राममंदिराविषयी पुढील दिशा ठरवण्यासाठी विहिंपकडून ५ ऑक्टोबरला संतांची बैठक

केंद्रात गेली साडेचार वर्षे भाजपचे राज्य असतांना त्याच्याकडून राममंदिर बांधून न घेऊ शकलेली विहिंप आता ते बांधू शकेल, यावर हिंदूंनी विश्‍वास कसा ठेवायचा ?  जी विहिंप भाजपकडून राममंदिर बांधून घेऊ शकत नाही, ती अन्य पक्षांचे सरकार असल्यावर तरी राममंदिर बांधू शकेल का ?

सुरेंद्र जैन, विहिंप

नवी देहली – विश्‍व हिंदू परिषदेने ५ ऑक्टोबरला राममंदिराच्या प्रश्‍नावर संतांच्या उच्चाधिकार समितीची देहली येथे बैठक आयोजित केली आहे. यात देशभर ३० ते ३५ मोठे संत सहभागी होणार आहेत. ‘ते राममंदिराविषयी कारसेवा करण्यावर निर्णय घेतील’, असे म्हटले जात आहे. या बैठकीतून राममंदिराविषयी पुढे काय करायला हवे, याचा निर्णय घेतला जाणार आहे. तीनच दिवसांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी राममंदिराविषयी अध्यादेश आणण्याविषयी विचार मांडला होता. (भाजपचे सरकार आल्यानंतर साडेचार वर्षांनी सरसंघचालक असे सांगत आहेत. हे हिंदूंना रूचणारे नाही. एव्हाना संघाने भाजप सरकारला सांगून अध्यादेश काढून राममंदिर बांधायला हवे होते ! – संपादक)

विहिंपचे नेते सुरेंद्र जैन यांनी म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट कधीपर्यंत पाहिली जाणार ? आतापर्यंत याला खूपच विलंब झाला आहे. त्यामुळे आम्ही आंदोलन करण्यासाठी पुढचे धोरण कसे असावे, यासाठी या बैठकीचे आयोजन केले आहे. न्यायालयाच्या निर्णयाला उशीर होत असल्याने आम्हाला आंदोलन करावेच लागणार आहे. (सत्ता असतांना बांधले न गेलेले राममंदिर असल्या आंदोलनाने तरी बांधले जाईल, याची निश्‍चिती कोण देणार ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF