खर्‍या भक्त असणार्‍या महिला नव्हे, तर केवळ ‘महिला कार्यकर्त्या’ शबरीमला मंदिरात येतील ! – पद्मकुमार, अध्यक्ष, त्रावणकोर देवस्वम् मंडळ

थिरुवनंतपूरम् (केरळ) – भगवान अय्यप्पाच्या ‘खर्‍या महिला भक्त’ शबरीमला मंदिराला भेट देण्याची शक्यता नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केवळ ‘महिला कार्यकर्त्या’ या मंदिरात येतील, असे या मंदिराचे व्यवस्थापन पहाणार्‍या त्रावणकोर देवस्वम् मंडळाचे अध्यक्ष पद्मकुमार यांनी म्हटले आहे. न्यायालयाने सर्व वयोगटांतील महिलांना या मंदिरात प्रवेश करण्याची अनुमती असल्याचा निर्णय २८ सप्टेंबरला दिला होता. त्यावर ते बोलत होते.

त्रावणकोर देवस्वम् मंडळाचे अध्यक्ष पद्मकुमार

१. केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन् यांची भेट घेतल्यावर पद्मकुमार पुढे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या कार्यवाहीचा एक भाग म्हणून भाविकांना आणखी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंडळ आणखी १०० एकर जागेची मागणी करील.

२. ते पुढे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने या मंदिरात महिलांच्या प्रवेशाविषयी विचार करतांना केवळ घटनात्मक, मूलभूत आणि लिंगविषयक सूत्रे विचारात घेतली. तथापि या धर्मस्थळाचे भौगोलिक स्थान आणि येथील विशिष्ट परिस्थितीही त्याने विचारात घ्यायला हवी होती. जंगलाच्या रस्त्याने अनेक किलोमीटर चालून येणे आणि लाखो लोकांच्या गर्दीचा त्रास सोसणे महिलांना शक्य आहे काय ? शबरीमलाच्या प्रथा आणि परंपरा यांचा आदर करणार्‍या आणि येथील परिस्थितीची माहिती असणार्‍या खर्‍या महिला भक्त येथे येण्याची शक्यता नाही. या निकालाच्या नावावर केवळ काही महिला कार्यकर्त्या येथे येणे अपेक्षित आहेत. येथे पोहोचणार्‍या महिला भाविकांना आम्ही शक्य त्या सर्व सोयी पुरवू.


Multi Language |Offline reading | PDF