श्रीलंकेतील हिंदूंचे दुःख !

अमेरिकेतील शिकागो येथे झालेल्या ‘विश्‍व हिंदू संमेलना’मध्ये केवळ भारतातीलच नव्हे, तर विश्‍वभरातील हिंदूंची स्थिती, हिंदूंसमोरील समस्या यांविषयी मंथन झाले. याच संमेलनामध्ये श्रीलंकेतील हिंदुत्वनिष्ठ, तसेच हिंदु समाज आणि मंदिरे यांचे रक्षण करणार्‍या शिवसेनाई संघटनेचे संस्थापक श्री. मरवनपुलावु सच्चिदानंदन् यांनी ‘राजकीय हिंदू’ या सत्रात श्रीलंकेतील हिंदूंच्या दुःस्थितीचे वर्णन केले. श्रीलंकेतील हिंदूंवर होत असलेले अत्याचार हे काही आता नवीन सूत्र राहिलेले नाही. गेली कित्येक दशके तेथील ख्रिस्ती, बौध आणि मुसलमान यांच्याकडून हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. तेथील हिंदूंची झपाट्याने अल्प होणार्‍या लोकसंख्येवर दृष्टीक्षेप टाकल्यास हिंदूंच्या भयावह स्थितीचा अंदाज येतो. काही वर्षांपूर्वी तेथील ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम्’ या संघटनेचा निःपात करण्याच्या नावाखाली श्रीलंकेतील सैन्याने हिंदूंचे शिरकाण केले. त्याच्या काही ध्वनीचित्रफिती सामाजिक संकेतस्थळावर प्रसारित झाल्या. त्यावरून तेथील हिंदूंवर श्रीलंकेच्या सैन्याने केलेले अमानुष अत्याचार जगासमोर आले. सद्यस्थितीत श्रीलंकेतील हिंदूंसाठी कार्यरत असलेल्या संघटना आणि काही हिंदुत्वनिष्ठ तेथील हिंदूंच्या न्याय्यहक्कांसाठी झटत आहेत. त्यांतीलच एक म्हणजे श्री. मरवनपुलावु सच्चिदानंदन् होय. ते ७८ वर्षांचे आहेत. या वयातही श्री. सच्चिदानंदन् हिंदुत्वासाठी करत असलेले कार्य तरुण हिंदूंना लाजवणारे आहे. येथे प्रश्‍न आहे तो भारत सरकारचा. श्रीलंकेतील हिंदुत्वनिष्ठांनी विविध व्यासपिठांवरून श्रीलंकेतील हिंदूंच्या वेदना मांडल्या आहेत. तसेच ‘श्रीलंकेतील हिंदूंना भारत सरकारने साहाय्य करावे’, अशी मागणीही वारंवार करण्यात आली आहे. असे असतांना भारत सरकारकडून त्यांच्या या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्षच केले गेले. ‘वर्ष २०१४ मध्ये भाजप सत्तेवर आल्यानंतर तरी ही स्थिती पालटेल’, असे हिंदूंना वाटले होते; मात्र तसे काही झाले नाही. आताचे शासनकर्ते किंवा श्रीलंकेतील भारतीय दूतावास यांनी कधी श्रीलंका सरकारच्या प्रतिनिधींशी बोलतांना हे सूत्र उपस्थित केले, असे ऐकिवात नाही. अशा स्थितीत ‘श्रीलंकेतील हिंदूंना वाली कोण ?’, हा प्रश्‍न अजूनही अनुत्तरित आहे. शिकागो येथील ‘विश्‍व हिंदू संमेलना’त श्रीलंकेतील हिंदूंच्या अत्याचारांना वाचा फोडली गेली, हे बरेच झाले; पण पुढे काय ? या अत्याचारांच्या कथा केवळ ऐकायच्या आणि सोडून द्यायचा, असे आहे का ? या संमेलनात सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठ संघटना श्रीलंकेतील हिंदूंना न्याय मिळण्यासाठी काही पावले उचलणार का ? हिंदूंवरील समस्यांवर चर्चा होतच रहाते; मात्र त्याविषयी धोरणात्मक कृती होतांना दिसत नाही. सध्या हिंदूंना पडलेले प्रश्‍न बरेच आहेत. त्याची उत्तरे भाजप सरकारने द्यायची आहेत. ‘जगातील कुठल्याच हिंदूला आता वार्‍यावर सोडायचे नाही’, असा पण सरकार करणार का ? सरकारने जगभरातील हिंदूंचे पालकत्व घ्यावे, असे हिंदूंना अपेक्षित आहे !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now