स्त्रीच्या पोशाखाचा तिच्या सात्त्विकतेवर प्रभाव पडतो !

  • महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने श्रीलंकेतील वैज्ञानिक परिषदेत ‘साडी – सकारात्मक

  • सूक्ष्म स्पंदने प्रक्षेपित करणारी एक कालातीत पद्धत (फॅशन)’ या विषयावर शोधप्रबंध सादर !

शोधप्रबंध सादर करतांना पू. (सौ.) उमा रविचंद्रन्

कोलंबो (श्रीलंका) – स्त्रियांच्या पोशाखांची कलात्मक रचना करणारे कलाकार (ड्रेस डिझायनर्स) आणि त्यांची निर्मिती करणारे (फॅशन हाऊसेस) यांना पोशाखांची सात्त्विकता वाढवणार्‍या आध्यात्मिक घटकांची जाण असेल अन् ते लक्षात घेऊन त्यानुसार पोशाखांची निर्मिती केल्यास स्त्रियांच्या पोशाखांवर एक महत्त्वाचा सकारात्मक प्रभाव पडेल. यामुळे जगभरातील स्त्रियांच्या आध्यात्मिक सौंदर्यात भर, तसेच पोशाखामुळे त्यांच्या सात्त्विकतेवर प्रभाव पडेल, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी केले. कोलंबो, श्रीलंका येथे झालेल्या ‘अपॅरल टेक्सटाइल्स अ‍ॅण्ड फॅशन डिझाईन’ या संदर्भातील तिसर्‍या आंतरराष्ट्रीय परिषदेत २७ सप्टेंबर २०१८ या दिवशी त्या बोलत होत्या. ही परिषद ‘ग्लोबल अ‍ॅकॅडेमिक रिसर्च इन्स्टिट्यूट’ आणि ‘द टेक्सटाइल इन्स्टिट्यूट (श्रीलंका प्रभाग)’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. पू. (सौ.) रविचंद्रन् यांनी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले लिखित ‘साडी – सकारात्मक सूक्ष्म स्पंदने प्रक्षेपित करणारी एक कालातीत पद्धत (फॅशन)’ हा शोधप्रबंध सादर केला. पूज्य (सौ.) उमा रविचंद्रन् आणि श्री. शॉन क्लार्क या शोधनिबंधाचे सहलेखक आहेत.

या शोधप्रबंधात पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी या विषयावरील प्राथमिक संशोधनाच्या अंतर्गत केलेल्या एका प्रयोगाची माहिती देतांना सांगितले की,

१. हा प्रयोग डॉ. मन्नम् मूर्ती (माजी अणू वैज्ञानिक) यांनी विकसित केलेल्या ‘युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर’ (यु.टी.एस्.) या ऊर्जामापक यंत्राच्या साहाय्याने केला आहे. या यंत्राच्या माध्यमातून व्यक्तीमधील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा मोजता येते.

२. या प्रयोगाच्या अंतर्गत एका आध्यात्मिक संशोधन केंद्रातील निवासी स्त्रीला ७ विविध पोशाख प्रत्येकी ३० मिनिटे परिधान करण्यास सांगितले. प्रत्येक पोशाख परिधान करण्यापूर्वी आणि तो पोशाख ३० मिनिटे परिधान केल्यानंतर ‘युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर’ने ऊर्जेची मोजणी करण्यात आली.

३. जेव्हा स्त्रीने ‘व्हाईट इव्हनिंग गाऊन’, ‘ब्लॅक ट्यूब टॉप ड्रेस’ आणि ‘काळी पॅन्ट आणि टी-शर्ट’ हे पोशाख परिधान केले, तेव्हा तिच्यातील नकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली. या तुलनेत तिने ‘पांढरी पॅन्ट आणि शर्ट’ परिधान केल्यावर तिच्यातील नकारात्मकता थोडी न्यून (कमी) झाली. तिने सलवार-कमीज, सहावारी आणि नऊवारी साडी परिधान केल्यावर नकारात्मकता उत्तरोत्तर न्यून होत गेली. उलटपक्षी सहावारी आणि नऊवारी साडी नेसल्यावर तिच्यातील सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात वाढली. ही वाढ साडी केवळ ३० मिनिटे नेसल्यावर साध्य झाली, हे विशेष !

४. प्रख्यात मानसोपचारतज्ञ श्री. मास्लो यांच्या ‘पिरॅमिड’च्या दृष्टीकोनातून पोशाखाकडे पाहिले, तर अगदी मूलभूत शारीरिक गरजेच्या स्तरावर वस्त्र स्वतःचेे थंडी-वार्‍यापासून रक्षण करते. सुरक्षिततेच्या स्तरावरची स्वतःची गरजही ते भागवते; परंतु मानसिक स्तरावरची आत्मसन्मानासाररखी (‘सेल्फ एस्टीम’सारखी) गरज भागवण्यासाठी वस्त्रांवर सर्वाधिक पैसा खर्चिला जातो. वस्त्रांची खरेदी आणि ते परिधान करणे, हे ‘स्व’च्या पलीकडे जाऊन (सेल्फ ट्रान्सेंडन्स) मूलभूत गरज भागवण्यासाठीचे माध्यम या स्वरूपात कधीच पाहिले जात नाही.

५. एखाद्याच्या दिव्यत्वाकडे जाण्याच्या प्रवासात वस्त्र हातभार लावू शकतात. यासाठी आपल्या वस्त्रांमध्ये वातावरणातील सकारात्मक ऊर्जा आकर्षित करून ती परत वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता असायला हवी. या योगे या ऊर्जेचा पहाणार्‍यालाही लाभ मिळू शकतो.

६. वस्त्रामध्ये ते परिधान करणार्‍याचे सूक्ष्मातील नकारात्मक स्पंदनांपासून रक्षण आणि आध्यात्मिक उपाय करण्याची क्षमता असायला हवी. मानवजातीवर वस्त्रांचा पुष्कळ प्रभाव पडतो. तामसिक वस्त्रांमुळे मन चंचल आणि आक्रमक, तर राजसिक वस्त्रांमुळे अस्वस्थता निर्माण होते. सात्त्विक वस्त्रे मनामध्ये स्थिरता आणि शांती निर्माण करतात. नऊवारी साडी सर्वाधिक सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित करते, असे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संशोधनातून निष्पन्न झाले आहे. दुर्दैवाने आजकाल शहरी भागातून नऊवारी साडी अगदीच नामशेष झाली आहे, तसेच ग्रामीण भागातही ती अभावानेच आढळते.


Multi Language |Offline reading | PDF