कोट्यवधी हिंदु महिलांवरील या अन्यायाविषयी मोदी सरकार काय भूमिका घेणार ? – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ‘विवाहबाह्य संबंध गुन्हा नाही !’ या निर्णयाविषयी ‘दैनिक सामना’तील अग्रलेखातील परखड विचार

मुंबई – तलाकपीडित मुसलमान महिलांना न्याय देण्याचे राजकीय ढोंग करणार्‍यांनी हिंदु संस्कृतीमधील पवित्र वैवाहिक नात्यावर मोठे आक्रमण केले आहे. तुमचा कायदा गेला चुलीत. संस्कार आणि संस्कृती यांचे राममंदिर ज्यांच्या राज्यात तुटतांना दिसत आहे, ते राज्य हिंदूंना हवे आहे का ? पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक भागवत यांना हे सर्व मान्य आहे का ? ‘तिहेरी तलाक’ हा अघोरी प्रकार असल्याचा प्रचार पंतप्रधान करतात. त्या विरोधात त्यांनी कायदाच करून घेतला; मात्र त्याच वेळी कोट्यवधी हिंदू आणि अन्य महिला यांवर आता जो अन्याय झाला आहे, त्याविषयी मोदी सरकार काय भूमिका घेणार आहे ?, असा प्रश्‍न शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी २९ सप्टेंबरच्या ‘दैनिक सामना’मधील अग्रलेखामध्ये उपस्थित केला आहे. ‘विवाहबाह्य संबंध गुन्हा नसल्याचा निकाल देणार्‍या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविषयी भाजप हिंदूंच्या हिताची भूमिका घेणार का ?’ याविषयी या अग्रलेखातून भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन करण्यात आले असून व्यभिचाराला उत्तेजन देणार्‍या न्यायालयाच्या या निर्णयाचा समाचार घेण्यात आला आहे.

या अग्रलेखात श्री. उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की,

१. भारताची न्यायव्यवस्था स्वतंत्र बाण्याची असल्याचे ढोल नेहमीच वाजवले जातात; मात्र न्यायव्यवस्थेस इतकेही स्वातंत्र्य नसावे की, देशाची संस्कृती, संस्कार, परंपरा आणि नैतिकता या शब्दांना त्यांनी भरबाजारात उघडे करावे आणि लोकांना रस्त्यावर नग्न नाचण्यास प्रवृत्त करावे. न्यायालयाच्या डोक्यातील विकृती आणि घाण त्यांनी समाजावर लादण्याचा प्रयत्न करू नये.

२. विवाह संस्था, पवित्र नाती मोडून टाकणारा एक निर्णय आमच्या न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने आधी समलिंगी विवाहांना मान्यता दिली आणि आता विवाहबाह्य संबंधांना सरळ पाठिंबा दिला. ‘व्यभिचार गुन्हा नाही’, असे सांगणार्‍या न्यायालयीन निकालामुळे आता सर्वच समाजात तीच प्रथा अस्तित्वात येणार आहे.

३. देशात भाजपचे राज्य आल्यापासून हे काय घडू लागले आहे ? भ्रष्टाचाराला उघड मान्यता मिळालीच आहे. आता अनैतिकतेवरही फुले उधळली जात आहेत.

४. ‘पती स्वत:च्या पत्नीचा मालक नाही’, असे न्यायालय म्हणते. याचा अर्थ पंतप्रधान आणि संसद यांनी समजून घेतला पाहिजे. लग्न करून स्त्रीला जीवनसाथी म्हणून घरी आणायचे आणि त्या नवर्‍याने सरळ दुसर्‍या स्त्रीशी संबंध ठेवून लग्नाच्या बायकोचा मानसिक आणि शारीरिक छळ करायचा, हे कृत्य कोणत्याही पातळीवर मान्य करण्यासारखे नाही. घरगुती हिंसा म्हणजे ‘डॉमेस्टिक व्हायोलेन्स’चे हे समर्थन आहे. पतीचा पत्नीवर आणि पत्नीचा पतीवर हक्क नाकारणारा हा निकाल म्हणजे इस्लामी कायद्यांतील तरतुदीपेक्षा भयंकर आणि निर्घृण आहे. हिंदु संस्कृती रक्षकांना ते मान्य आहे काय ?

५. आपण रामाचे नाव घेतो आणि राममंदिर उभारणीची मागणी करतो, तेव्हा रामाच्या एकपत्नी व्रताचे दाखले आपण देतो; मात्र हे नवे ‘रामराज्य’ सरळ अनैतिक विवाहबाह्य संबंधांना उत्तेजन देत आहे.

६. व्यभिचार केला, दुसर्‍याच्या संसारात विष कालवले, तर कायद्याने शिक्षा होईल, ही भीतीच आता नष्ट झाली. ‘लोकांना कायद्याची भीती उरली नाही’, अशी प्रवचने आता कुणीही झोडू नयेत. या देशाला चारित्र्य आणि संस्कृती यांचे अधिष्ठान होते, ते व्यभिचार हाच शिष्टाचार या निर्णयाने संपले आहे.

७. भारतीय दंड विधान कलम ४९७ विषयी न्यायालयाचे म्हणणे आहे की, हा कायदा अपूर्ण आहे. हा कायदा अपूर्ण असेल, तर तो अधिक भक्कम करण्यासाठी न्यायालयाने पाऊल उचलायला हवे होते; मात्र तसे न करता असलेल्या कायद्याची टांगती तलवारही बाजूला करून न्यायालयाने व्यभिचारास मोकळे रान करून दिले.

८. ‘हा निर्णय नक्की कुणाच्या सोयीसाठी घेतला गेला ?’ असा प्रश्‍न लोकांनी विचारला, तर न्यायालय आणि सरकार यांनी मनाला लावून घेऊ नये. व्यभिचार हा गुन्हा नसेल, तर मग यापुढे कुंटणखान्यांना रितसर अनुमती दिली जाणार आहे काय ? वेश्या खरे तर पोटासाठी निरुपायाने शरीरविक्री करतात; मात्र तो कायद्याने गुन्हा आणि एखाद्याने त्याला वाटले म्हणून दुसर्‍या विवाहितेशी विवाहबाह्य संबंध ठेवले, तर ते कायदेशीर, असा उफराटा निवाडा न्यायालयाच्या निर्णयामुळे होणार आहे.

९. पोलीस अनेक ‘लॉज’ आणि मोठी हॉटेल्स यांवर धाडी घालून पुरुष आणि महिला यांना पकडतात. त्यांच्या तोंडावर बुरखे टाकून धिंड काढतात. ते थांबून अशा अनैतिक कृत्यांना परवाना दिला जाणार आहे काय ?

१०. सिग्नल तोडणे हा गुन्हा आहे, मद्य पिऊन गाडी चालवणे हा गुन्हा आहे, विनयभंग हासुद्धा गुन्हा ठरत आहे; मात्र उघड उघड व्यभिचार हा गुन्हा नाही.

११. ‘हिंदू कोड बिल’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आणले. हिंदु विवाह कायदा हा आजपर्यंत दीपस्तंभाप्रमाणे उभा होता. त्यावर थुंकण्याचा हा प्रकार आहे.


Multi Language |Offline reading | PDF