श्री गणेशाची स्थापना झाल्यानंतर उत्तरपूजेपर्यंत करावयाच्या नित्य कृती !

गणेशोत्सव : धर्मशास्त्रासह अन्य वैशिष्ट्यपूर्ण माहिती !

समस्त हिंदूंचे आराध्य दैवत श्री गणपति ! गणेशोत्सवाची चाहूल लागताच गणरायाचे स्वागत करण्यासाठी आपण एकत्रितपणे सिद्धतेला लागतो. आपले आराध्य देवतेचे कार्य कोणते, त्याचे आपल्या जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व आदी सूत्रांसंदर्भात धर्मशास्त्रीय माहिती मिळाल्यास देवतेप्रती आपला भक्तीभाव वृद्धींगत होण्यास साहाय्य होते. या पार्श्‍वभूमीवर प्रतिदिन श्री गणेशासंदर्भातील धर्मशास्त्रीय तसेच अन्य वैशिष्ट्यपूर्ण माहिती आमच्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.

श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी श्री गणेशमूर्ती घरी आणल्यानंतर तिचा प्राणप्रतिष्ठापनादी पूजाविधी करतात. त्यानंतर ती मूर्ती विसर्जित होईपर्यंत घरीच असते. या काळात श्री गणेशासंबंधीच्या धार्मिक कृती योग्य रीतीने करायला हव्यात.

१. श्री गणेशमूर्तीचे पंचोपचार पूजन !

श्री गणेशाची मूर्ती ज्या खोलीत आहे तेथील स्वच्छता करावी. स्नान झाल्यानंतर पूजेसाठी फुले जमा करणे आदी पूर्वसिद्धता करावी. प्राणप्रतिष्ठापना झालेल्या मूर्तीचे पूजन प्राणप्रतिष्ठा सोडून अन्य उपचार करून करावे. षोडशोपचारे म्हणजे १६ उपचार समर्पित करून पूजन करता येणे संभव नसेल, तर पंचोपचार पूजन करावे. पंचोपचार पूजन करणे म्हणजे गंध, पत्री-पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य हे पाच उपचार देवतेला समर्पित करणे.

पंचोपचार पूजनानंतर मंत्रपुष्पांजली म्हणावी. पंचोपचार पूजन सकाळी आणि सायंकाळी करावे. असे गणेश विसर्जनाच्या दिवसापर्यंत करावे.

२. आदर्श आरती कशी करावी ?

श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी घरात श्री गणेशाचे आगमन झाल्यानंतर रोज सकाळी आणि सायंकाळी होणार्‍या पूजेच्या वेळी आरती केली जाते. यासाठी शक्यतो घरातील सर्व मंडळींनी एकत्र यावे. शक्यतो आरतीसाठी सर्वांनी नीट ओळीमध्ये उभे रहावे. आरती मधूर आणि धीम्या गतीने म्हणावी. टाळ्या अणि झांज धीम्या आवाजात वाजवाव्यात.

आरती म्हणणे म्हणजे आर्ततेने देवाला हाक मारणे. त्यामुळे प्रत्येकाने तसा भाव ठेवून आरती म्हणावी. ‘आपल्यासमोर प्रत्यक्ष श्री गणेश आहे’, अशा भावाने आरती म्हणावी. सामान्यत: एकाहून अधिक आरत्या केल्या जातात. असे असले तरी आरत्यांची संख्या खूप न ठेवता काही मोजक्या आरत्या म्हणाव्यात.

अध्यात्मात ‘अनेकातून एकात’ जायचे असते. तसेच आरती करतांना देवतेप्रती भाव टिकून रहाणेही महत्त्वाचे असते. आरती म्हणत असतांना सर्वांचे लक्ष आरती म्हणण्याकडे असावे. अनावश्यक खुणा करणे, बोलणे इत्यादी कृती अशा वेळी करू नयेत. भावासहित योग्य प्रकारे आरती म्हटल्याने तेथे सात्त्विक स्पंदने निर्माण होतात.

३. घरातील गणेशोत्सवाचा अधिक लाभ होण्यासाठी करावयाच्या कृती !

या काळात श्री गणेशाच्या समोर बसून शक्य होईल तितका ‘ॐ गं गणपतये नम: ।’ हा जप करावा. या काळात श्री गणपति अथर्वशीर्ष स्तोत्राचे पठण करावे.

४. गणेशमूर्तीचा भंग झाल्यास काय करावे ?

काही वेळा श्री गणेशाची मूर्ती घरी आणतांना अथवा आणल्यानंतर तिचा एखादा भाग काही कारणाने भंग पावतो. अशा वेळी काय करावे, यासंबंधी धर्मशास्त्रात स्पष्ट निर्देश आहेत. मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी तिचा अवयव दुखावल्यास ती मूर्ती विसर्जित करून दुसरी मूर्ती पुजावी. प्राणपतिष्ठा झाल्यानंतर मूर्तीचा अवयव दुखावला गेल्यास त्या मूर्तीवर अक्षता समर्पित करून तिचे विसर्जन करावे. जर ही घटना श्री गणेशचतुर्थीच्या दिवशीच घडली, तर दुसरी मूर्ती पुजावी. अन्यथा श्री गणेश चतुर्थीच्या दुसर्‍या, तिसर्‍या दिवशी घडल्यास नवीन मूर्ती पुजण्याचे काहीच कारण नाही. मूर्ती विसर्जनाच्या दिवशी विसर्जनापूर्वीच्या अक्षता वाहून झाल्यानंतर त्या मूर्तीतील देवत्व जाते. त्यामुळे त्या मूर्तीचा अवयव दुखावल्यास त्या मूर्तीचे नेहमीप्रमाणे विसर्जन करावे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now