हिंदु राष्ट्रवादाची पोटशूळ !

‘वाढत्या ‘हिंदु राष्ट्रवादा’मुळे भारतातील ‘धर्मनिरपेक्षते’ला हानी पोहोचत आहे’, असा कांगावा अमेरिकेच्या ‘काँग्रेस रिसर्च सर्व्हिस’ या संसदीय समितीने तिच्या अहवालात नोंदवला आहे. ‘या अहवालाला आधार काय ?’, ‘या निष्कर्षापर्यंत ही समिती कशी काय पोहोचली ?’, हे कुठे स्पष्ट झालेले नाही. तसे पाहिले, तर अमेरिकेच्या कुठल्या ना कुठल्या समितीकडून असे भारतविरोधी अहवाल येतच असतात. कधी अमेरिकेला भारतात होणार्‍या कथित व्यक्तीस्वातंत्र्याच्या हननाची चिंता असते, तर कधी धार्मिक स्वातंत्र्याच्या हननाची. ‘भारतात मानवाधिकारांची पायमल्ली होत आहे’, असाही जावईशोध अमेरिकेच्या कुठल्या तरी संस्थेने लावला होता. बरं, हा मानवाधिकार, व्यक्तीस्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य हे केवळ मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यापुरता मर्यादित आहे, हे येथे मुद्दाम नमूद करावेसे वाटते. आताही तसेच झाले आहे. येथे सांगण्याचे सूत्र म्हणजे मागील काही वर्षे हिंदूंना त्यांच्या न्याय्यहक्कांची जाणीव होत आहे. स्वतःवर ‘हिंदु’ म्हणून होत असलेला अन्याय याविषयी ते प्रकर्षाने विचार करू लागले आहेत. ‘स्वतःवर होणारे अन्याय, अत्याचार थांबायचे असतील, तर हिंदु राष्ट्राशिवाय पर्याय नाही’, हेही त्यांना समजले आहे. पूर्वी याविषयी दबक्या आवाजात बोलले जात असे; मात्र मागील काही वर्षे हिंदूंकडून हिंदु राष्ट्राची मागणी जोरकसपणे होऊ लागली आहे. ‘हिंदु राष्ट्रातील जनता आणि शासनकर्ते हे अस्मितेने ओतप्रत भरलेले, राष्ट्राभिमानी आणि धर्माभिमानी असतील’, हे अमेरिकेनेही ताडले आहे. ‘प्रत्येक देश आपल्या तालावर नाचला पाहिजे’, अशा गुर्मित अमेरिका वावरत असते. ‘भविष्यात हिंदु राष्ट्र स्थापन झाल्यास भारत आपल्याला जुमानणार नाही’, हे अमेरिका जाणून आहे. त्यामुळे आतापासूनच ‘हिंदु राष्ट्र’ आणि ‘हिंदु राष्ट्रवाद’ हा समाजासाठी कसा धोकादायक आहे, हे पटवून देण्याचा आटापिटा अमेरिका करतांना दिसत आहे. हिंदुविरोधी अहवाल सादर करून हिंदूंची प्रतिमा मलीन करणे, हा त्याचाच एक भाग आहे. अमेरिकेत वर्णद्वेषामुळे कृष्णवर्णियांवर अत्याचार होणे, त्यांना अन्याय्य वागणूक देणे यांसारखे प्रकार आजही चालू आहेत. अमेरिकेत वास्तव्य करणारे भारतीय नागरिकही या वर्णद्वेषाला बळी पडले आहेत. तेथे या समस्येने उग्र रूप धारण केले असतांना ती निपटण्याऐवजी अमेरिका भारताच्या अंतर्गत प्रश्‍नांमध्ये ढवळाढवळ करते. वास्तविक याची जाणीव भारतीय शासनकर्त्यांनी अमेरिकेला करून देणे आवश्यक आहे. प्रत्येक वेळी भारताला दाबण्याचा प्रयत्न करणार्‍या अमेरिकेसमोर भारतीय शासनकर्ते नांगी का टाकतात, याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे. भारताने स्वतःच्या जनतेसाठी काय ध्येयधोरणे राबवायची, हा भारताचा अंतर्गत प्रश्‍न आहे, हे अमेरिकेला ठणकावून सांगण्याची आवश्यकता आहे. असे केल्यानेच अमेरिका वठणीवर येईल !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now