अमळनेर येथे संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी भाजीपाल्यासह फळांची विक्री संस्कृतमधून करण्याचा विद्यार्थ्यांकडून प्रयोग !

जळगाव, १७ सप्टेंबर – जिल्ह्यातील अमळनेर येथे संस्कृत भाषेच्या प्रचार आणि प्रसार यांसाठी अमळनेरच्या सानेगुरुजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या भाषेची जनतेत आवड निर्माण होण्यासाठी १५ सप्टेंबर या दिवशी शहरातील लुल्ला भाजीपाला बाजारात जाऊन अनोख्या स्वरूपात भाजीपाला विकला. या वेळी विद्यार्थ्यांनी व्यापार्‍यांकडील फळांसह भाज्यांची नावे संस्कृतमध्ये घेऊन ग्राहकांशी संवाद साधला. ग्राहकांना संस्कृतमधून विविध फळांसह भाज्यांची नावे ऐकून आश्‍चर्य वाटले, तसेच ग्राहकांनी जिज्ञासेपोटी अनेकांनी त्याविषयी जाणून घेतले. त्यात आल्याला ‘आद्रकम्’, सफरचंदाला ’सेवम’, गिलक्याला ‘जलिनी’, कोथंबिरीला ‘धान्यकम्’ आदी नावे ऐकल्यानंतर ग्राहकांनी आपसुकच दुकानांभोवती गर्दी केली आणि ग्राहकांची वाढती गर्दी व उत्साह पाहून भाजीपाला विक्रेतेही सुखावले.

 


Multi Language |Offline reading | PDF