भारत आणि भारतीय अशा मंदीला सामोरे जाण्यास सिद्ध आहेत का ?
न्यूयार्क (अमेरिका) – येत्या २ वर्षांत जगाला प्रचंड मोठ्या आर्थिक मंदीस सामोरे जावे लागणार, अशी शंका अर्थतज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाल येत्या २ वर्षांनंतर समाप्त होणार आहे. तोपर्यंत संपूर्ण जगावर असणार्या कर्जाची रक्कम सहस्रो अब्ज असणार आहे. एवढ्या मोठ्या रकमेच्या कर्जाची मूळ रक्कम आणि त्यावरील व्याज फेडण्यासाठी जगातील अनेक राष्ट्रांचे उत्पन्न तोकडे पडणार आहे. त्यामुळे त्या राष्ट्राच्या चलनाचा दर (एक्स्चेंज रेट) कमालीचा वाढणार आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी निर्मित होणार्या वस्तूंचे दर वाढवावे लागतील अथवा त्यांचे निर्मिती मूल्य न्यून करण्यासाठी वेतनात कपात करावी लागेल. अशाने लोकांची क्रयशक्ती न्यून होऊन वस्तूंची मागणी न्यून होईल आणि त्यामुळे निर्मिती घटेल. असे हे दुष्टचक्र एकदा चालू झाले की, ती आर्थिक मंदी येण्याची लक्षणे आहेत.
जगातील पहिली आर्थिक मंदी वर्ष १९२९ मध्ये उत्पन्न झाली होती. त्यानंतर वर्ष २००८ मध्येही जगाला आर्थिक मंदीचा फटका बसला होता. आर्थिक बंदीचा पहिला फटका कर्ज देणार्या आस्थापनांना बसतो. मोठ्या प्रमाणावर कर्जवाटप केल्यावर त्याची वसुली होत नसली की, त्या आस्थापनांचे दिवाळे निघते. वर्ष २००८ मध्ये अमेरिकेतील लेहमन सारख्या अनेक आस्थापनांनी दिवाळखोरी घोषित केली होती. अनेकदा या आर्थिक मंदीचे परिणाम जागतिक युद्ध चालू होण्यातही होतात. दुसरे जागतिक महायुद्ध याच आर्थिक मंदीचा परिणाम आहे, असे म्हटले जाते.