परिवाराच्या हत्येच्या भीतीने बांगलादेश सोडला ! – बांगलादेशातील पहिले (माजी) हिंदु सरन्यायाधीश एस्.के. सिन्हा

मुसलमानबहुल देशात हिंदु व्यक्ती मोठ्या पदावर पोहोचू शकत नाही आणि पोहोचली, तरी तिला फार काळ तेथे राहू दिले जात नाही, हेच या घटनेतून लक्षात येते !

लंडन – बांगलादेशातील पहिले हिंदु सरन्यायाधीश एस्.के. सिन्हा यांनी वर्ष २०१७ मध्ये बांगलादेशातून परिवारासह ऑस्ट्रेलियामध्ये पलायन केले. आता ते अज्ञात ठिकाणी रहात आहेत. तेथून ‘बीबीसी’ या वृत्तसंकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ‘माझ्या परिवाराची हत्या होण्याच्या भीतीने बांगलादेश सोडला’, असे सांगितले. त्यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘ए ब्रोकन ड्रीम : रूल ऑफ लॉ, ह्यूमन राइट्स अ‍ॅण्ड डेमोक्रेसी’ या पुस्तकातही त्यांनी याविषयी लिहिले आहे. ‘योग्य वेळ आल्यावर मी भारतात येऊन सर्व माहिती उघड करीन’, असे त्यांनी या मुलाखतीत म्हटले आहे.

१. बांगलादेशातील मागील सार्वत्रिक निवडणुकीनंतर शेख हसीना यांच्या अवामी लीगचे सरकार आल्यानंतर सिन्हा यांना सरन्यायाधीश बनवण्यात आले होते.

२. सिन्हा म्हणाले, ‘‘मी बांगलादेशातील न्यायपालिकेची पारदर्शकता आणि लोकशाही प्रक्रिया यांच्या हिताविषयी बोलत होतो; मात्र सरकारला ते रूचले नाही. त्यामुळे सरकार आणि गुप्तचर यंत्रणा माझ्या मागे लागल्या. मला माझ्याच घरात अनौपचारिकपणे नजरकैदेत ठेवण्यात आले होते. माझ्यावर देश सोडण्यासाठी दबाव निर्माण करण्यात आला आणि शेवटी देशातून घालवून देण्यात आले.

३. भारताच्या सीमेलगत असणार्‍या बांगलादेशाच्या सिलहट प्रांतामध्ये रहाणारे सिन्हा यांनी दावा केला, ‘‘बांगलादेश युद्ध लवादा’मधील खटल्यांची सुनावणी माझ्याकडे होती आणि त्यामुळे जिहाद्यांनी माझे घर बॉम्बने उडवण्याची योजना बनवली होती.’

४. सिन्हा यांच्या या दाव्यांना सत्ताधारी अवामी लीग सरकारने तथ्यहीन म्हटले आहे. सरकारमधील मंत्री ओबैदुल कादिर म्हणाले, ‘‘सिन्हा देशाच्या बाहेर बसून खोटी कथा लिहीत आहेत. अधिकार गेल्यानंतर ते द्वेषामुळे असे करत आहेत. त्यांनी आता केलेले आरोप ते सरन्यायाधीश पदावर असतांनाच का केले नाहीत ?’’

५. या प्रश्‍नावर सिन्हा यांनी मुलाखतीत उत्तर दिले की, मला ब्लॅकमेल केले जात होते. त्यामुळे या गोष्टी मी कोणाला सांगितल्या नाहीत.

६. सिन्हा म्हणाले, ‘‘सरकारला जेव्हा लक्षात आले की, मी त्यांच्या सत्तेच्या मार्गामध्ये अडथळा बनत आहे, तेव्हा सरकारने माझ्याकडे दुर्लक्ष करण्यास चालू केले. तसेच माझ्या मित्रांवर आणि नातेवाइकांवर गोपनीयरित्या लक्ष ठेवण्यास चालू केले, तसेच गुप्तचर संस्थांनी माझ्यावर देश सोडण्यासाठी दबाव निर्माण केला. मी कायद्यातील १६ व्या संशोधनाच्या अंतर्गत निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करत आहे, तेव्हा सरकारला ते चुकीचे वाटू लागले. कनिष्ठ न्यायालयातील भ्रष्टाचार नष्ट करण्याच्या माझ्या प्रयत्नालाही सरकारकडून विरोध होऊ लागला. मी सरन्यायाधीश असतांना मला अन्य अधिवक्त्यांना भेटण्यास बंदी घालण्यात आली. तसेच प्रसारमाध्यमांना ‘मी आजारी आहे आणि उपचारासाठी विदेशात जाणार आहे’, असे सरकारकडून सांगण्यात आले.

७. विश्‍लेषकांच्या म्हणण्यानुसार सिन्हा एकेकाळी शेख हसीना यांच्या जवळचे होते; मात्र जेव्हा त्यांनी संसद आणि सरकार यांच्याकडून उत्तर मागण्यास चालू केले, तेव्हा त्यांना त्रास देण्यात येऊ लागला.

८. बांगलादेशाच्या गुप्तचर विभागाचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल तनवीर मजहर सिद्दीकी म्हणाले, ‘‘मी अद्याप सिन्हा यांचे पुस्तक पाहिलेले नाही. ते पाहिल्यावर त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करू शकतो.’’


Multi Language |Offline reading | PDF