बारामती नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी, तसेच ‘एन्व्हायर्मेंटल फोरम ऑफ इंडिया’ यांच्याविरोधात गुन्हा नोंद

दान घेतलेल्या गणेशमूर्ती कचरा वाहतुकीच्या वाहनातून कचरा डेपोमध्ये नेल्याचे प्रकरण

बारामती (जिल्हा पुणे) – शहरातील गणेशोत्सव मंडळांच्या आणि घरगुती गणेशमूर्ती घेऊन त्याचे विधिवत विसर्जन न करता त्या कचरा डेपो परिसरात टाकून देण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी बारामती नगरपरिषदेचे ४ अधिकारी आणि कर्मचारी, तसेच ‘एन्व्हायर्मेंटल फोरम ऑफ इंडिया’ ही संस्था यांच्याविरोधात बारामती शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला. भाजपचे प्रशांत सातव यांनी याविषयी तक्रार प्रविष्ट केली होती.

 गणेशोत्सवामध्ये बारामती नगरपरिषदेने पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली गणेशमूर्ती दान करण्याचे आवाहन केले होते. या मूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात येईल, असे आश्‍वासनही प्रशासनाने दिले होते; मात्र प्रशासनाने याचे पालन केले नाही.

नगराध्यक्षांसह अनेक नगरसेवक फोरमचे सदस्य आहेत. यांपैकी नेमकी कोणावर पोलीस कारवाई करणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

लोकप्रतिनिधी आणि गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते यांची ३ ऑक्टोबरला ‘बारामती बंद’ची हाक !

गणेशमूर्तींची विटंबना करणार्‍या आणि फसवणूक करून भाविकांच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांवर पुढील कारवाई तत्परतेने करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे प्रशांत सातव यांच्यासह लोकप्रतिनिधींनी आणि गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ ३ ऑक्टोबरला ‘बारामती बंद’ची हाक देण्यात आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF