रामनाथी आश्रमात आल्यावर श्री. संपत जाखोटिया यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

श्री. संपत जाखोटिया

‘वर्ष २०१७ मध्ये मला सनातनच्या गोवा येथील रामनाथी आश्रमात रहाण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती देत आहे.

१. आश्रमातील साधक

१ अ. आश्रमात न्यायला आलेल्या साधकाने प्रथमभेटीतच ओळखणे : ‘रामनाथीला जातांना मडगाव स्थानकावर पोहोेचल्यावर एक साधक आम्हाला आश्रमात नेेण्यासाठी आले होते. स्थानक जवळ आल्यामुळे ‘मला नेण्यास कोण आले आहे का ?’ हे पहाण्यासाठी मी रेल्वेच्या दारात उभा होतो. तेव्हा मला न्यायला येणार्‍या साधकाने मला हाक मारली. त्याची आणि माझी प्रत्यक्षात ही पहिलीच भेट होती, तरीही त्याने मला ओळखले.

१ आ. रुग्णाईत असतांना साधकांनी केलेले साहाय्य

१. मी काविळीने रुग्णाईत असतांना आश्रमातील साधकांनी मला पुष्कळ साहाय्य केले. खोली उपलब्ध करून देणे, जेवण आणि अल्पाहार वेळेवर आणून देणे, काविळीचे पथ्य सांभाळणे, हे सर्व साधकांनी केल्यामुळे मला तेथे लवकर बरे वाटू लागले.

२. कावीळ या रोगासाठी टोमॅटोचे सार घेणे आवश्यक आहे, हे मी कुणालाही न सांगताच तेथील साधिका सौ. गांधीकाकू प्रतिदिन संतांसाठी केलेल्या सारातील थोडे सार माझ्यासाठी काढून ठेवायच्या.

३. ऊस चोखल्याने कावीळ लवकर बरी होतेे; म्हणून एका साधकाने मला उसाचे लहान-लहान तुकडे करून चोखायला दिले.

तेव्हा वाटले, ‘मला घरी असतांनाही एवढे पथ्य पाळता आले नसते.’ या काळात मला आश्रमातील साधकांचे प्रेम अनुभवता आले.

१ इ. इतरांचा विचार करणे : रुग्णाईत असतांना थोडे बरे वाटू लागल्यावर मी भ्रमणसंगणकावर सेवा करणे चालू केले. त्या वेळी संगणकावर इंटरनेट चालू करण्यासाठी एक साधक आले होते. त्यांनी अन्य काही सुविधाही (‘सेटींग’ही) मला उपलब्ध करून दिल्या. याचा मला सेवा करतांना लाभ झाला.

१ ई. सेवा करतांना इतरांना शिकवून सिद्ध करणे : मी सेवेसाठी बसत असलेल्या संगणकावर एक प्रणाली अद्ययावत करण्यासाठी संगणक दुरुस्ती विभागातील २ साधक आले होते. त्यातील एका साधकाने दुसर्‍या साधकाला ती प्रणाली अद्ययावत कशी करायची, हे शिकवले. तेव्हा मला तेथील साधकांची अन्य साधकांना सिद्ध करण्याची तळमळ दिसून आली.

१ उ. बोलतांना इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणे : तेथे वेगवेगळ्या कार्यालयीन भागांत साधारण ५० ते ६० साधक आहेत. सर्व जण सेवेच्या निमित्ताने एकमेकांशी बोलत असतात; परंतु बोलतांना ते केवळ समोरच्या व्यक्तीला ऐकू येईल, इतक्या हळू आवाजात बोलतात. ते भ्रमणभाष किंवा दूरभाषवर बोलतांना आपल्या आवाजाचा इतरांना त्रास होणार नाही, अशा पद्धतीने बोलायचे. दैनिक विभागाची बैठक चालू असतांना बैठकीतील साधकांचा आवाजही हळू असायचा.

