सनातन संस्थेची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील, तसेच दैनिक नवराष्ट्रचे मालक आणि संपादक यांना कायदेशीर नोटीस

फोंडा (गोवा) – सनातन संस्थेवर बिनबुडाचे आरोप करत तिची अपकीर्ती करणारे काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, तसेच या बिनबुडाच्या आरोपांना प्रसिद्धी देणारे ‘दैनिक नवराष्ट्र’चे मालक, संपादक आणि प्रकाशक विनोद रामगोपाल महेश्‍वरी यांना सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे.

२१ ऑगस्ट २०१८ च्या दिवशी ‘दैनिक नवराष्ट्र’च्या मुंबई आवृत्तीमध्ये ‘सनातनसारख्या संस्था ५०० तरुणांना देत आहेत दहशतवादाचे प्रशिक्षण’ या मथळ्याखाली अपकीर्तीकारक वृत्त प्रसिद्ध झाले आहे. यात विखे-पाटील यांनी सनातन संस्थेवर केलेले अपकीर्तीकारक आणि बेछूट आरोप प्रसिद्ध करण्यात आले. त्यामुळे श्री. वीरेंद्र मराठे यांनी सनातन संस्थेचे मानद कायदेविषयक सल्लागार अधिवक्ता रामदास केसरकर यांच्यामार्फत १८ सप्टेंबर २०१८ या दिवशी कायदेशीर नोटीस पाठवून उपरोक्त व्यक्तींकडून १० कोटी रुपये मानहानी भरपाईच्या रकमेची मागणी केली आहे, तसेच ‘या मागणीची पूर्तता नोटीस मिळाल्याच्या दिवसापासून १० दिवसांच्या आत न झाल्यास पुढील कायदेशीर कारवायांना सामोरे जावे लागेल’, असे या नोटिशीतून बजावले आहे. या कायदेशीर नोटिशीचा खर्च ५ सहस्र रुपये देण्याचे दायित्वही त्यांचेच असल्याचेही या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.


Multi Language |Offline reading | PDF