तारीकडे, म्हापसा येथे विसर्जित केलेल्या श्री गणेशमूर्तींचे अवशेष पाण्यावर दिसू लागल्याने देवतेचे विडंबन !

  • हिंदु धर्माभिमान्यांकडून उपजिल्हाधिकारी आणि नगराध्यक्ष यांची भेट

  • मूर्तींचे अवशेष पुनर्विसर्जित करण्यासाठी पालिकेचे साहाय्य करण्याचे आश्‍वासन

बार्देश तालुक्याचे उपजिल्हाधिकारी गौरीश शंखवाळकर यांना निवेदन देतांना हिंदु धर्माभिमान्यांचे शिष्टमंडळ

म्हापसा, २७ सप्टेंबर (वार्ता.) – तारीकडे, म्हापसा येथे श्री गणेशचतुर्थींनंतर विसर्जित केलेल्या श्री गणेशमूर्तींचे अवशेष पाण्यावर दिसू लागल्याने देवतेचे विडंबन होत आहे. या समस्येवर तातडीने उपाययोजना काढण्याची मागणी या समस्येला अनुसरून गेली १४ वर्षे आवाज उठवणारे रोहिदास शिरोडकर आदी हिंदु धर्माभिमानी यांनी बार्देश तालुक्याचे उपजिल्हाधिकारी गौरीश शंखवाळकर आणि म्हापसा पालिकेचे उपनगराध्यक्ष मर्लीन डिसोझा यांच्याकडे केली आहे. त्यांची भेट घेऊन एका निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन देतांना हिंदु धर्माभिमानी रोहिदास शिरोडकर, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री गडेकर, सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत आणि गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघाचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत (भाई) पंडित यांची उपस्थिती होती.

श्री. रोहिदास शिरोडकर या निवेदनात म्हणतात, प्रत्येक वर्षी श्री गणेशचतुर्थीनंतर सहस्रो श्री गणेशमूर्तींचे तारीकडे, म्हापसा येथे वहात्या पाण्यात विसर्जन केले जाते. नदीत गाळ साचल्याने मूर्तीचे अवशेष पाण्यावर दृष्टीस पडून हिंदूंच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचते. हा प्रकार टाळावा यासाठी गेली १४ वर्षे गणेशोत्सवाच्या पूर्वी तारीकडे येथील नदीतील गाळ उपसण्याची मागणी शासनाकडे करत आलो आहे. यंदाही उत्सवाच्या पूर्वी अशाच प्रकारे निवेदन देण्यात आले होते. यानंतर गाळ उपसण्यात आला; मात्र वरवरचा गाळ काढण्यात आल्याने मूर्तींचे अवशेष पुन्हा पाण्यावर दिसू लागले आहेत. शासनाने या मूर्तींचे समयमर्यादेत पुनर्विसर्जन करणे आवश्यक आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा वापर झाल्याचे उघड

प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींच्या विक्रीवर शासनाने बंदी घालण्यात येऊनही म्हापसा परिसरात अशा मूर्तींचा वापर झाल्याचे उघड झाले आहे. तारीकडे विसर्जित केलेल्या अनेक मूर्ती या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असल्याचे आढळून आले आहे. बंदी असतांनाही अशा मूर्तींची विक्री कशी करण्यात आली ? दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी उपरोल्लेखित निवेदनात करण्यात आली आहे.

परराज्यातून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची आयात झाल्याची शक्यता ! – उपजिल्हाधिकारी

राज्यात पारंपरिक मूर्तीकार करत असलेल्या मूर्तींचा पुरवठा खूप अल्प प्रमाणात होत असतो आणि यामुळे मोठ्या संख्येने परराज्यातून मूर्तींची आयात होते. या वेळी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची आयात होण्याची शक्यता आहे, असे मत उपजिल्हाधिकारी गौरीश  शंखवाळकर यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर व्यक्त केले.

आज मूर्तींचे पुनर्विसर्जन

तारीकडे, म्हापसा येथे मूर्तींच्या अवशेषांचे पुनर्विसर्जन करण्यासाठी म्हापसा नगरपालिका २८ सप्टेंबरला सकाळी ४ कामगार देणार असे हिंदु धर्माभिमान्यांच्या शिष्टमंडळाला सांगण्यात आले. उपनगराध्यक्ष मर्लिन डिसोझा, नगरसेवक सर्वश्री संदीप फळारी, सुधीर कांदोळकर, चंद्रशेखर बेनकर आदींनी हिंदु धर्माभिमान्यांच्या मागणीवर चर्चा करून हा निर्णय दिला.


Multi Language |Offline reading | PDF