२. भावसत्संग

२ अ. मनातील अयोग्य विचार न्यून करण्यास स्वयंसूचनेसह भावाची जोड देण्याची आवश्यकता लक्षात येणे : मी आश्रमातील आढावा आणि भाववृद्धी सत्संगाला जात असे. त्या वेळी मला ‘आपल्या मनात दिवसभरात अनेक विचार येऊन जातात. त्यातील पुष्कळ विचार आपल्यातील दोषांमुळे अयोग्य असतात. त्या विचारांना आपण स्वयंसूचनेसह भावाची जोड दिल्यास मनातील अयोग्य विचार लवकर न्यून होण्यास साहाय्य होते’, हे सूत्र शिकायला मिळाले.

१ अ २. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवण्यात आनंद मिळू लागणे : ‘आपण इतके दिवस स्वभावदोष निर्मूलनासाठी प्रयत्न करूनही आपल्यात पालट होत नाही’, या विचाराने मला स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेविषयी नकारात्कता आली होती; परंतु भावसत्संगांना जाऊ लागल्यापासून नकारात्मकता न्यून होऊन मला स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवण्यात आनंद मिळू लागला.

३. विदेशी साधक

३ अ. उपायांचे गांभीर्य : रुग्णाईत असतांना काही दिवसांसाठी मला माझ्या खोलीजवळील एका विभागात सेवेसाठी जागा उपलब्ध करून दिली होती. तेथे विदेशातील साधक सेवेसाठी बसत असत. ते ख्रिस्ती पंथीय असूनही त्यांच्यामध्ये उपायांचे गांभीर्य पुष्कळ होते. ते सनातनच्या आश्रमात येऊन आध्यात्मिक उपायांचे महत्त्व जाणून घेतात आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले सर्व उपाय अगदी काटेकोरपणे करतात.

३ आ. सात्त्विक पोषाख वापरणे : विदेशातील काही पुरुष साधक नियमित झब्बा वापरतात, तसेच काही साधिका नियमितपणे नऊवारी साडी नेसतात.

३ इ. ते रात्री विभागातून खोलीत जातांना एकमेकांना आणि मलाही ‘शुभ रात्री’ असे संबोधून जातात.

३ ई. कुणी चहा वा पाणी आणण्यासाठी भोजनकक्षात जाणार असेल, तर ते जातांना बाजूच्या साधकाला ‘तुम्हाला चहा वा पाणी हवे आहे का ?’, असे विचारतात.

४. बालसाधकांची कार्यपद्धत पाळण्यातील सतर्कता

मी नवीन असल्याने आश्रमातील कार्यपद्धती मला ठाऊक नव्हत्या. तेथे प्रत्येकाचे वैयक्तिक अंथरुण-पांघरुण घडी घालून, दोरीने बांधून त्यावर नावाची चिठ्ठी लावून ठेवण्याची कार्यपद्धत आहे. तेथील वेदांत झरकर या बालसाधकाने मला या कार्यपद्धतीविषयी सांगितले. त्याने मला ही कार्यपद्धत न पाळल्यास होणारा परिणामही सांगितला; परंतु माझ्याकडून लगेच तशी कृती झाली नाही. त्याने मला पुन्हा त्याची जाणीव करून दिली. अशा प्रकारे तेथील ‘बालसाधकांमध्येही कार्यपद्धत पाळण्याविषयी सतर्कता आहे’, हे दिसून आले.

५. सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांच्या सत्संगांमुळे स्वतःच्या स्वभावदोषांचे चिंतन होणे

आश्रमात काही दिवस सद्गुरु (सौ.) बिंदाताई घेत असलेले चुकांचे सत्संग चालू होते. त्यामध्ये अनेक वर्षांपासून सेवेत असलेल्या काही साधकांच्या चुका घेण्यात आल्या. त्यामध्ये अयोग्य प्रतिक्रियांचा भाग अधिक होता. सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांनी या सर्व चुकांची त्या साधकांना जाणीव करून दिली. त्या वेळी काही वेळा बोलतांना आपण काही वाक्ये सहज बोलून जातो; परंतु ते बोलणे समष्टीसमोर अयोग्य असते, हे माझ्या लक्षात आले. त्या सर्व चुका किंवा अयोग्य प्रतिक्रिया वाचून असे वाटले, ‘आपलेही स्वभावदोष तीव्र आहेत आणि ते घालवण्यासाठी आपणही असे प्रयत्न करायला हवेत.’

