात ४० सहस्र रोहिंग्या मुसलमान रहात असतांना ‘अशा धीम्या गतीने आणि अल्प संख्येने त्यांना परत पाठवल्यास ही समस्या निपटण्यास किती वेळ लागेल’, याचा विचारही न केलेला बरा !

नवी देहली – आसाममध्ये अवैधरित्या रहाणार्‍या ७ रोहिंग्या मुसलमान घुसखोरांना भारताने ४ ऑक्टोबर या दिवशी मणीपूर येथील मोरेह सीमा चौकीवर म्यानमारच्या अधिकार्‍यांकडे सोपवले. भारतातून घुसखोर रोहिंग्यांना म्यानमारला परत पाठवण्याची ही पहिली वेळ असल्याचे गृह मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

१. अधिकार्‍याने सांगितले की, या घुसखोरांना वर्ष २०१२ मध्ये पोलिसांनी कह्यात घेतले होते. (या घुसखोरांना ६ वर्षे भारताने का पोसले ? तेव्हाच त्यांना का पाठवण्यात आले नाही ? – संपादक) तेव्हापासून त्यांना आसाममधील सिलचर येथे ठेवण्यात आले होते. म्यानमारच्या अधिकार्‍यांना या व्यक्तींची माहिती देण्यात आली होती. त्यांची ओळखही पटली होती. ते म्यानमारच्या राखीन प्रांतातील आहेत.

२. संयुक्त राष्ट्र शरणार्थी संस्था ‘यूएन्एच्सीआर्’मध्ये नोंदणी असलेले १४ सहस्रांहून अधिक रोहिंग्या घुसखोर भारतात रहात असल्याचे भारत सरकारने गेल्या वर्षी संसदेत सांगितले होते; मात्र देशात रहाणार्‍या रोहिंग्यांची संख्या सुमारे ४० सहस्र असल्याचे म्हटले जात आहे.

संयुक्त राष्ट्रांचा विरोध

भारतातील रोहिंग्यांना परत पाठवण्यावर संयुक्त राष्ट्रांनी आक्षेप घेतला आहे. ‘जर भारताने असे केले, तर हे आंतरराष्ट्रीय कायद्याविषयी स्वत:चे असलेले उत्तरदायित्व नाकारण्यासारखे असेल’, असे संयुक्त राष्ट्रांच्या विशेष दुताने म्हटले आहे. (संयुक्त राष्ट्रांना घुसखोरांचा कळवळा असेल, तर त्याने स्वतःच्या देशांमध्ये जागा निर्माण करून त्यांना वसवावे ! – संपादक)

रोहिग्यांना परत पाठवण्यावर हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

या रोहिंग्यांना परत पाठवण्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. ती न्यायालयाने ४ ऑक्टोबरला फेटाळून लावली. ‘संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संघटनेच्या प्रतिनिधींना त्या रोहिंग्यांना भेटण्याची अनुमती द्यावी आणि त्यांना खरेच म्यानमारमध्ये परतण्याची इच्छा आहे का ?, हे जाणून घ्यावे’, अशी विनंती याचिकाकर्त्यांचे अधिवक्ता प्रशांत भूषण यांनी न्यायालयात केली होती. त्यावर केंद्र सरकारचीही बाजू ऐकून घेतल्यावर न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. याचिका फेटाळताच प्रशांत भूषण यांनी ‘रोहिंग्यांच्या आयुष्याचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे’, असे सांगितले. (काश्मीरमधून धर्मांधांनी पळवून लावलेल्या साडेचार लाख हिंदूंसाठी प्रशांत भूषण यांनी कधी प्रयत्न केला आहे का ? पाक आणि बांगलादेश येथून येणार्‍या हिंदूंसाठी प्रशांत भूषण काही करतात का ? – संपादक) यावर न्यायालयाने, ‘‘आम्हाला जगण्याच्या अधिकारासंदर्भात ठाऊक आहे. आम्हाला आमच्या दायित्वाची वारंवार आठवण करून देऊ नका’’, असे सुनावले.


Multi Language |Offline reading | PDF