सनातन संस्थेला विविध माध्यमांतून साहाय्य करणार्‍या हितचिंतकांवर पोलिसांनी आणलेल्या दबावामुळे सनातनने अनुभवलेली अघोषित बंदी !

‘पुरोगाम्यांच्या हत्या आणि नालासोपारा येथे कथित स्फोटके सापडणे यांप्रकरणी सनातन संस्थेच्या विरोधात एकही पुरावा सापडला नसतांनाही सनातनद्वेष्टे विचारवंत, निधर्मी राजकारणी आणि प्रसारमाध्यमे यांच्या अभद्र युतीने सनातनवर बेछूट आरोप केले अन् सनातनवर बंदी घालण्याची मागणी केली. पुरावे नसल्याने सनातनवर बंदी येऊ शकत नाही, तर ‘गोबेल्स’ नीतीचा वापर करून ‘अघोषित बंदी लादा’ ही पद्धत सनातनच्या विरोधकांनी अवलंबली आहे. या अपप्रचाराद्वारे हितचिंतकांना सनातनपासून तोडण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र काही घटनांतून पहायला मिळाले. एका जिल्ह्यात पोलीस आणि सनातनद्वेष्टे यांच्याकडून दबाव येत असल्याच्या कारणामुळे काही हितचिंतकांना सनातनच्या राष्ट्र आणि धर्म कार्याला साहाय्य करण्यात अडथळे येत आहेत. याची काही उदाहरणे येथे देत आहोत.

१. एका भागातील सभागृहात ऑगस्ट २०१८ मध्ये साधकांसाठी २ दिवसांचे शिबीर आयोजित करण्यात येणार होते. त्या वेळी सभागृहाच्या मालकांनी ‘२ दिवस विनामूल्य सभागृह देतो’, असे सांगितले होते; मात्र नंतर त्यांनी सभागृह देण्याविषयी असमर्थता दर्शवली. ते म्हणाले, ‘‘सनातनला सभागृह देण्याविषयी माझा वैयक्तिक आक्षेप नाही; पण माझ्या सहकार्‍यांनी ‘सनातनच्या कार्यक्रमांना सभागृह द्यायचे नाही. सभागृह दिले, तर पोलीस चौकशी करतात. त्यामुळे सभागृह द्यायला नको’, असे सांगितले आहे.’’ सभागृह देता येत नसल्याविषयी या सभागृह मालकांनी खंतही व्यक्त केली.

२. एका भागातील सभागृहात सप्टेंबर मासात जनसंवाद सभा घ्यायची होती. त्यासाठी सभागृहाच्या मालकांकडे सभागृह उपलब्ध करून देण्याविषयी साधकांनी विचारणा केली असता, त्यांनी ‘पोलिसांकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र आणावे लागेल. त्याशिवाय सभागृह देता येणार नाही’, असे सांगितले. पोलिसांकडून अनुमती मिळाल्यानंतरच त्यांनी सभागृह उपलब्ध करून दिले. केवळ १ दिवस आधी सभागृह उपलब्ध झाले.

३. एका शहरातील एका मंगल कार्यालयाच्या मालकांनी ‘सभागृह अल्प दरात उपलब्ध करून देऊ; पण त्यासाठी पोलिसांची अनुमती आणा’, असे सांगितले.

४. एका भागातील सभागृहात गेल्या वर्षी प्रांतीय हिंदू अधिवेशन पार पडले होते; मात्र कार्यक्रम चालू असतांनाच पोलीस चौकशीसाठी आले होते आणि त्यांनी सभागृहाच्या व्यवस्थापकांकडे चौकशी केली. त्या वेळी सभागृहाच्या मालकांनी ‘पोलीस दबाव आणत असल्याकारणाने यापुढे सनातन संस्था अथवा हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यक्रमांना सभागृह देऊ शकत नाही’, असे सांगितले.

५. एका सभागृहाच्या मालकांनीही ‘आमच्यावर दबाव असल्याने सनातनच्या कार्यक्रमासाठी सभागृह देऊ शकत नाही’, असे सांगितले. या वेळी त्यांनी त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे, हे सांगण्यास नकार दिला.

६. एका देवस्थानचे विश्‍वस्त गेली १५ वर्षे नवरात्री उत्सवामध्ये सनातनला ग्रंथ प्रदर्शन कक्ष लावण्यासाठी जागा देतात; मात्र या वेळी त्यांनी ‘नवरात्रीत कक्ष लावण्यासाठी जागा देऊ शकत नाही’, असे सांगितले आहे. ते म्हणाले, ‘‘तुम्हाला जागा देऊ नये, असे पोलिसांनी बजावले आहे. तुम्हाला जागा दिल्यानंतर पोलिसांचा ससेमिरा आमच्या मागे लागतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला अनुमती देऊ शकत नाही. सध्या प्रसारमाध्यमांमधून तुमच्याविषयी बातम्या दाखवण्यात येत आहेत. त्यामुळे तुम्ही कक्ष लावण्याविषयी विचारायलाही येऊ नका. मी एकटा सनातनच्या बाजूने आहे; पण विश्‍वस्त मंडळातील अन्य सदस्य सनातनच्या विरोधात आहेत.’’

७. एका शहरातील एका सभागृहाच्या मालकांना ऑगस्ट २०१८ मध्ये कार्यक्रमासाठी सभागृह मिळण्याच्या संदर्भात संपर्क केला होता. तेव्हा ते मालक म्हणाले, ‘‘किमान १ वर्ष तरी सभागृह आम्ही देऊ शकत नाही. त्यामुळे सभागृह मागू नका.’’ मालकांना कारण विचारल्यावर ‘सभागृहाच्या दुरुस्तीचे काम चालू आहे’, असे वरवरचे उत्तर त्यांनी दिले. या सभागृहात अन्य एका संघटनेचे कार्यक्रम होतात.’


Multi Language |Offline reading | PDF