६. गुरुदेवांचा सत्संग

६ अ. गुरुदेवांचे प्रेम अनुभवणे : त्यानंतर एक दिवस गुरुदेवांचा सत्संग लाभला. मला गुरुदेव म्हणाले, ‘‘बरे झाले, एकदा भेटलास !’’ हे ऐकल्यावर त्यांनी मला अगदी मित्रासारखे जवळ केल्यासारखे वाटले.

६ आ. साधनेचे प्रयत्न चांगले होण्यासाठी अधिकाधिक सात्त्विकतेत रहाण्याचा प्रयत्न करण्यास सांगणे : त्यानंतर मी त्यांना विचारले, ‘‘साधनेची स्थिती प्रत्येक वेळेस चांगली नसते. काही वेळा साधनेचे प्रयत्न चांगले होतात, तर काही वेळा होत नाहीत.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘प्रत्येकात सत्त्व-रज-तम या गुणांचे प्रमाण अल्पाधिक प्रमाणात बदलत असते. जेव्हा सत्त्वगुणाचे प्रमाण अधिक आहे, तेव्हा प्रयत्न चांगले होतात. त्यामुळे आपण अधिकाधिक सत्त्वगुणात रहाण्याचा प्रयत्न करावा.’’

६ इ. भेट झाल्यावर माझ्या मनात विचार आला, ‘गुरुदेव म्हणजे मित्रांसाठी मित्र, मुलांसाठी आई, साधकांसाठी मार्गदर्शक, तर शिष्यांसाठी गुरु आहेत.’

७. आश्रमदर्शन करतांना आलेल्या अनुभूती

७ अ. भगवान श्रीकृष्णाच्या महालात प्रवेश करत आहोत’, असे वाटून कृतज्ञता वाटणे : मी रात्री १२ वाजता रामनाथी आश्रमात पोहोचलो. तेव्हा मला ‘आश्रमात प्रवेश करतांना मी भगवान श्रीकृष्णाच्या महालात प्रवेश करत आहे’, असे वाटले. मी भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना केली, तेव्हा माझी भावजागृती झाली. पुष्कळ दिवसांनी रामनाथी आश्रमात येण्याची संधी मिळत असल्याने मला कृतज्ञता वाटली.

७ आ. आश्रमात झालेले दैवी पालट पाहून कृतज्ञता वाटणे : आश्रमदर्शनाच्या वेळी मला आश्रमातील दत्तमाला मंत्रपठणाने आपोआप उगवलेली औदुंबराची झाडे, लादीवर उमटलेले ‘ॐ’ इत्यादी दैवी पालट पहायला मिळाले. या कलियुगात झालेले हे दैवी पालट बघून मला देवाची सनातनच्या आश्रमांवर असलेली कृपा अनुभवायला मिळाली आणि अशा आश्रमात रहाण्याची संधी मिळाल्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली.

‘हे श्रीमन्नारायणा, तुझ्या कृपेने मला रामनाथी आश्रमासारख्या पवित्र आश्रमात (तीर्थस्थळी) रहाण्याची संधी मिळाली. मला होणारा वाईट शक्तींचा त्रास तूच न्यून केलास. मला साधनेविषयीची नवीन सूत्रे शिकवलीस. यासाठी मी तुझ्या चरणी कृतज्ञ आहे. ‘रामनाथी आश्रमातून शिकायला मिळालेली सूत्रे माझ्याकडून कृतीत येऊ देत. माझे उपायांचे गांभीर्य वाढू दे आणि माझी साधनेत प्रगती होऊ दे’, अशी मी तुझ्या चरणी तळमळीने प्रार्थना करतो.’

– श्री. संपत जाखोटिया, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.४.२०१७)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.


Multi Language |Offline reading | PDF