गौरी लंकेश हत्या प्रकरण : पोलिसांकडून गुन्हा स्वीकारण्यासाठी प्रचंड छळ !

गौरी लंकेश हत्येतील संशयित आरोपी परशुराम वाघमोरे यांची प्रसारमाध्यमांसमोर माहिती

  • गुन्हा न स्वीकारल्यास कुटुंबियांना गुन्ह्यात अडकवण्याची धमकी

  • गुन्हा स्वीकारल्यास २५ ते ३० लाख रुपये देण्याचे आमीष

  • कर्नाटकातील प्रसारमाध्यमांनी निरपराध्यांनी सांगितलेली माहिती प्रसारित केली; मात्र भारतातील उर्वरित प्रसारमाध्यमांनी ही बातमी दडपली ! याच माध्यमांनी पूर्वी या संशयितांच्या अटकेवरून सनातन संस्थेला ‘आतंकवादी’ ठरवणारी वृत्ते प्रसारित केली होती, हे लक्षात घ्या !
  • निरपराध्यांच्या या माहितीवरून तरी सरकार या घटनेचे योग्य अन्वेषण करणार का ?
  • पोलीस निरपराध्यांना गुन्हेगार ठरवण्यासाठी कसे षड्यंत्र रचतात, हे लक्षात घ्या !

बेंगळूरू (कर्नाटक) – पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या मी केलेली नाही. तरीही विशेष पोलीस पथकाचे (एस्.आय.टीचे) अधिकारी मला धमकी देत आहेत. मी हत्या केल्याचे मान्य केले नाही, तर माझ्या कुटुंबियांना या हत्येत अडकवू, अशी धमकी ते देत आहेत, अशी माहिती या हत्येच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले संशयित परशुराम वाघमोरे यांनी येथे प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली. या प्रकरणात अटक करण्यात आलेले संशयित नवीन कुमार, मनोहर एडवे, अमीत डेगवेकर, परशुराम वाघमोरे, प्रवीण, मोहन नायक, गणेश मिस्किन, अमीत बद्धी आणि राजेश बंगेरा यांना २९ सप्टेंबरला न्यायालयात उपस्थित करण्यासाठी आणले असता वाघमोरे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या सर्व संशयितांना १२ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

परशुराम वाघमोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केलेले आरोप

१. आम्हाला अटक करणे हे सर्व षड्यंत्र आहे. आम्हाला अपराधी ठरवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आमचा आणि गौरी लंकेश हत्येच्या प्रकरणाचा काहीच संबंध नाही.

२. आम्हाला मारहाण केली जात आहे. एक मारतो, तर दुसरा अधिकारी दबाव आणतो. ‘अपराध मान्य करा. तुमच्या कुटुंबाला २५-३० लाख देतो’, असे हे अधिकारी म्हणतात. ते म्हणतात की, तुमचे भाऊ, आई-वडील, मित्र यांना या प्रकरणात अडकवणार.

३. आमचा ८-८ दिवस छळ करण्यात आला. मारहाण करून कोर्‍या कागदावर आमचा जबाब नोंदवून घेऊन त्यावर स्वाक्षरी करण्यास सांगितले जात आहे. पोलिसांनी सांगितलेले आमच्याकडून वदवून घेतले जात आहे. त्याचे चित्रीकरण करून चित्रफीत बनवली जात आहे. मारहाणीत काही बरेवाईट झाले, तर त्याला विशेष पोलीस पथकच उत्तरदायी असेल.

४. ‘हे सर्व काय चालले आहे ?’, हे आम्हाला काहीच कळत नाही. येथे कुणा कुणाला पकडून आणण्यात आले आहे ? आमचा एकमेकांशी कोणताही परिचय नाही. ‘आम्ही एकमेकांना ओळखत असल्याचा कोणता पुरावा पोलिसांकडे आहे’, हे तुम्ही त्यांना विचारा. येथे आल्यावरच आमचा एकमेकांशी परिचय झाला. (तेथे बसलेल्या आरोपींना दाखवून) हे कोण, ते कोण आम्हाला ठाऊक नाही.

५. ‘तुमचा कशाप्रकारे छळ केला ?’ असे पत्रकारांनी विचारल्यावर वाघमोरे म्हणाले की, आमचा शारीरिक आणि मानसिक छळ केला गेला. आम्ही निरपराध आहोत. आमच्या जिवाला धोका आहे.

मनोहर एडवे यांनी केलेला आरोप

माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. माझ्यासमवेत अटक केलेले कोण आहेत, हे मला ठाऊक नाही. त्यांच्याशी माझा काहीही संबंध नाही. मला अनावश्यक डांबून ठेवण्यात आले आहे. आमचे कुटुंबीय भेटायला आले, तर त्यांना भेटायला दिले जात नाही. पोलीस आमचा अनेक प्रकारे शारीरिक छळ करत आहेत. आम्हाला अटक करून प्रा. भगवान यांच्या हत्येचा कट रचल्याचा खोटा आरोप करत आहेत. अनावश्यक त्रास देत आहेत. ‘गौरी लंकेश कोण होत्या ?’, हेच आम्हाला ठाऊक नाही.

पोलीस या संशयितांना खोट्या चकमकीत ठार करतील आणि आत्महत्या केल्याचे दाखवतील ! – प्रमोद मुतालिक यांचा दावा

श्री. प्रमोद मुतालिक

नवीन कुमार यांच्या अटकेपासूनच मी सांगत आहे की, पोलीस नवनवीन कथा  रचत आहेत. अटक करण्यात आलेल्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करून त्यांना पैशाचे आमीष दाखवले जात आहे. यातून सरकार आणि विशेष अन्वेषण पथक उघडे पडले आहे. या प्रकरणाचे काहीच पुरावे मिळाले नाहीत. अशाच प्रकारे कॉ. पानसरे हत्येच्या प्रकरणात समीर गायकवाड यांना अटक करण्यात आली होती. त्या वेळीही अशाच प्रकारे २५ लाख रुपयांचे आमीष दाखवून, ‘आम्ही ४-५ लोकांचे नाव सांगतो. त्यांची नावे तुम्ही सांगा. मग आम्ही तुम्हाला सोडतो. तू सरकारी साक्षीदार हो’, असे पोलीस त्यांना सांगत होते. समीर गायकवाड यांनी हे थेट न्यायालयात सांगितले. असे असतांना आणखी काय पुरावे पाहिजेत या कथांना ?

विशेष पोलीस पथकाचे अधिकारी खोटी चकमक घडवून या आरोपींना ठार करू शकतात किंवा ‘त्यांनी आत्महत्या केली’, असे भासवू शकतात, असा आरोप श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी संशयितांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना केला.

षड्यंत्रामागील अदृश्य हाताचा शोध घ्या ! – हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे

मुंबई – पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटकेत असलेले परशुराम वाघमोरे आणि मनोहर एडवे या दोघांनी आज प्रसारमाध्यमांना अत्यंत गंभीर सूत्रे सांगितली आहेत. यावरूनच कर्नाटक विशेष अन्वेषण पथकाचे अन्वेषण किती संशयास्पद आणि षड्यंत्रपूर्वक चालू आहे, हेच दिसून येते. यापूर्वीही महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाचे तत्कालीन प्रमुख राकेश मारिया यांच्यावर डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात अटक केलेल्या आणि नंतर जामिनावर सुटलेल्या मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांना ‘२५ लाख देतो, गुन्हा स्वीकारा’, असे गंभीर आरोप केले होते. कॉ. पानसरे हत्या प्रकरणातही समीर गायकवाड यांनाही पैशाचे आमीष दाखवून गुन्हा स्वीकारण्यास दबाव आणला गेला होता.

(वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा.)

आता गौरी लंकेश हत्या प्रकरणातही २५ लाख रुपयांचे आमीष दाखवून संशयितांवर दबाव आणला जात आहे. या हत्यांच्या प्रकरणात अन्वेषण यंत्रणा येनकेन प्रकारेण सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे नाव यावे, यासाठी संशयितांवर दबाव आणत आहेत, असेच दिसून येते. परशुराम वाघमोरे आणि मनोहर ऐडवे यांना २५ लाख रुपयांचे आमीष दाखवणारी व्यक्ती कोण आहे ? सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना या प्रकरणांत अडकवण्याचे षड्यंत्र कोण रचत आहे ? या सर्वांमागे कोणता अदृश्य हात आहे ? कोण ‘मास्टरमाईंड’ आहे ?, याची चौकशी व्हावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने शासनाकडे केली आहे, असे समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF